▼

Sunday, 9 August 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.08.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 09 August 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०९ ऑगस्ट २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      भारत छोडो आंदोलनाच्या ८४ व्या वर्धापनदिना निमित्त देशाचं हुतात्म्यांना अभिवादन

·      मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्तीसाठी न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांच्या नावाची शिफारस

आणि

·      कोरियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद अश्मिता चालिहाने पटकावलं

****

भारत छोडो आंदोलनाच्या ८४व्या वर्धापनदिना निमित्त पंतप्रधान, उपराष्ट्रपती यांच्यासह अनेक नेत्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली. महात्मा गांधींच्या करा किंवा मरा या हाकेतून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्याच्या लढ्यात देशात एकवटले. त्यांचं धैर्य, त्याग आणि देशभक्ती पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील, अशा शब्दात उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी अभिवादन केलं आहे. भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांचं धैर्य प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणा देत राहील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले. आजच्या ऑगस्ट क्रांती दिनी ज्यांच्या जिद्दीने आणि धैर्यामुळे भारत छोडो आंदोलन आणि भारताच्या स्वांतत्र्यलढ्याचा मार्ग बळकट केला, त्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे.

****

देशभरात आजपासून हरघर तिरंगा हे अभियान सुरू झालं आहे. येत्या १७ तारखेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत यंदा वंदे मातरम्‌ या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या दीडशेव्या वर्धापन दिनाचंही औचित्य असणार आहे. या निमित्ताने देशभरात विविध ठिकाणी वंदे मातरम्‌चं सामूहिक गायन, तिरंगा रॅली, प्रदर्शनं, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

बीडमध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा आज उत्साहात शुभारंभ झाला. ९ ते १५ ऑगस्टदरम्यान राबविण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय उपक्रमाच्या प्रारंभानिमित्त जिल्हा क्रीडा संकुलातून तिरंगा रॅली काढण्यात आली. रॅलीच्या प्रारंभी ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत सादर करण्यात आलं. रॅलीदरम्यान खेळाडू, विद्यार्थी आणि नागरिकांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणा दिल्या. त्यामुळे परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झालं.

****

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी चार न्यायाधीशांची विविध उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नतीसाठी शिफारस केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून, दिल्ली उच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या न्यायमूर्ती व्ही. कामेश्वर राव यांची पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस करण्यात आली आहे.

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्वनी कुमार मिश्रा यांची त्याच न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस करण्यात आली आहे. ओरिसा उच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या न्यायमूर्ती मानस रंजन पाठक यांची गुजरातमध्ये बदली करण्यात आली आहे. तर ओरिसा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्ण राम मोहपात्रा यांची छत्तीसगड उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे.

****

ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त आज नवी दिल्लीच्या बेस कँप रुग्णालयात महा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातल्या अनेक कुस्तीगीर आणि इतर खेळाडूंनी या शिबिरात रक्तदान केलं.

****

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुदुच्चेरी पोलीस दलाला राष्ट्रपती ध्वज प्रदान केला आणि देशाची अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्यासाठी या दलाने दाखवलेल्या समर्पण भावनेचं कौतुक केलं. लष्कराची तुकडी किंवा एखादं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या पोलीस दलाला दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे.

****

महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब डांगे यांच्या प्रेरणादायी जीवन कार्यावर आधारित “आम्रवृक्ष” या आत्मचरित्राचं प्रकाशन आज सांगली इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी आष्टा शैक्षणिक संकुलातील विविध इमारतींचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आलं. अण्णासाहेब डांगे यांच्या कार्याबद्दल बोलतांना त्यांनी महाराष्ट्राला पहिल्यांदा टॅंकरच्या जाळ्यातून मुक्त करण्याचं श्रेय त्यांना जात असल्याचा उल्लेख केला. याबरोबरच शेतकऱ्यांची कर्जमाफी, लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी या जन्म गावचा कायापालट करण्यासाठी ७०० कोटींचं सुरू असलेलं काम, त्याचबरोबर वाटेगाव इथं देखील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच स्मारक तयार करण्यात येणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं.

कोल्हापूर मधील राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतलं. यावेळी समाधीस्थळा अंतर्गत नूतनीकरण करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचंही उद्घाटन करण्यात आलं. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं लोकार्पणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. २०२४ मध्ये या नाट्यगृहाला आग लागली होती.

****

श्री गाडगे महाराज विश्वस्त मंडळाचे प्रमुख विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांचं आज निधन झालं. बापूसाहेब देशमुख यांनी संत गाडगेबाबांनी दाखवलेल्या सेवामार्गाला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवला होता. आपलं संपूर्ण आयुष्य सेवा समर्पण आणि मानवतेच्या कार्यासाठी वाहून घेतलं होतं. बापूसाहेबांच्या निधनाने गाडगेबाबांच्या सेवाकार्याची एक समर्पित दीपज्योत हरपल्याची, तसंच सामाजिक आणि सेवाक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.

****

नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळावा आणि त्यांना दोन लाख रुपयांचं अनुदान द्यावं, या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अहमदपूर तालुक्यातील, शिरूर ताजबंद इथंल्या निवासस्थानासमोर आज ठिय्या आंदोलन करण्यात आलं. आंदोलनापूर्वी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकारमंत्र्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं. या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन सहकारमंत्र्यांनी दिल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

****

कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या अश्मिता चालिहाने पटकावलं आहे. आज ५३ मिनिटं चाललेल्या अंतिम सामन्यात तिने चीनच्या हान कियान क्षी चा १४-२१, २१-१४, २१-१४ असा पराभव केला. पहिल्या गेममधे पिछाडीवर पडलेल्या अश्मिताने नंतर आक्रमक खेळ करत विजय मिळवला. यापूर्वी अश्मिताने २०२४च्या आशिया सांघिक विजेतेपद स्पर्धेत, तसंच २०१९च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांमधे सुवर्णपदक मिळवलं आहे.

****

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. आता मान्सून पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत. पुढील २४ तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तसेच काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या मात्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. पुढील काही दिवसांत राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

****

आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त नागपुरात आदिवासी समाजबांधवांचा भव्य सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी नागपूरसह विविध भागांतून हजारो आदिवासी समाजबांधव एकत्र आले होते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक पूजा तसंच जनजागृतीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथं भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहकार्यानं आणि शिखाज कारागिरी या संस्थेच्या संयुक्त विद्यमानं स्वदेश फॅशन आणि लाईफस्टाईल एक्सपो २०२६ हस्तकला मेळाव्याचं आयोजन केलं आहे. शहरातील सागर रिसॉर्ट्स इथं १४ ते १६ ऑगस्ट दरम्यान हे प्रदर्शन भरणार आहे.

****

नाशिक जिल्ह्यातील भूकंपाच्या हालचालींवर अधिक प्रभावी आणि अचूक पद्धतीने लक्ष ठेवण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने, सुरगाणा इथं अत्याधुनिक ब्रॉडबँड सिस्मोग्राफ आधारित भूकंप मापन केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या माध्यमातून मिळणारी भूकंपविषयक माहिती त्याचवेळी नवी दिल्लीतील राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या केंद्रीय नियंत्रण कक्षाकडे पाठविली जाणार आहे.

****

जम्मू-काश्मीरमध्ये पुढील काही दिवस हवामानाची स्थिती प्रतिकूल राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवर सुरू असलेली अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे यात्रेच्या दोन्ही मार्गांचं मोठं नुकसान झालं असून, या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे. यंदा ४ लाखापेक्षा जास्त भाविकांनी अमरनाथच्या गुंफांना भेट दिली.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद पंचायत विभागाच्यावतीनं हर घर तिरंगा अभियान २०२६ या अंतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ९ ते १७ ऑगस्टदरम्यान या अभियानात प्रत्येक घर, दुकान आणि व्यावसायिक आस्थापनांवर तिरंगा फडकवून नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाबाबत जनजागृती करण्याचं आवाहन केलं आहे.

****

No comments:

Post a Comment