▼

Monday, 10 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 10.08.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 10 August 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० ऑगस्ट २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात, १७ तारखेपर्यंत विविध उपक्रमांचं आयोजन

·      रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलता येत नसल्यास १५ ऑगस्टपासून कायदेशीर कारवाईचा परिवहन विभागाचा इशारा

·      विविध उपक्रमांच्या माध्यमातून जागतिक आदिवासी दिन साजरा

आणि

·      मराठवाड्यात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला आज यलो अलर्ट

****

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हरघर तिरंगा हे अभियान कालपासून सुरू झालं. येत्या १७ तारखेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत यंदा वंदे मातरम या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या दीडशेव्या वर्धापन दिनाचंही औचित्य आहे. या निमित्ताने देशभरात विविध ठिकाणी वंदे मातरमचं सामूहिक गायन, तिरंगा रॅली, प्रदर्शनं, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे.

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी काल अंदमान आणि निकोबार बेटांवरून हर घर तिरंगा मोहिमेचा प्रारंभ केला. आपला तिरंगा हा आपला अभिमान आहे, त्यामुळे सर्वांनी या मोहिमेत उत्साहाने सहभागी होऊन विकसित भारत घडवण्याच्या कार्यात सहभागी व्हावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल पुद्दुचेरी इथं हर घर तिरंगा यात्रेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. या अभियानांतर्गत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईत लोकभवनात हातात तिरंगा धरून राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत आणि राज्यगीताचं गायन केलं. हर घर तिरंगा मोहिमेत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

**

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद पंचायत विभागाच्यावतीनं हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या अभियानात प्रत्येक घर, दुकान आणि व्यावसायिक आस्थापनांवर तिरंगा फडकवून नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाबाबत जनजागृती करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या अभियानांतर्गत काल तिरंगा यात्रा काढण्यात आली. आज निबंध, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धा, ११ ऑगस्टला तिरंगा रॅली आणि स्वच्छता श्रमदान, तर १२ ऑगस्टला सार्वजनिक इमारतींवर तिरंगा रोषणाई करण्यात येईल. १३ ऑगस्ट रोजी घरांवर तिरंगा फडकवण्यासह राष्ट्रगीत गायन, १४ ऑगस्टला सांस्कृतिक कार्यक्रम, तर स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला ग्रामसभेत ध्वजवंदन, १६ ऑगस्टला देशभक्तिपर चित्रपट प्रदर्शन आणि १७ ला तिरंगा प्रतिज्ञा आणि अभियानाचा समारोप होणार आहे.

**

बीडमध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा उत्साहात शुभारंभ झाला. जिल्हा क्रीडा संकुलातून काल तिरंगा रॅली काढण्यात आली. रॅलीच्या प्रारंभी ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत सादर करण्यात आलं. रॅलीदरम्यान खेळाडू, विद्यार्थी आणि नागरिकांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणा दिल्या. त्यामुळे परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झालं होतं.

**

छत्रपती संभाजीनगर इथल्या गृहिणी तृप्ती पालोदकर यांनी नागरिकांना हर घर तिरंगा या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं. त्या म्हणाल्या…

बाईट  – तृप्ती पालोदकर

**

दरम्यान, भारत छोडो आंदोलनाच्या ८४ व्या वर्धापन दिनानिमित्त काल देशभरात स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली.

****

महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब डांगे यांच्या प्रेरणादायी जीवन कार्यावर आधारित "आम्रवृक्ष" या आत्मचरित्राचं प्रकाशन काल सांगली इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी आष्टा शैक्षणिक संकुलातल्या विविध इमारतींचं उद्घाटनही करण्यात आलं. महाराष्ट्राला पहिल्यांदा टॅंकरच्या जाळ्यातून मुक्त करण्याचं श्रेय अण्णासाहेब डांगे यांना जात असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी, त्यांच्या कार्याला उजाळा दिला.

शेतकऱ्यांची कर्जमाफी, लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी या जन्म गावचा कायापालट करण्यासाठी ७०० कोटी रुपयांचं सुरू असलेलं काम, त्याचबरोबर वाटेगाव इथं देखील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक तयार करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान, फडणवीस यांनी काल कोल्हापूर महापालिकेच्या सुमारे एक हजार ८५० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं. कोल्हापूर-सांगलीत पूरनियंत्रणासाठी महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम पुन्हा मार्गी लावण्यात आला असून, संपूर्ण पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जाणार असल्याचं ते म्हणाले. ३५ ते ४० टीएमसी पुराचं पाणी डायव्हर्शन कॅनलद्वारे दुष्काळी तालुके, उजनी धरण आणि पुढे मराठवाड्याकडे वळवण्याची योजनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली.

****

राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठीही बोलता येत नसल्यास १५ ऑगस्टपासून कायदेशीर कारवाईचा इशारा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. अमराठी चालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या मराठी भाषा प्रशिक्षण अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत एक लाखांहून अधिक चालकांनी प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या चालकांना १७ ऑगस्टला प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात येणार असल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली. उर्वरित अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांनी १५ ऑगस्टपूर्वी मराठी भाषा प्रशिक्षण पूर्ण करून या संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं.

****

जागतिक आदिवासी दिन काल साजरा करण्यात आला. १९९४ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने या दिवसाला मान्यता दिली. जगभरातल्या आदिवासींचे हक्क, संस्कृती, परंपरा, भाषा आणि सामाजिक-आर्थिक विकासाबाबत जनजागृती करणं तसंच त्यांच्या योगदानाचा गौरव करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. “आदिवासी सुईणींचा सन्मान: जीवन आणि आरोग्याचे संरक्षण” ही यंदाच्या दिनाची संकल्पना आहे. नागपूर इथं काल आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या संख्येन एकत्र येत  आदिवासी दिन उत्साहात साजरा केला. विधानभवन परिसरात गोंड राजे बख्त बुंदेल शाह तसंच आदिवासी गोवारी शहीद स्मारक इथं अभिवादन करण्यासाठी  नागपूरसह विविध भागांतून हजारो आदिवासी समाज बांधव एकत्र आले होते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, आणि जनजागृतीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. गडचिरोली आणि गोंदिया शहरात देखील जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.

****

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमात परभणी जिल्ह्याने संगणकीकरणाचं काम शंभर टक्के पूर्ण करत मराठवाडा विभागात प्रथम, तर राज्यात एकूण कामगिरीत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय प्रलंबित बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करून संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे अंतिम टप्प्यातल्या कामकाजात सातत्य आणि गतिमानता कायम राहिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

आषाढी एकादशीचा सोहळा पूर्ण करून पंढरपूरहून शेगावकडे पायी परतणाऱ्या श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखीचं काल जालना शहरात आगमन झालं. महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत यांनी पालखीचं स्वागत केलं. उद्या ११ तारखेला जिजामाता कमान इथून श्री दत्त आश्रममार्गे पालखी सिंदखेडराजाकडे प्रस्थान करणार आहे.

****

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचं विभागीय अधिवेशन काल छत्रपती संभाजीनगर इथं पार पडलं. यावेळी साहित्य, कला, पत्रकारितेसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २६ मान्यवरांना मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. लेखणीची क्रांती या विषयावर झालेल्या चर्चासत्रात ज्येष्ठ पत्रकारांनी सहभाग घेऊन आपली मतं मांडली.

****

छत्रपती संभाजीनगर इथं ‘मेक देम स्माईल फाउंडेशन’ च्या वतीनं काल यशस्वी शिक्षकांच्या गुणवंत पाल्यांच्या सत्कार करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, फाउंडेशनचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. श्रीरंग देशपांडे यावेळी उपस्थित होते. वैयक्तिक यश, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धीपेक्षा समाजासाठी केलेल्या सेवेतून मिळणारं समाधान अधिक मोलाचं असल्याचं मत प्र-कुलगुरू वक्ते यांनी यावेळी व्यक्त केलं. युवकांचा विचार जसा असेल, तसं देशाचं भविष्य घडेल. त्यामुळे युवकांचे विचार प्रखर, सकारात्मक, संवेदनशील आणि चैतन्यमय असणे आवश्यक असल्याचं ते म्हणाले.

****

नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळावा आणि त्यांना दोन लाख रुपयांचं अनुदान द्यावं, या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या शिरूर ताजबंद इथंल्या निवासस्थानासमोर काल ठिय्या आंदोलन करण्यात आलं. आंदोलनापूर्वी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकारमंत्र्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं.

****

येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

No comments:

Post a Comment