Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 11
August 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ ऑगस्ट २०२६ दुपारी १.०० वा.
****
नीट मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान कथित
पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं
कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित झालं.
लोकसभेत आजचं कामकाज सुरु झाल्यावर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा
तास घेण्याचा प्रयत्न केला, परंतू विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस
कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन
देण्याची मागणी त्यांनी लाऊन धरली.
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी कालच स्पष्ट
केले होते की, विद्यार्थ्यांशी संबंधित या मुद्द्यावर
उत्तर देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तयार आहेत, असं अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं. त्यांनी विरोधी पक्षाच्या
सदस्यांना सभागृहाचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं. वारंवार
होणाऱ्या व्यत्ययाबद्दल अध्यक्षांनी चिंता व्यक्त केली, मात्र तरीही गदारोळ सुरुच रहिल्यानं त्यांनी कामकाज स्थगित केलं.
याच मुद्द्यावरून राज्यसभेतही विरोधकांनी गदारोळ केला.
११ वाजता सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर मंत्र्यांनी त्यांच्या संबंधित मंत्रालयांची
कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवली. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार, ग्रामीण विकास आणि पंचायती राज, परिवहन, पर्यटन आणि संस्कृती, तसंच सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण या विभागांशी संबंधित संसदीय
स्थायी समित्यांचे अहवालही सादर करण्यात आले. विरोधकांच्या गदारोळातच अध्यक्ष सी. पी.
राधाकृष्णन यांनी शून्यकाळ सुरू केला, मात्र गदारोळ न थांबल्यानं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर
दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.
****
महाराष्ट्र सरकार राज्यभरातल्या परिवहन महामंडळाच्या डेपो
आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्याची
योजना आखत आहे. मुंबईत तारदेव आरटीओ इथं टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक ट्रकला हिरवा झेंडा
दाखवल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. सरकार सार्वजनिक-खाजगी
भागीदारी मॉडेलअंतर्गत उड्डाणपुलांवर चार्जिंग स्टेशन उभारण्याचाही विचार करत असल्याचं
त्यांनी सांगितलं. प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने वापरण्याचं आवाहन सरनाईक
यांनी केलं असून, २०३६ पर्यंत आपल्या
सर्व बसेस इलेक्ट्रिक बसेसमध्ये रूपांतरित करण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
परभणी इथं ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आज तिरंगा दुचाकी
फेरी काढण्यात आली. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत
यांनी या रॅलीत सहभागी होत वाहने चालवून देशभक्तीचा संदेश दिला. जिल्हा क्रीडा संकुल
इथं ‘वंदे मातरम्’च्या समूहगायनानंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या
हस्ते हिरवा झेंडा दाखवून फेरीला सुरूवात केली. विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, युवक, विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
****
सांगली शहरातही आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं हर घर
तिरंगा अभियानाअंतर्गत हुतात्मा स्मारक ते शहीद स्मारक दरम्यान तीनशे फूट लांबीचा तिरंगा
ध्वज घेऊन तिरंगा पद यात्रा काढण्यात आली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते
हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं. यावेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश
ढंग यांच्यासह माजी सैनिक, शालेय विद्यार्थी, नागरिक सहभागी झाले होते.
****
या अभियानाअंतर्गत धुळे महानगरपालिकेच्या वतीनं आज दुचाकी
फेरी काढण्यात आली. यावेळी महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. फेरीदरम्यान
मार्गातील विविध राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन
करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहातल्या चार हवालदारांना
राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र कारागृह आणि सुधार
सेवा विभागात उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल हवालदार संजय खेडकर, नारायण सोनवणे, अंबरसिंग कारभारी नागलोत आणि सेवानिवृत्त हवालदार बाबासाहेब
गायकवाड यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आलं. पुण्यात येरवडा कारागृह
कर्मचारी भवनात नुकताच हा समारंभ पार पडला. या कार्यक्रमात राज्यातल्या २८ अधिकारी
आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
****
सातारा जिल्ह्यात पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर
आज पहाटे झालेल्या अपघातात चार जण ठार झाले, तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. पुण्याकडून साताऱ्याकडे
जाणाऱ्या कारचालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार दुभाजकाला धडकल्यानंतर विरुद्ध
दिशेनं येणाऱ्या ट्रकवर आदळली. यामुळे हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथं श्रावण महिन्यानिमित्त
होणारी भाविकांची प्रचंड गर्दी आणि मंदिर प्रशासनावरील होणारा ताण लक्षात घेता, श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने व्हीआयपी दर्शन
बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. १३ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर २०२६ या श्रावण मासाच्या कालावधीत
व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
****
No comments:
Post a Comment