Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 11 August
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ११ ऑगस्ट
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
संसदेच्या
दोन्ही सभागृहांमध्ये विविध महत्त्वाची विधेयकं विचार आणि मंजुरीसाठी सूचीबद्ध
करण्यात आली आहेत. लोकसभेत आज केरळ नामांतर विधेयक, २०२६ आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक सूचीबद्ध आहे.
या विधेयकाद्वारे १९६२ च्या कायद्यात सुधारणा करून
महामंडळाची व्याप्ती वाढवण्यासह तंत्रज्ञान आणि प्रक्रियांना प्रोत्साहन देण्याचा
प्रस्ताव आहे.
राज्यसभेत
न्यायाधिकरण सुधारणा विधेयक, २०२६ विचार आणि
मंजुरीसाठी सूचीबद्ध आहे. या विधेयकात राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोगाच्या स्थापनेचा
आणि नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचा प्रस्ताव आहे. हे विधेयक काल लोकसभेत
मंजूर झालं.
****
महाराष्ट्र सरकार राज्यभरातल्या परिवहन महामंडळाच्या डेपो आणि प्रादेशिक परिवहन
कार्यालयांमध्ये इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्याची योजना आखत आहे.
मुंबईत तारदेव आरटीओ इथं टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक ट्रकला
हिरवा झेंडा दाखवल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.
सरकार सार्वजनिक-खाजगी भागीदारी मॉडेलअंतर्गत उड्डाणपुलांवर
चार्जिंग स्टेशन उभारण्याचाही विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने वापरण्याचं आवाहन सरनाईक यांनी केलं असून, २०३६ पर्यंत आपल्या
सर्व बसेस इलेक्ट्रिक बसेसमध्ये रूपांतरित करण्याचं उद्दिष्ट
असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नाशिकच्या महर्षि गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठान आयोजित चतुर्वेद
संमेलन आणि राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार सोहळा काल राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या
उपस्थितीत पार पडला. वेद हे केवळ प्राचीन ज्ञानाचं भांडार
नसून विकासाची दिशा देणारं आणि भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपणारं अमूल्य
ज्ञान आहे. युवकांनी आधुनिक विज्ञानाचं शिक्षण, कृत्रिम
बुद्धिमत्ता, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबरच
प्राचीन ज्ञानापासून प्रेरणा घेत नव भारत घडवावा, असं आवाहन
राज्यपालांनी यावेळी केलं. या कार्यक्रमात वेदाध्ययन
क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया
सुळे यांच्यासह पक्षाच्या सर्व आठ खासदारांच्या शिष्टमंडळानं काल दिल्लीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी राज्याशी संबंधित विविध
मुद्द्यांवर चर्चा झाली. दुष्काळ, कांद्याचे दर,
चंद्रभागा नदीतलं प्रदूषण इत्यादींसह या आपापल्या मतदारसंघातले
प्रश्न या खासदारांनी पंतप्रधानांकडे मांडल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
****
राज्यातली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागातली
रिक्त पदभरती आणि पदोन्नती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश
आबिटकर यांनी काल एका बैठकीत दिले. विविध विभागातले आरोग्य अधिकारी यावेळी उपस्थित
होते.
****
नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी, पेठ,
सुरगाणा या तालुक्यांमध्ये अद्यापही सौम्य भूकंपाच्या धक्क्यांचे
सत्र सुरू आहे. काल दिवसभरात आणि रात्री या परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून या तीनही धक्क्यांची नोंद घेण्यात आली आहे.
दरम्यान,
भूकंपाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातल्या धोकादायक इमारतींचं फेर सर्वेक्षण करण्याचे
आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका आणि
महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत.
****
नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथं श्रावण
महिन्यानिमित्त होणारी भाविकांची प्रचंड गर्दी आणि मंदिर प्रशासनावरील होणारा ताण
लक्षात घेता, श्री
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
१३ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर २०२६ या श्रावण मासाच्या कालावधीत व्हीआयपी दर्शन
पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत केवळ केंद्र सरकार,
राज्य सरकार अथवा जिल्हाधिकारी
कार्यालयामार्फत प्राप्त होणाऱ्या राजशिष्टाचार संबंधीच्या अधिकृत लेखी
पत्रव्यवहारानुसारच अति महत्त्वाच्या व्यक्तींना दर्शन दिले जाईल. याव्यतिरिक्त
इतर सर्व प्रकारच्या व्हीआयपी दर्शन सुविधांवर बंदी घालण्यात आल्याचं ट्रस्टने सांगितलं.
****
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा त्याचबरोबर अवकाश संशोधन
आणि तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळवावी, या
उद्देशानं भंडारा जिल्ह्यातले ४१ विद्यार्थी इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी काल रवाना
झाले. जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या
दौऱ्यासाठी जिल्ह्याच्या सातही तालुक्यांमधून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली
आहे.
****
उत्तराखंडमध्ये कर्तव्य बजावत असताना बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातल्या
३६ वर्षीय सैनिक हरिदास कापसे यांना वीरमरण आलं. कापसे यांच्या पार्थिव देहावर काल
त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
लातूर
इथं राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत, जन्मतः हृदयाचा आजार असलेल्या ६२ बालकांची 'टू-डी इको' तपासणी करण्यात आली. या तपासणीत चाळीस बालकांना उपचाराची गरज असल्याचं दिसून आलं, त्यातल्या पंधरा बालकांवर पुण्यातल्या रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया
करण्यात येणार आहेत.
****
No comments:
Post a Comment