Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 12
August 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ ऑगस्ट २०२६ दुपारी १.०० वा.
****
नीट पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान
झालेल्या कथित पोलिस कारवाईच्या मुद्यावर सरकार आजच संसदेत चर्चा करण्यास तयार असल्याचं
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी
बोलत होते. विरोधकांनी सदनाचं कामकाज सुरळीत चालू द्यावं आणि अध्यक्षांना पत्र देऊन
आज दुपारी तीन वाजेपासून चर्चेसाठी यावं असं ते म्हणाले. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही
नाही, आम्ही कोणत्याही मुद्यावर चर्चा
करण्यास तयार असल्याचं शहा यांनी स्पष्ट केलं.
**
दरम्यान, या मुद्यावरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं
कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत बाधित झालं.
****
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ‘Triumph of the Indian
Republic: My Life, My Struggles’ या आत्मचरित्राचं प्रकाशन आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या हस्ते झालं. रामनाथ कोविंद यांचं आत्मचरित्र भारतीय लोकशाही आणि भारतीय
समाजासाठी एक मौल्यवान वारसा ठरेल, त्यांचा जीवनप्रवास आणि समाज आणि राष्ट्रासाठी दिलेलं त्यांचं
योगदान आपल्याला खूप प्रेरणा देणारं असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
****
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज जागतिक हत्ती
दिनानिमित्त हत्ती आणि लोकांचे सामायिक भविष्य सुरक्षित करण्याच्या देशाच्या वचनबद्धतेचा
पुनरुच्चार केला. भारत १४ राज्यांमधली ३३ हत्ती अभयारण्यं, १५० वैज्ञानिकदृष्ट्या ओळखलेले हत्ती कॉरिडॉर आणि प्रगत देखरेख
प्रणालींच्या माध्यमातून हत्ती संवर्धनाला सातत्याने बळकट करत असल्याचं त्यांनी सामाजिक
माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं आज जागतिक हत्ती दिनानिमित्त इंडियन नॅशनल
ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज – इंटॅक या संस्थेच्या वतीनं ‘गज-लोक’ या विशेष
माहितीपटाचं प्रदर्शन करण्यात येणार आहे. आज संध्याकाळी सहा वाजता एमजीएम विद्यापीठातल्या
व्ही. शांताराम सभागृहात हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.
****
जलसंधारण दिनानिमित्त राज्यात २१ ऑगस्ट रोजी ‘महा वॉकेथॉन-वॉक
फॉर वॉटर’ उपक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या बोधचिन्हाचं अनावरण काल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यावेळी उपस्थित होते. राज्यात
१५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण
अभियान राबवण्यात येणार आहे.
****
मराठी भाषेचं आवश्यक ज्ञान नसलेल्या राज्यातल्या रिक्षा
आणि टॅक्सी चालकांचा वाहन परवाना तीन महिन्यांपर्यंत निलंबित करण्याची तसंच सातत्याने
नियमभंग केल्यास परवाना कायमचा रद्द करण्याची तरतूद महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये करण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
यांनी ही माहिती दिली. मोटार वाहन नियमात विविध महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून, यामध्ये रिक्षा, टॅक्सी तसंच इलेक्ट्रॉनिक मीटर बसवलेल्या ॲप-आधारित मोटार कॅब
आणि त्यांच्या परवाना आणि अधिकृततेशी संबंधित चालक तसंच परमिटधारकांसाठी व्यवहारिक
मराठीच्या ज्ञानाची अट स्पष्ट करण्यात आली आहे.
****
लातूर शहरातल्या दयानंद कला महाविद्यालयात ‘स्त्री स्वयंरक्षणार्थाय
: एक पाऊल सजगतेकडे’ या पुस्तकाच्या विमोचन कार्यक्रमानिमित्त सुमारे ३५० विद्यार्थिनींशी
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी संवाद साधला. सोशल मीडियाचा वापर करताना केलेली छोटीशी
चूकही भविष्यात गंभीर परिणाम घडवू शकते. त्यामुळे अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट
स्वीकारू नयेत, वैयक्तिक माहिती अथवा छायाचित्रे
शेअर करू नयेत आणि कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असा सल्ला तांबे यांनी विद्यार्थिनींना दिला.
****
मुंबईतल्या वीले पार्ले परीसरात एका १२ मजली इमारतीला
काल रात्री लागलेल्या भीषण आगीत २३ वर्षीय तरुणीसह अडीच वर्षाच्या एका बालकाचा मृत्यू
झाला, तर ४ जण जखमी झाले. अग्नीशमन दलाने
पहाटेपर्यंत आग आटोक्यात आणली मात्र बचावकार्यादरम्यान अग्नीशमन दलाचे दोन जवानही जखमी
झाले. आगीचं कारण अद्याप स्पष्ट होउ शकलेलं नाही.
**
दरम्यान, कुर्ला इथल्या अशोक नगर भागात आज पहाटेच्या सुमारास भूस्खलनाची
घटना घडली. या दुर्घटनेत डोंगरउतारावरील माती आणि ढिगाऱ्याचा काही भाग तीन घरांवर कोसळल्याने
६ जण जखमी झाले तर ढीगार्याखालून आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मुंबईच्या
महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची प्रत्यक्ष पाहणी केली.
****
धाराशिव जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या
अमेरिकेतील वैज्ञानिक शैक्षणिक सहलीसाठी दोन कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करून
वितरित करण्यात आला आहे. जिल्हाधिकार्यांनी याबाबतचा प्रशासकीय आदेश जारी केला.
****
No comments:
Post a Comment