▼

Wednesday, 12 August 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.08.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 12 August 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १२ ऑगस्ट २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      एफसीआरए विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा लोकसभेचा निर्णय

·      नीट पेपरफुटी आंदोलनाबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांचं उद्या लोकसभेत निवेदन

·      राज्यातल्या सेवाभरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबत उच्चस्तरीय समिती स्थापन

·      विविध १० नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना राज्यशासनाची मंजुरी

आणि

·      हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत विविध उपक्रमांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद

****

‘परदेशी अंशदान सुधारणा – एफसीआरए २०२६’ हे विधेयक लोकसभेनं आज पुढील छाननीसाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवलं. या समितीत लोकसभेच्या २१ आणि राज्यसभेच्या १० सदस्यांचा समावेश असेल. ही समिती हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपला अहवाल सभागृहास सादर करेल. या विधेयकाचा उद्देश ‘परदेशी योगदान कायदा, २०१०’ मध्ये आणखी सुधारणा करणं तसंच परदेशी योगदानाचा वापर अधिक पारदर्शक आणि जबाबदारीपूर्वक करणं हा आहे.

****

राज्यसभेने आज ‘राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ विधेयक, २०२६’ मंजूर केलं. लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं आहे. या विधेयकाचा उद्देश ‘राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ कायदा, १९६२’ मध्ये आणखी सुधारणा करणं, हा असून या विधेयकामुळे महामंडळाला औद्योगिक उत्पादनांशी संबंधित कामकाज करण्याची मुभा मिळेल. सहकारी विकासाच्या कार्यात गुंतलेल्या कोणत्याही संस्थेला महामंडळाकडून निधी उपलब्ध करून देण्याची तरतूदही या कायद्यात करण्यात आली असून, महामंडळ थेट कोणत्याही सहकारी संस्थेला किंवा सहकारी विकासाच्या कार्यात गुंतलेल्या घटकाला कर्ज आणि अनुदान देऊ शकते.

****

नीट पेपरफुटी आंदोलनाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या दुपारी ३ वाजता लोकसभेत निवेदन करणार आहेत. शहा यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांना ही माहिती दिली. ते म्हणाले -

बाईट - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

 

आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमाराचे, कथित गोळ्या झाडण्याचे आदेश कुणी दिले, असा प्रश्न लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला. जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे आदेश दिले असतील, तर ते अन्यायकारक असून त्याकरता त्यांनी राजीनामा द्यावा, आणि जर गृहमंत्र्यांच्या आदेशाविना पोलीसबळाचा वापर झाला असेल, तर अकार्यक्षमतेच्या कारणावरुन शहा यांनी राजीनामा द्यावा, या मागणीचा पुनरुच्चार गांधी यांनी संसदभवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना केला.

****

सरकार चर्चेसाठी तयार असतांना, विरोधक चर्चेपासून पळ काढत असल्याची टीका संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी केली आहे. विरोधकांची ही भूमिका लोकशाहीसाठी मारक असल्याचं मत रिजीजू यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले -

बाईट - संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू

****

राज्यात विविध सेवाभरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीने सुधारणांसाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात येत आहे. यासंदर्भात आज झालेल्या विशेष बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला. ही उच्चस्तरीय समिती राज्यात प्रत्येक महसुली विभागात जाऊन शिक्षण संस्थाचालक आणि संबंधित घटकांशी तसंच विद्यार्थ्यांशी संवाद साधेल, आणि त्यांची मतं जाणून घेतल्यानंतर सर्वंकष सुधारणांबाबत अहवाल सादर करेल. केंद्र सरकारने पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहारासंदर्भात नुकताच केलेला कायदा अधिक कठोर असल्याने तो महाराष्ट्रातही लागू करण्यासंदर्भात येणाऱ्या पंधरवड्यात प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

****

राज्यातील शहरी भागांचा सुनियोजित विकास व्हावा, यासाठी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विविध १० नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना मंजुरी दिली आहे. यामुळे या नगरपरिषदांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं सोयगाव, बीड, लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ आणि रेणापूर, तसंच परभणी जिल्ह्यातील पालम या नगरपंचायतींचा समावेश आहे. विकास आराखडे मंजूर झाल्यामुळे या गावांमध्ये सार्वजनिक सुविधांसाठी जागा आरक्षित करून त्यांचा नियोजित विकास करणं शक्य होणार आहे.

****

हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत राज्यात सर्वत्र विविध देशभक्तीपर उपक्रम राबवण्यात येत आहेत.

छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतर्फे तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत संस्थेच्या शाळांचं बॅण्ड पथक आणि एनसीसी कॅडेट्स सहभागी झाले. महापौर समीर राजूरकर यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला.

बीड शहरातून आज तिरंगा रॅली काढण्यात आली. भाजपा युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर आणि डॉ. सारिका क्षीरसागर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.

परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित तिरंगा रांगोळी स्पर्धेचं उद्घाटन महापौर सय्यद इकबाल यांच्या हस्ते आज करण्यात आलं.

या स्पर्धेत शालेय तसेच खुल्या गटातील स्पर्धकांनी देशभक्ती, स्वातंत्र्यलढा, भारतीय संविधान, राष्ट्रध्वज, स्वातंत्र्यसैनिक, भारतीय संस्कृती आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयांवर आकर्षक आणि संदेशपूर्ण रांगोळ्या साकारल्या.

 

या अभियानाअंतर्गत धाराशिव इथं उद्या १३ ऑगस्टला सायकल आणि ई-बाईक रॅली काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापासून या रॅलीला सुरुवात होणार असून, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेत समारोप होणार आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकावून राष्ट्रध्वजाप्रती सन्मान आणि देशभक्तीची भावना व्यक्त करावी, तसंच अभियानातल्या विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

****

हर घर तिरंगा अभियानामध्ये युवकांसह आबालवृद्धांनी सहभाग घेऊन देशभक्ती, देशप्रेमाची भावना तेवत राहण्यासाठी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन छत्रपती संभाजीनगर इथले व्यावसायिक व्यंकटेश कमळू यांनी केलं आहे.

बाईट - व्यंकटेश कमळू

****

अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण विरोधात छत्रपती संभाजीनगर इथे आज आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात आंबेडकरवादी विविध पक्षाचे नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.

****

‘नशामुक्त भारत–नशामुक्त बीड’ अभियानांतर्गत बीड जिल्हा पोलिसांच्या वतीने उद्या १३ तारखेला विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती जनजागृती तथा संवादात्मक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या सकाळी ९ वाजता शहरातील सूर्यालॉन्स इथे हा मेळावा होणार आहे. ‘नशामुक्त भारत–नशामुक्त बीड’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावं, असं आवाहन बीड जिल्हा पोलिसांच्या वतीने करण्यात आलं.

****

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला आहे. विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या विनंतीनुसार प्रथम वर्ष प्रवेशाची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ ऐवजी आता २० ऑगस्ट २०२६ करण्यात आली आहे.

****

कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा -आत्मा आणि कृषि विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या १३ तारखेला छत्रपती संभाजीनगर इथे ‘रानभाजी महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. पैठण रस्त्यावरील कृषि विज्ञान केंद्र, इथे हा महोत्सव होणार असून त्यामध्ये वैयक्तिक महिला, महिला बचत गट तसंच शेतकरी गट सहभागी होणार आहेत. महोत्सवात विविध प्रकारच्या रानभाज्यांचे नमुने आणि त्यापासून तयार करण्यात येणाऱ्या पारंपरिक पाककृतींचं सादरीकरण करण्यात येणार आहे.

महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत कृषि विज्ञान केंद्र, इथे उपस्थित रहावं असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

राज्यातल्या धरणांमध्ये सध्या सरासरी ७२ पूर्णांक १८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जलसंपदा विभागाच्या आजच्या आकडेवारीनुसार, राज्यातील सर्व प्रकल्पांमध्ये सुमारे २९ हजार ४४२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

 

सध्या छत्रपती संभाजीनगर विभागात ४९ टक्के, पुणे विभागात ८६ टक्के, कोकण ८७ टक्के, नाशिक विभागात ७५ टक्के, अमरावती विभागात ५९ टक्के, तर नागपूर विभागात ५८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील जायकवाडी धरणात ९३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

****

No comments:

Post a Comment