▼

Thursday, 13 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.08.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 13 August 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ ऑगस्ट २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरु असलेल्या हर घर तिंरगा मोहिमेत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.

याअंतर्गत आज धाराशिव इथं जिल्हा प्रशासनाच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महडदळकर यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे प्रमुख, शालेय विद्यार्थी यात सहभागी झाले होते. या रॅली दरम्यान नशा मुक्त भारत हा संदेश देण्यात आला.

अकोला इथं आज अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली जनजागृतीपर तिरंगा दुचाकी रॅली काढण्यात आली.

हिंगोली नगर परिषदेच्या वतीने तिरंगा मोटरसायकल रॅली काढण्यात आली. अधिकारी कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांनीही या रॅलीत सहभाग नोंदवला.

****

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून, आज लोकसभेत खासगी सदस्यांच्या ठरावांवर चर्चा होणार आहे. विरोधी पक्षांनी नीट पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून केलेल्या जोरदार गदारोळामुळे या अधिवेशनात तब्बल १८ दिवसांचं कामकाज विस्कळीत झालं. तरीही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये काही अत्यंत महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यात आली.

****

वर्ष २०२४ आणि २०२५ साठीचे प्रतिष्ठित 'संगीत नाटक अकादमी फेलोशिप' आणि 'अकादमी पुरस्कार' आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. संगीत, नृत्य, नाट्य, लोककला, आदिवासी कलाप्रकार आणि कठपुतळी कला क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या देशभरातल्या ११५ नामवंत कलाकारांचा या सोहळ्यात गौरव करण्यात येत आहे.

****

गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यातल्या जपतलाई अनुदानित आश्रम शाळेत तीन विद्यार्थिनींच्या सर्पदंशाने मृत्यू झाल्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मारोतराव कोवासे, संस्थेचे सचिव विश्वजित कोवासे यांच्यासह मुख्याध्यापक आणि दोन अधीक्षकांवर काल गुन्हे दाखल करण्यात आले. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी काल शाळेला भेट देऊन पाहणी केली. राज्यातल्या सर्व ५१३ अनुदानित आश्रमशाळांचं येत्या तीन महिन्यांत थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येणार असल्याचं उईके यांनी यावेळी सांगितलं.

****

नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बनावट यादी, खोटी राजमुद्रा, विभागीय आयुक्तांची बनावट स्वाक्षरी आणि मनपा टेंडर नोटीस क्रमांक टाकून बनावट वर्क ऑर्डर देत सुमारे तीन कोटी पाच लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे. यासंदर्भात नाशिक पोलिसांच्या पथकाने जळगाव जिल्ह्याच्या जामनेर इथला संशयित आरोपी तनय महाजन आणि नरेंद्र महाजन यांना अटक केली. तिसरा संशयित शकील अहमद शेख फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

****

लातूर नागरी हक्क विभाग आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था – बार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर इथल्या समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत काल कार्यशाळा घेण्यात आली. या कायद्याच्या जनजागृतीसाठी शासकीय यंत्रणांसोबत नागरिकांचं सहकार्यही महत्त्वाचं असल्याचं मत बार्टीचे डॉ. बबन जोगदंड यांनी यावेळी व्यक्त केलं. ॲट्रॉसिटी कायद्यातल्या तरतुदी, त्याची अंमलबजावणी, नागरिकांचे हक्क आणि कायद्याबाबत घ्यावयाची खबरदारी याविषयी यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं.

****

लातूर जिल्ह्यातल्या नागरिकांच्या तक्रारी समजून घेऊन त्यांचा जलद निपटारा करण्यासाठी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी सुरू केलेल्या ‘जनसंवाद’ उपक्रमांतर्गत काल लातूरमधल्या ४५ तक्रारदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी मालमत्ता वाद, सायबर फसवणूक, दाखल गुन्ह्यांचा तपास, अवैध व्यवसाय यांसह विविध विषयांवरील ४५ लिखित तक्रारी त्यांच्याकडे सादर करण्यात आल्या.

****

पिंपरी-चिंचवडमधल्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर काल १६व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली. हॉकी महाराष्ट्र आणि पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेनं ही स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, यांच्यासह विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. पहिल्या दिवशी झालेल्या सामन्यांमध्ये राजस्थान, जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश, मिझोराम आणि उत्तराखंडच्या संघांनी विजयी सलामी दिली.

****

कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा - आत्मा आणि कृषि विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज छत्रपती संभाजीनगर इथे ‘रानभाजी महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. पैठण रस्त्यावरील कृषि विज्ञान केंद्र, इथे हा महोत्सव होणार असून त्यामध्ये वैयक्तिक महिला, महिला बचत गट तसंच शेतकरी गट सहभागी होणार आहेत. महोत्सवात विविध प्रकारच्या रानभाज्यांचे नमुने आणि त्यापासून तयार करण्यात येणाऱ्या पारंपरिक पाककृतींचं सादरीकरण करण्यात येणार आहे.

****

No comments:

Post a Comment