Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 13
August 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ ऑगस्ट २०२६ दुपारी १.०० वा.
****
संसदेचं कामकाज आज अनिश्चित
काळासाठी स्थगित झालं.
नीट पेपरफुटी प्रकरण, जंतरमंतर वरचं
विद्यार्थ्यांचं आंदोलन, अयोध्येतल्या श्रीराम मंदिरातलं चोरी प्रकरण आदी विविध
मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज गेले १८
दिवस रोखून धरल्यामुळे हे अधिवेशन सुरळीत पार पडू शकलं नाही. आजही शेवटच्या दिवशी लोकसभेत
गदारोळ झाल्यामुळे सभागृहाचं कामकाज अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अनिश्चित काळासाठी तहकूब
केलं.
राज्यसभेतही आजचं कामकाज सुरु
झाल्यावर खाणी आणि खनिजे (सुधारण आणि नियमन) दुरुस्ती विधेयक मंजुर झालं. कोळसा आणि
खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांनी हे विधेयक मांडलं. देशातलं खाण क्षेत्र अधिक कार्यक्षम, गुंतवणुकीस
अनुकूल आणि महत्त्वाच्या खनिजांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अधिक सक्षम करणं हा
या विधेयकाचा उद्देश आहे.
त्यानंतर विविध मुद्यांवरुन
विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही अनिश्चित काळासाठी स्थगित झालं.
दरम्यान, अधिवेशन काळात
लोकसभेत १९ टक्के आणि राज्यसभेत ३० टक्के कामकाज झाल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री
किरेन रिजिजू यांनी दिली. २० जुलैला सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान २५ दिवसांत
दोन्ही सभागृहात एकूण १२ विधेयकं पारित झाल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभेत विरोधकांनी
घोषणाबाजी करत प्रश्नोत्तराचा तास होऊ दिला नाही, त्यांनी कुठल्याही चर्चे सहभाग
घेतला नसल्याचा आरोप त्यांनी केला.
****
वर्ष २०२४ आणि २०२५ साठीचे
प्रतिष्ठित 'संगीत नाटक अकादमी फेलोशिप' आणि 'अकादमी पुरस्कार' आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातून संगीतकार अशोक पत्की, गायक आनंद
भाटे, मुकुंद राम मराठे, अभिनेते अरुण नलावडे, प्रमोद पवार, दिग्दर्शक
ओम कटारे, लोकनृत्य प्रकारात सुभाष आगाशे, कत्थक नृत्यांगना मनिषा साठे यांना यावेळी गौरवण्यात आलं.
संगीत, नृत्य, नाट्य, लोककला, आदिवासी कलाप्रकार आणि कठपुतळी कला क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या देशभरातल्या
११५ नामवंत कलाकारांना या सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आले.
****
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर
देशभरात सुरु असलेल्या हर घर तिंरगा मोहिमेत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.
याअंतर्गत आज धाराशिव इथं
जिल्हा प्रशासनाच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी
अधिकारी प्रियंवदा महडदळकर यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. जिल्हाधिकारी कीर्ती
किरण पुजार, यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे प्रमुख, शालेय विद्यार्थी यात सहभागी
झाले होते. या रॅली दरम्यान नशा मुक्त भारत हा संदेश देण्यात आला.
अकोला इथं आज अधिकारी, कर्मचाऱ्यांचा
समावेश असलेली जनजागृतीपर तिरंगा दुचाकी रॅली काढण्यात आली.
हिंगोली नगर परिषदेच्या वतीने
तिरंगा मोटरसायकल रॅली काढण्यात आली. अधिकारी कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांनीही या रॅलीत
सहभाग नोंदवला.
****
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन
महामंडळाच्या प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि डिजिटल प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सुरू
करण्यात आलेल्या NCMC स्मार्ट कार्डला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत
आहे. १२ ऑगस्टपर्यंत राज्यात तब्बल १ कोटी १ लाख ७३ हजार प्रवाशांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी
नोंदणी केली असून, त्यापैकी ६४ लाख ९१ हजार ६५ कार्ड सक्रिय झाली आहेत. १५
ऑगस्टपासून राज्यभरातल्या सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी या स्मार्ट कार्डच्या नोंदणीची
प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. येत्या एक सप्टेंबरपासून महिला, ज्येष्ठ नागरिक
आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार असून अद्याप नोंदणी
न केलेल्या पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करावी, असे आवाहन
एसटी महामंडळाने केलं आहे.
****
माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव
देशमुख यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त लातूर शहर आणि जिल्ह्यात उद्या १४ ऑगस्ट
रोजी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. आयएमए, इंडियन डेंटल असोसिएशन, होमिओपॅथी
असोसिएशन, निमा आणि विलासराव देशमुख फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या उपक्रमात
२०० हून अधिक रुग्णालयं आणि दोन हजारांहून अधिक डॉक्टर यामध्ये सहभागी होणार असल्याची
माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
****
गडचिरोली जिल्ह्यात धानोरा
तालुक्यातल्या जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेतल्या तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने
मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापकासह अधीक्षकास अटक केली आहे.
तसंच याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मारोतराव कोवासे, संस्थेचे सचिव
विश्वजित कोवासे यांच्यासह मुख्याध्यापक आणि दोन अधीक्षकांवर काल गुन्हे दाखल करण्यात
आले.
****
पालघर जिल्ह्यात विरारच्या
मनवेलपाडा परिसरात अन्न आणि औषध प्रशासनाने श्री आयजी डेअरीमध्ये केलेल्या तपासणीत
मुदतबाह्य दूध, आईस्क्रीम, बिस्किटं, कोल्ड्रिंक आणि विविध पॅकबंद खाद्यपदार्थ आढळून आले. या कारवाईदरम्यान आढळलेल्या
खाद्यपदार्थांबाबत पुढील तपासणी आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याचं
आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment