Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 August 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ ऑगस्ट २०२६ सायंकाळी
६.१०
****
· संसदेचं पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी तहकूब
· पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंघ बादल यांच्यावर नांदेड
इथं हल्ला
· राज्यात नदीजोड प्रकल्पाला येत्या वर्षभरात प्रारंभ-मुख्यमंत्र्यांचं
सुतोवाच
· छत्रपती संभाजीनगर इथं उद्यापासून तीन दिवसीय स्वदेशी एक्स्पोचं
आयोजन
आणि
· २०२४ - २५ चे संगीत नाटक अकादमी पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान
****
संसदेचं पावसाळी अधिवेशन आज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात
आलं. आज सकाळी दोन्ही सदनांचं कामकाज सुरू होताच, वंदे
मातरम् गायनाने अधिवेशनाचा समारोप झाल्याची घोषणा, दोन्ही
सदनांच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी केली. राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन
यांनी कामकाजाचा आढावा घेताना, सभागृहाची प्रतिष्ठा जपण्याचं
आणि भारतीय लोकशाहीच्या परंपरांनुसार आपली संसदीय जबाबदारी पार पाडण्याचं आवाहन त्यांनी
सदस्यांना केलं. २० जुलैपासून सुरू झालेल्या या अधिवेशनात २५ दिवसांच्या कालावधीत एकूण
१९ बैठका झाल्या. अधिवेशन काळात झालेल्या कामकाजाबाबत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू
यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले -
बाईट - संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू
लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्यानंतर आज अध्यक्ष
ओम बिर्ला यांनी बोलावलेल्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने बहिष्कार टाकला. मात्र, द्रविड मुन्नेत्र कळघमच्या नेत्या कनिमोळी यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
राज्यसभेत मात्र सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी बोलावलेल्या
चहापानाच्या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाच्या नेत्या
सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.
****
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि अकाली दलाचे नेते सुखबीरसिंघ
बादल यांच्यावर आज नांदेड इथं हल्ला झाला. नांदेड इथं खासगी दौऱ्यावर आलेले बादल यांनी
आज मुदखेड तालुक्यात मातासाहेब गुरुद्वारा इथं एका कार्यक्रमासाठी भेट दिली असता, एका निहंगाने त्यांच्यावर हल्ला केला. तीक्ष्ण हत्याराने झालेल्या या हल्ल्यात
बादल यांच्या हाताला इजा झाली, त्यांना नांदेडमधल्या खाजगी
रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर
असल्याचं,
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितलं. ते म्हणाले -
बाईट - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
दरम्यान, सदर हल्लेखोराला ताब्यात घेण्यात
आलं आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी मातासाब गुरुद्वारा इथं भेट देऊन
घटनेची माहिती घेतली. निलाभ रोहन यांनीच या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना
अवगत केल्याचं,
जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सांगितलं.
****
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात MMRDAच्या विविध प्रकल्पांचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतल्या
सह्याद्री राज्य अतिथीगृहातून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण झालं. यावेळी
बोलताना मुख्यमंत्र्यांनी, ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्यामुळे
९० मिनिटांचं अंतर १२ मिनिटांमध्येच पार करता येईल, असं
सांगितलं.
मुंबईत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या वर्धापन दिन
सोहळ्यालाही मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं. पश्चिम वाहिनी नद्यांचं समुद्रात वाहून
जाणारं पाणी,
गोदावरी खोऱ्यात आणल्यास, उत्तर
महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुटीची खोरी संतुलित करता येतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर
याच वर्षी किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला नदीजोड प्रकल्पाचं काम सुरू करणार असल्याची
माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
****
शेतकऱ्यांच्या जमीन हक्कांचं संरक्षण, भूसंपादनातील वाद कमी करणं आणि मालमत्ता नोंदणी प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी
राज्य सरकार विविध निर्णय घेत असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी
दिली. ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रत्यक्ष ताबा आणि वहिवाट असूनही
सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्डवर नाव नसलेल्या सुमारे दोन लाख ३१ हजार शेतकऱ्यांच्या
जमिनी त्यांच्या नावावर करण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येणार असल्याचं, त्यांनी सांगितलं. आधी मोजणी, मग रजिस्ट्री आणि त्यानंतर फेरफार
ही व्यवस्था लागू करण्यात येणार आहे. यासाठी येत्या डिसेंबर महिन्यात कायद्यात आवश्यक
बदल करणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.
****
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग
मंत्रालयाच्यावतीने छत्रपती संभाजीनगर इथं उद्यापासून तीन दिवसीय स्वदेशी एक्स्पो २०२६
ची सुरुवात होणार आहे. केंद्रीय क्रीडा आणि युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या
हस्ते या प्रदर्शनाचं उदघाटन होणार आहे. देशभरातून ७५ हून अधिक प्रदर्शक या प्रदर्शनात
सहभागी होणार असून नागरिकांसाठी प्रवेश पूर्णपणे मोफत आहे, जास्तीत
जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असं
आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
****
२०२४ - २५ या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी गौरववृत्ती
आणि पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात
आले. यामध्ये ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनईवादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वराडकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार यांचा समावेश आहे.
युवा कलावंतांसाठीचे उस्ताद बिस्मिल्लाखाँ युवा पुरस्कार यंदा
देशातल्या १०६ कलाकारांना देण्यात आले. महाराष्ट्रातले गायक कृष्णा बोंगाणे, अंकिता जोशी, भारूड गायक भावार्थ देखणे, कठपुतळी कलावंत बालकृष्ण मासगे, संवादिनीवादक तन्मय देवचके, आणि जागर कलावंत प्रवीण जाधव यांना यंदा हा पुरस्कार मिळाला आहे.
****
राज्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी घरोघरी भेट देऊन गणना
प्रपत्र भरून घेण्याची मुदत येत्या सोमवारी १७ ऑगस्टला संपत आहे. राज्यात एकूण नऊ कोटी
७८ लाख ५४ हजार ४९ मतदार असून, त्यापैकी सुमारे ७८ टक्के म्हणजे
सात कोटी ६२ लाख ९९ हजार ३६० मतदारांचे गणना प्रपत्र भरुन तसंच स्वाक्षरी करुन प्राप्त
झालेले आहेत. प्रत्यक्ष गृहभेट दिल्यानंतर सापडू न शकलेले, कायमस्वरूपी
स्थलांतरीत झालेले, मृत झालेले, तसंच
इतर मतदारांच्या नावांच्या याद्या, राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या
मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना उपलब्ध करून देण्याची कार्यवाही चालू आहे. सर्व जिल्हाधिकारी
कार्यालयांच्या अधिकृत संकेतस्थळावर अशा याद्या प्रसिध्द करण्याची कार्यवाही सुरू आहे.
****
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरु असलेल्या हर
घर तिंरगा मोहिमेत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अंतर्गत उद्या छत्रपती संभाजीनगर
इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे.
धाराशिव इथं जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज तिरंगा रॅली काढण्यात
आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महडदळकर यांनी या रॅलीला
हिरवा झेंडा दाखवला. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, यांच्यासह
सर्व शासकीय विभागांचे प्रमुख, यात सहभागी झाले होते.
लातूर इथं जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण
विभागाच्यावतीने तिरंगा रॅली काढण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषा पाटील, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला
हिंगोली नगर परिषदेच्या वतीने तिरंगा मोटरसायकल रॅली काढण्यात
आली. अधिकारी कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांनीही या रॅलीत सहभाग नोंदवला.
दरम्यान, हर घर तिरंगा अभियानात सर्व
नागरिकांनी सहभागी व्हावं, आणि आपापल्या घरावर तिरंगा ध्वज
फडकवण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर इथले सैन्यदलातून निवृत्त झालेले कॅप्टन सुरेंद्र
सुर्वे यांनी केलं आहे. ते म्हणाले -
बाईट – निवृत्त कॅप्टन सुरेंद्र सुर्वे
****
विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी कामांचं नियोजन करून ग्रामीण
भागाचा शाश्वत विकास साधावा, असं आवाहन रोजगार हमी योजना
मंत्री भरत गोगावले यांनी केलं आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हास्तरीय पंच संमेलनात
ते बोलत होते. गावांच्या विकासासाठी कायमस्वरूपी आणि उपयुक्त मालमत्ता निर्माण करणं
हा विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियानाचा उद्देश असल्याचं गोगावले यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या ३६ हजार २११ कंपन्या विविध त्रुटींमुळे कंपनी कायद्यान्वये
बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, या आकडेवारीचा चुकीचा अर्थ लावून
विरोधक राज्याची बदनामी करत असल्याची टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे.
ते गडचिरोली इथं माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
****
No comments:
Post a Comment