▼

Friday, 14 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 14 August 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ ऑगस्ट २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

विभाजन विभीषिका स्मृति दिन देशभरात आज पाळला जात आहे. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्यासाठी देशाची फाळणी होऊन मोठी किंमत मोजावी लागली. या फाळणीमुळे कोट्यवधी बंधू-भगिनी विस्थापित झाले आणि हिंसाचारात अनेकांनी प्राण गमावले. त्यांच्या या त्यागाची, संघर्षाची आणि बलिदानाची आठवण ठेवण्यासाठी हा दिवस पाळला जातो. या दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून, नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय परिसंवादाला उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन संबोधित करणार आहेत.

विभाजन विभीषिका स्मृति दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फाळणीच्या वेळी प्राण गमावलेल्या नागरीकांना आदरांजली वाहिली आहे. फाळणीच्या भीषण शोकांतिकेत असंख्य कुटुंबे उध्वस्त झाली, प्रियजन दुरावले आणि अथांग वेदना सहन कराव्या लागल्या. मात्र, या संकटावर मात करत लोकांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, अशा शब्दांत पंतप्रधानांनी पीडितांच्या धैर्याचं स्मरण केलं.

****

स्वातंत्र्य दिनानिमित्त गृह मंत्रालयाने पोलीस, अग्निशमन सेवा, होमगार्ड, नागरी संरक्षण आणि सुधार सेवांमधल्या एक हजार ५७ जवानांना शौर्य आणि सेवा पदकं जाहिर केली आहेत. यात ३०१ शौर्य पदकांची यादी प्रसिद्ध केली असून, यामध्ये पोलीस दलातल्या २७२ आणि अग्निशमन दलातल्या २९ जवानांचा समावेश आहे. एकूण ९२ राष्ट्रपती पदकंही प्रदान करण्यात आली आहेत. यामध्ये पोलीस सेवेसाठी ८३, अग्निशमन सेवेसाठी चार, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेसाठी तीन आणि सुधार सेवेसाठी दोन पदकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, ६६४ प्रशंसनीय सेवा पदकंही प्रदान करण्यात आली आहेत. यामध्ये पोलीस सेवेतल्या ६०६, अग्निशमन सेवेतल्या २८, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेतल्या १८ आणि सुधार सेवेतल्या १२ जवानांचा समावेश आहे.

****

राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला पाच हजार कोटी रुपयांचं भांडवली कर्ज मंजूर करण्यात आलं आहे. महामंडळाकडून एवढ्या मोठ्या रकमेचं कर्ज मंजूर होणारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही देशातली पहिली सहकारी बँक ठरली आहे. या निधीचा वापर सभासद सहकारी संस्थांना पुढील कर्जपुरवठ्यासाठी करण्यात येणार असून, त्याचा व्यापक लाभ सहकार क्षेत्राला होईल, असं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या ड्रोन उद्योगाच्या विकासासाठी धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, उद्योजकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवणं आणि त्यांच्या अडचणींचं तातडीने निराकरण करण्यासाठी कृती दल स्थापन करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली हे कृती दल काम करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ड्रोन क्षेत्रातल्या उद्योजकांच्या सूचना आणि अपेक्षा जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक पार पडली. यावेळी ड्रोन उद्योगाच्या विकासासाठी विविध धोरणांमध्ये असलेल्या तरतुदी एकत्रित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

****

मुंबईत भारतीय कॅन्सर सोसायटी आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने मेंदू आणि मणक्याच्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी ‘अमृत स्पर्श’ हे विशेष पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आलं आहे. या केंद्रात फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, मानसोपचार आणि योग यांसारख्या विविध सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना या सेवा मोफत किंवा सवलतीच्या दरात मिळणार आहेत.

****

पुढच्या वर्षी पुण्यात होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ९९ नांदी संमेलनं आयोजित केली जाणार आहेत. या शृंखलेतलं पहिलं नांदी संमेलन आज पुण्यात होणार आहे. पुण्यातल्या हिराबागेत १८७८ मध्ये पहिल्यांदा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पहिली ग्रंथकार सभा बोलावली गेली; त्याच ठिकाणी म्हणजे ज्योत्स्ना भोळे सभागृहात हे संमेलन होत आहे. केवळ निमंत्रितांसाठी आयोजित या संमेलनात पहिल्या ग्रंथकार संमेलनाचं दृश्य नाट्यरूपात सादर केलं जाणार आहे. त्यानंतर शतायुषी विद्वजन यास्मिन शेख आणि शि. द. फडणीस यांचा आणि शताब्दी पूर्ण केलेल्या १५ संस्थांचा गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे.

****

नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर तळेगाव शिवारात खासगी बंगल्यात सुरू असलेल्या बनावट नोटांच्या कारखान्यावर नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत ‘केमिकल’ आणि विशेष कागदाच्या साहाय्याने ५०० रुपयांच्या बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली असून, तब्बल १२ लाख १९ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

****

नायजेरियात लागोस इथं झालेल्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी करत ३५ पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. भारतीय संघाने १३ सुवर्ण, आठ रौप्य आणि १४ कांस्य पदकांची कमाई केली.

****

No comments:

Post a Comment