Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 15
August 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ ऑगस्ट २०२६ दुपारी १.०० वा.
****
८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमाचं
आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज
फडकावत राष्ट्राला संबोधित केलं. देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक प्रगतीचा व्यापक आराखडा त्यांनी ‘सप्तधारा’
या संकल्पनेद्वारे मांडला. देशाने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतल्याचं पंतप्रधानांनी
सांगितलं. भारत ‘मेड इन इंडिया’ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ क्षेत्रात जागतिक
नेतृत्वाकडे वाटचाल करत असल्याचंही ते म्हणाले.
ऊर्जा क्षेत्रात हायड्रोजन ट्रेनची सुरुवात आणि पाच नवीन
अणुऊर्जा प्रकल्पांचं उद्दीष्ट असून सहा कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं नवं लक्ष्य
ठेवल्याचं पंतप्रधान म्हणाले.
****
स्वातंत्र्यदिनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
हस्ते मुंबईतील मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं. महाराष्ट्र देशातील सर्वात मोठी
अर्थव्यवस्था असून विकसित भारताच्या संकल्पनेत राज्याची सर्वात महत्वाची भुमिका राहणार
असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. राज्याचा आर्थिक विकासदर आठ पूर्णांक शुन्य आठ टक्के
असून शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचवण्याचा सरकारचं ध्येय असल्याचं ते म्हणाले. मराठवाडा
विदर्भात नदीजोड प्रकल्प राबवून राज्याला दुष्काळमुक्त करणार असल्याची ग्वाही यावेळी
मुख्यमंत्र्यांनी दिली.
****
भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त आज पुणे इथं विधान भवन
प्रांगणात मुख्य शासकीय सोहळा उत्साहात पार पडला. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव
वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, त्यांनी राष्ट्रध्वज तिरंग्याला मानवंदना दिली.
****
लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सार्वजनिक
बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते मुख्य
शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. ‘नोकरीऐवजी उद्योग आणि रोजगार निर्माण करणारी पिढी बना
आणि तंत्रज्ञान निर्माते व्हा,’ असं आवाहन पालकमंत्री भोसले यांनी यावेळी तरुणांना केलं. पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील
५४ हजार ३८८ शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली आहे, त्यापैकी २२ हजार ९६३ शेतकऱ्यांसाठी १५९ कोटी रुपयांचा निधी
वितरित करण्यात आला असल्याचं पालकमंत्री भोसले यांनी यावेळी सांगितलं.
****
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर
मनोहर चासकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी ‘वंदे मातरम्’ गीताचं सादरीकरण
पार पडलं.
****
नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर
मोहन भागवत यांच्या हस्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं.
****
दिल्लीतील विशेष जलदगती न्यायालयानं ‘नीट-यूजी’ परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयला
पुढील तपास करण्याची परवानगी दिली आहे. या प्रकरणी तपासादरम्यान नवीन पुरावे समोर आले
असून आधीच्या आरोपींव्यतिरिक्त या प्रकरणातील अन्य बाबींचा तपास सुरू ठेवण्यासाठी सीबीआयने
न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. दरम्यान, UGC-NET, CSIR-NET आणि ICAR AIEEA तसंच AICE 2026 च्या तात्पुरत्या उत्तरतालिका उद्या प्रसिद्ध केल्या जाणार असल्याचं
राष्ट्रीय तपास संस्था एन टी ए नं जाहीर केलं तसंच परीक्षा आणि उत्तरतालिकांबाबत केवळ
एजन्सीच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असा सल्लाही उमेदवारांना दिला आहे.
****
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मदत करण्यासाठी केंद्रीय
मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा
पवार यांनी सांगितलं आहे. काल बँकेच्या आढावा बैठकीत त्यांनी अवसायक, प्रशासक आणि ‘एमसीसी’ बँकेनं तातडीनं यासंदर्भात कार्यवाही
करण्याचे निर्देश दिले. चालू हंगामातील पीक कर्जवाटप, शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी, राज्य बँकेकडे प्रलंबित प्रस्ताव आणि शासनाकडून मिळणारा
व्याज परतावा याबाबतचा आढावा घेण्यात आला तसंच कृषी आणि अकृषीक कर्जदारांच्या स्थितीवरही
बैठकीत चर्चा झाली.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या
पहिल्या टप्प्यात हिंगोली जिल्ह्यातील आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या साडेसात हजारांपेक्षा
अधिक पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये ६२ कोटी ५४ लाख रुपये थेट जमा करण्यात आले
आहेत. तसंच हिंगोलीतील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवून देण्यास
प्राधान्य असल्याचं अन्न आणि औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ
यांनी म्हटलं आहे. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री झिरवाळ यांच्या हस्ते
ध्वजारोहण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते.
****
क्रिकेट - भारत आणि श्रीलंकेदरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या
मालिकेतला पहिला सामना श्रीलंकेतील गाले आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु आहे. प्रथम फलंदाजी
करताना शेवटचं वृत्त हाती आलं तोपर्यंत भारतीय संघानं एक गडी बाद १०१ धावा केल्या आहेत.
****
No comments:
Post a Comment