▼

Saturday, 15 August 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 15.08.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 15 August 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १५ ऑगस्ट २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      स्वातंत्र्यदिन सर्वत्र उत्साहात साजरा; लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात ‘सप्तधारा’ संकल्पनेवर पंतप्रधानांचा भर

·      विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावेल -  मुख्यमंत्र्यांना विश्वास

·      मराठवाड्यात विविध कार्यक्रमातून स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

·      महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध योजनांची संख्या आता १०५

आणि

·      श्रीलंकेविरुद्ध पहिल्या क्रिकेट कसोटीत भारताची स्थिती भक्कम

****

देशभरात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटबंदीवर राष्ट्रध्वज फडकावला. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात कृषी आणि अन्न प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, दळणवळण, संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता, हरित आणि सागरी अर्थव्यवस्था आणि आरोग्य मनोरंजन पर्यटन या ‘सप्तधारा’ संकल्पनेवर विशेष भर दिला. ते म्हणाले -

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

१४० कोटी देशवासियांच्या पुरुषार्थाच्या बळावर ‘विकसित भारत २०४७’ चं स्वप्न साकार करु, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. देशाच्या विकासाला नवी गती देण्यासाठी राष्ट्राला सर्व क्षेत्रांत आत्मनिर्भर करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. दरम्यान, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वंदे मातरम् हे गीत लाल किल्ल्यावर गायलं गेलं. याविषयी पंतप्रधान म्हणाले -

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातल्या युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. जनगणनेच्या वेळी कुटुंबाची बिनचूक माहिती संगणकावर भरली जावी याकरता तंत्रज्ञान स्नेही तरुण पिढीने पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. देश नक्षलमुक्त करण्याचा संकल्प पूर्ण झाला असून पूर्वीच्या नक्षल प्रभावित भागात आता विकास, विश्वास आणि प्रयास यांचा तिरंगा फडकत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.

****

विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत मंत्रालयात ध्वजवंदन कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअपची राजधानी झाली असून, राज्यात गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले -

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते आज पुण्यातल्या विधान भवन इथं तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते मुंबईत विधान भवन ध्वजारोहण झालं.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात  ध्वजारोहण झालं.  यावेळी केलेल्या भाषणात शिंदे म्हणाले -

बाईट- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

****

मराठवाड्यातही झेंडावंदनासह दुचाकी फेऱ्या, देशभक्तीपर गीतगायन आदी कार्यक्रमातून स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून -

स्वातंत्र्य दिनानिमित्त मराठवाड्यात सर्वत्र ध्वजारोहणासह अनेक कार्यक्रम पार पडले. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. ध्वजारोहणानंतर केलेल्या भाषणात पवार यांनी बीड जिल्ह्याला प्रत्येक क्षेत्रात नव्या उंचीवर नेण्याचा मानस व्यक्त केला. त्या म्हणाल्या -

बाईट - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

 

छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या सहाय्यासाठी अत्याधुनिक यंत्रांचं लोकार्पण शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलतांना शिरसाट यांनी, देशाच्या अस्मितेसाठी सर्वांनी एकजुटीने सज्ज राहण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले -

बाईट - पालकमंत्री संजय शिरसाट

 

जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. मुंडे यांनी जिल्हा वासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला.

 

परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात प्रांगणात पालकमत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. समाजकल्याण विभागाच्या स्टॉलचे लोकार्पण तसंच जल सप्ताहाच्या बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं.

 

हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहणानंतर बोलताना पालकमंत्र्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत केल्याचं सांगत, शासन यापुढेही सर्वसामान्य शेतकऱ्याबरोबर असल्याचं आश्वस्त केलं.

 

लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. ‘नोकरी शोधणारी पिढी नव्हे, तर उद्योग आणि रोजगार निर्माण करणारी पिढी होण्याचं आवाहन भोसले यांनी यावेळी केलं. जिल्हाधिकारी भारत बास्टेवाड यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. हुतात्मा सैनिकांच्या वारसांचा यावेळी सत्कार करून त्यांना प्रत्येकी दोन हेक्टर जमीन प्रदान करण्यात आली.

 

नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं. या सोहळ्यास महापौर कविता मुळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री सावे यांनी आपल्या भाषणात जिल्ह्यातील विकास कामांची माहिती देत शेतकरी कर्जमाफीचा विशेष उल्लेख केला.

 

धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, सर्व अधिकारी तसंच लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. धाराशिव जिल्ह्यातील वीस शालेय विद्यार्थ्यांची नासा या संस्थेला भेट देण्यासाठी निवड झाल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

सर्वच जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी, उल्लेखनीय सेवा देणारे अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. व्यसनमुक्त भारत तसंच मृद आणि जलसंधारणाची सामुहिक शपथही आजच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर देण्यात आली.

 

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉा विजय फुलारी यांच्या हस्ते, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते तर परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉ इंद्र मणी मिश्रा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

हर्षवर्धन दीक्षित, छत्रपती संभाजीनगर

****

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा अभियान सर्वत्र राबवण्यात येत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ प्रवीण वक्ते यांनी नागरिकांना या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

बाईट - डॉ प्रवीण वक्ते

****

महाडीबीटी पोर्टलवर आज नव्यानं २९ योजनांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं आहे. यामुळे महाडीबीटीवर उपलब्ध योजनांची संख्या आता १०५ झाली आहे. शासनाच्या उर्वरित सर्व योजनाही टप्प्याटप्प्याने या एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न असून, त्याद्वारे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेणं अधिक सोपे होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

****

धाराशिव जिल्ह्यात शिंगोली इथल्या वन विभागाच्या जागेवर हरित धाराशिव अभियानाअंतर्गत १० लाख वृक्ष लागवडीला आज सुरुवात झाली. या अभियानात शासकीय अधिकारी - कर्मचाऱ्यांसह, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था तसंच स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत केलेल्या रस्त्यांच्या कामांच्या गुणवत्तेबाबत आजपासून १९ ऑगस्ट दरम्यान प्रत्यक्ष पाहणी करून गुणवत्ता तपासली जाणार आहे.

****

क्रिकेट - भारत आणि श्रीलंकेदरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना श्रीलंकेतील गाले इथल्या मैदानावर सुरु आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत दोन बाद २८८ धावा केल्या आहेत. आजचा खेळ संपला तेव्हा देवदत्ता पडिक्कल १३१ तर ऋषभ पंत २७ धावांवर खेळत होते.

****

No comments:

Post a Comment