Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 August
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ ऑगस्ट २०२६ सकाळी ७.१० मि.
****
· देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं
आयोजन
· विकासाचा लाभ समाजातल्या अखेरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याला सरकारचं प्राधान्य-राष्ट्रपतींचं
प्रतिपादन
· छत्रपती संभाजीनगर इथल्या तिरंगा पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
· जालना इथं रेशीम कोष बाजारपेठेच्या इमारतीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
· बीड इथं ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार वसतिगृहाचं उद्घाटन
आणि
· स्वदेशी उत्पादनांचा वापर करून देश विकासात योगदान द्यावं- केंद्रीय राज्यमंत्री
रक्षा खडसे यांचं आवाहन
****
देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन
आज साजरा होत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी
काल राष्ट्राला संबोधित केलं. संस्कृती आणि विकासाच्या समन्वयातून आपला देश प्रगतीपथावर
अग्रेसर असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपतींनी केलं. विकासाचा लाभ समाजातल्या अखेरच्या
व्यक्तीपर्यंत पोहोचावा, याला आपल्या सरकारचं प्राधान्य असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं.
त्या म्हणाल्या…
बाईट - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
आपल्या भाषणात राष्ट्रपतींनी
देशाची अर्थव्यवस्था, संरक्षण दलांची सज्जता, महिला सक्षमीकरण,
पर्यावरण संरक्षण, क्रीडापटूंची कामगिरी,
नक्षलवाद निर्मुलन, युवक कल्याण, उद्योग आणि कृषी विकास यासह जनधन योजना, अन्नसुरक्षा
योजना तसंच पीएम किसान सन्मान योजनेसह देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांचा
आढावा घेतला.
फाळणीच्या आठवणी तसंच स्वातंत्र्यावेळी
विविध संस्थांनामध्ये विखुरलेला देश एकसंध केल्याबद्दल, तत्कालीन
उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी राष्ट्रपतींनी कृतज्ञता व्यक्त केली.
त्या म्हणाल्या…
बाईट - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
****
राष्ट्रपतींनी काल ७८ शौर्य
पुरस्कार जाहीर केले. त्यात ९ किर्ती चक्र, २० शौर्य चक्र, ४१ सेना पदक, ३ नौसेना पदक आणि ५ वायू सेना पदकांचा समावेश
आहे.
****
स्वातंत्र्यदिनानिमित्त राजधानी
दिल्लीत लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी सात वाजता ध्वजारोहण
होणार आहे. मुंबईतील मंत्रालयात सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या हस्ते तर पुण्यात राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण
होणार आहे. राज्यात जिल्हा मुख्यालयांवर संबंधित पालकमंत्री आणि मंत्र्यांच्या हस्ते
तसंच सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात
येणार आहे.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या उपस्थितीत काल छत्रपती संभाजीनगर इथं भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. औरंगपुरा
इथं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून निघालेल्या या
पदयात्रेत मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, भाजप प्रदेशाध्यक्ष
रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे,
राज्य मंत्रिमंडळातले अनेक सदस्य, लोकप्रतिनिधी,
शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय
छात्र सेनेचे कॅडेट्स तसंच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी
केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी नव संशोधनात तरुणाई अग्रेसर असून, त्याबळावरच विकसित भारत म्हणून वाटचाल करत असल्याचं सांगितलं. मराठवाड्याच्या
पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही, याचा मुख्यमंत्र्यांनी
पुनरुच्चार केला. ते म्हणाले…
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या पदयात्रेनंतर स्वयंसेवकांच्या
पथकाने संपूर्ण परिसराची स्वच्छता केली.
****
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते काल जालना इथं रेशीम कोष बाजारपेठेच्या नवीन इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं,
यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी, जालन्यात रेशीम
वस्त्राचा नवीन ब्रॅण्ड तयार करण्याचं आवाहन केलं. शेतकऱ्यांना आर्थिक विकासासाठी रेशीम
उद्योग हा उत्तम पर्याय असून, उत्पादनासोबतच त्याची व्हॅल्यू
चेन तयार होण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली.
रेशीम कोष बाजारपेठेच्या विविध
प्रक्रिया विभागांची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या वेळी
सात प्राथमिक आरोग्य केंद्रांचं लोकार्पण, तसंच अंबड इथं नवीन पोलिस ठाण्याचं उद्घाटनही
करण्यात आलं.
****
विभाजन विभीषिका स्मृति दिवस
देशभरात काल पाळण्यात आला. या निमित्ताने परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने कल्याण
मंडप इथं फाळणीच्या आठवणी दाखवणाऱ्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. १७ ऑगस्टपर्यंत
दररोज सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहणार आहे.
****
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री
सुखबीरसिंह बादल यांना काल नांदेडच्या रुग्णालयातून सुटी देण्यात आली. परवा एका इसमाने
केलेल्या हल्ल्यात बादल जखमी झाले होते. या हल्ल्यात बादल यांचा बचाव करतांना जखमी
झालेले विशेष पोलिस निरीक्षक संतोष केंद्रे यांची, बादल यांच्या सुविद्य
पत्नी माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी रुग्णालयात भेट घेऊन चौकशी केली.
****
ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी
वसतिगृह म्हणजे उज्ज्वल भविष्याची पायाभरणी असल्याचं, उपमुख्यमंत्री
तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. काल बीड इथं लोकनेते गोपीनाथ
मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत संत भगवानबाबा मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या
इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यावेळी
उपस्थित होतं. या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून, कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना
पवार यांनी याबाबतच्या बैठकीत दिल्या. दरम्यान, पवार यांनी जिल्हा
क्रीडा संकुलाला अचानक भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी केली.
****
स्वदेशी उत्पादनांचा अधिकाधिक
वापर करून देशाच्या विकासात योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय क्रीडा आणि युवा कल्याण
राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथे ‘स्वदेशी एक्स्पो
२०२६’ या तीन दिवसीय प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. स्वदेशी वस्तू
वापरावर भर देण्याचं आवाहन खडसे यांनी केलं. त्या म्हणाल्या…
बाईट - केंद्रीय क्रीडा आणि युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे
येत्या १६ तारखेपर्यंत चालणाऱ्या
या प्रदर्शनात हस्तकला आणि हातमाग वस्त्रांच्या विविध दालनांना भेट देता येणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी
तालुक्यात कवडा इथल्या सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी फलक
लेखनाच्या माध्यमातून "स्वातंत्र्याचे एकच मागणे, माझी मराठी
शाळा निरंतर सुरू राहो" असा संदेश दिला आहे.
दरम्यान, हर तिरंगा
मोहीम सध्या राबवण्यात येत आहे. प्रसिद्ध कवी-गीतकार दासू वैद्य यांनी नागरिकांना,
आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन केलं आहे.
बाईट- प्रसिद्ध कवी-गीतकार दासू वैद्य
****
हिंगोली जिल्ह्यात विकासात्मक
क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक तथा संस्थांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे
'जिल्हा युवा पुरस्कार' काल जाहीर करण्यात आले. पालकमंत्री
नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते आज हे पुरस्कार प्रदान केले जातील.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद
तीर्थ मराठवाडा विद्यापीठात काल वृक्षारोपण करण्यात आलं. कुलगुरू डॉ. मनोहर चासकर आणि
प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र
संकुल परिसरात हा उपक्रम राबवण्यात आला.
****
रोजगार हमी योजना मंत्री भरत
गोगावले यांनी काल बीड इथं विविध योजनांचा आढावा घेतला. रोजगार हमी योजनेतील जुनी तसंच
अर्धवट कामे नव्या प्रणालीत वर्ग करून प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना गोगावले
यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
****
तुळजापूर शहरातील ६२ महत्त्वाच्या ठिकाणी २३३
सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते काल
या सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment