▼

Friday, 14 August 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 14.08.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 14 August 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १४ ऑगस्ट २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्राला संबोधित करणार

·      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर इथं भव्य तिरंगा पदयात्रा; हजारो नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग

·      जालना इथं रेशीम कोष बाजारपेठेच्या इमारतीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

·      पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल यांना रुग्णालयातून सुटी

आणि

·      स्वदेशी उत्पादनांचा वापर करून देश विकासात योगदान द्यावं- केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचं आवाहन

****

देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन उद्या साजरा होत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आज संध्याकाळी सात वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्राला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपतींचं हे संबोधन आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारित केलं जाईल.

****

स्वातंत्र्यदिनानिमित्त राजधानी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी सात वाजता ध्वजारोहण होणार आहे. त्यांनतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतील.

****

मुंबईतील मंत्रालयात सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. पुण्यात राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. राज्यात जिल्हा मुख्यालयांवर संबंधित पालकमंत्री आणि मंत्र्यांच्या हस्ते तसंच सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबत परिपत्रक जारी केलं आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगर इथं भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. औरंगपुरा परिसरातून निघालेल्या या पदयात्रेत मुख्यमंत्र्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, राज्य मंत्रिमंडळातले सदस्य गिरीश महाजन, जयकुमार रावल, राधाकृष्ण विखेपाटील, मेघना बोर्डीकर साकोरे, अतुल सावे, महापौर समीर राजूरकर, यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स तसंच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. विविध भागातून मार्गक्रमण करत, ही पदयात्रा क्रांतीचौक परिसरात विसर्जित झाली.

****

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज जालना इथं रेशीम कोष बाजारपेठेच्या नवीन इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं, यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी, जालन्यात रेशीम वस्त्राचा नवीन ब्रॅण्ड तयार करण्याचं आवाहन केलं. शेतकऱ्यांना आर्थिक विकासासाठी रेशीम उद्योग हा उत्तम पर्याय असल्याचं त्यांनी सांगितलं, रेशीम उत्पादनासोबतच त्याची व्हॅल्यू चेन तयार होण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली. ते म्हणाले -

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

रेशीम कोष बाजारपेठेच्या विविध प्रक्रिया विभागांची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. यावेळी जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या वेळी सात प्राथमिक आरोग्य केंद्रांचं लोकार्पण, तसंच अंबड इथं नवीन पोलिस ठाण्याचं उद्घाटनही करण्यात आलं.

****

विभाजन विभीषिका स्मृति दिवस देशभरात आज पाळला जात आहे. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं, मात्र त्यासाठी फाळणीच्या रुपात मोठी किंमत मोजावी लागली. या फाळणीमुळे कोट्यवधी बांधव विस्थापित झाले, यावेळी उसळलेल्या हिंसाचारात अनेकांनी प्राण गमावले. त्यांच्या या त्यागाची, संघर्षाची आणि बलिदानाची आठवण ठेवण्यासाठी हा दिवस पाळला जातो.

परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने कल्याण मंडप इथं आज फाळणीच्या आठवणी दाखवणाऱ्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं. मनपाचे उपायुक्त तुकाराम कदम यांच्या हस्ते या चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. १७ ऑगस्टपर्यंत दररोज सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहणार आहे.

****

क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचं औचित्य साधून महसूल विभागाने १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या सात महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. काल या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला.

****

राज्यातील खाजगी अनुदानित तसंच अंशतः अनुदानित शाळांमध्ये सेवेत असताना निधन झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांनी येत्या ३१ ऑगस्टपर्यंत अनुकंपा नियुक्तीसाठीचे प्रस्ताव तातडीने आणि परिपूर्ण स्वरूपात सादर करण्याचं आवाहन शिक्षण विभागाने केलं आहे. संबंधित संस्थांनी प्रस्तावांची प्राथमिक छाननी करून सर्व माहिती, कागदपत्रं आणि नोंदी पूर्ण असल्याची खात्री करुन घ्यावी, असं सांगण्यात आलं आहे.

****

जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महा रजिस्ट्रार यांनी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. गेल्यावेळेच्या जनगणनेत एकूण २९ प्रश्न नागरिकांना विचारण्यात आले होते, यावेळी नागरिकांना जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ४० प्रश्न विचारले जातील. यात कोविड लस घेतल्याचं ठिकाण, एकूण बँक खात्यांची संख्या, मोबाईल क्रमांक, आधार, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आणि वाहन परवाना आदी बाबींचा समावेश आहे.

****

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल यांना आज नांदेडच्या रुग्णालयातून सुटी देण्यात आली. काल झालेल्या हल्ल्यात बादल जखमी झाले होते. या हल्ल्यात बादल यांचा बचाव करतांना जखमी झालेले विशेष पोलिस निरीक्षक संतोष केंद्रे यांची, बादल यांच्या सुविद्य पत्नी माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी रुग्णालयात भेट घेऊन चौकशी केली.

****

स्वदेशी उत्पादनांचा अधिकाधिक वापर करून देशाच्या विकासात योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय क्रीडा आणि युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथे ‘स्वदेशी एक्स्पो २०२६’ या ३ दिवसीय प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. स्वदेशी वस्तूंच्या वापरावर भर देण्याचं आवाहन खडसे यांनी केलं. त्या म्हणाल्या -

बाईट - केंद्रीय क्रीडा आणि युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे

आमदार अनुराधा चव्हाण यांच्यासह इतर मान्यवरांनी प्रदर्शनातील प्रत्येक दालनाला भेट देत उत्पादनांची माहिती जाणून घेतली. येत्या १६ तारखेपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात हस्तकला आणि हातमाग वस्त्रांच्या विविध दालनांची अप्रतिम कलाकुसर पाहता येणार आहे.

****

स्वातंत्र्याच्या पूर्वदिनी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील कवडा मधल्या सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी फलक लेखनाच्या माध्यमातून “स्वातंत्र्याचे एकच मागणे, माझी मराठी शाळा निरंतर सुरू राहो” असा संदेश दिला आहे.

हर तिरंगा मोहीम सध्या राबवण्यात येत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य डॉ योगिता होके पाटील यांनी नागरिकांना, आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन केलं आहे.

बाईट - डॉ योगिता होके पाटील

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज वृक्षारोपण करण्यात आलं. कुलगुरू डॉ. मनोहर चासकर आणि प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुल परिसरात कुलसचिव डॉ. डी. डी. पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं.

****

राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या माझं गाव, आरोग्य संपन्न गाव या विशेष अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र गोलटगाव आणि परिसरातील विविध आरोग्य सेवांचा अभियानाचे शहरी आयुक्त डॉ. सुनील भोकरे यांनी आढावा घेवून पाहणी केली. जिल्हा माता आणि बाल संगोपन अधिकारी डॉ. विशाल बेंद्रे यांनी या अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामकाजाची माहिती दिली.

****

माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि लोकनेते विलासराव देशमुख यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त लातूरमधील बाभळगाव इथे आज प्रार्थना सभा घेण्यात आली.

****

लोकनेते विनायकराव मेटे यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त बीड शहरातील त्यांच्या स्मृतिस्थळी आज अभिवादन कार्यक्रम घेण्यात झाला.

****

No comments:

Post a Comment