▼

Sunday, 16 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.08.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 16 August 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ ऑगस्ट २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजधानी दिल्लीतील 'सदैव अटल' स्मारकावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हेही उपस्थित होते. वाजपेयी यांनी अणुऊर्जा परिक्षण आणि कारगिल युद्धाच्या माध्यमातून जगाला भारताची शक्ती दाखवली होती. त्यांचं महान व्यक्तिमत्व आणि नेतृत्व राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरणादायी असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी सामाजिक माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.

****

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ-CBDT ने विदेशी मालमत्ता असलेल्या लहान करदात्यांसाठी 'विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना नियम, २०२६' अधिसूचित केले आहेत. या योजनेअंतर्गत, पात्र करदाते विहित कर किंवा शुल्क भरून काही अघोषित विदेशी मालमत्ता किंवा विदेशी उत्पन्न घोषित करू शकतील. ही योजना आजपासून अंमलात येत आहे. घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे. त्या तारखेनंतर कोणतेही घोषणापत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही. ही एक-वेळची ऐच्छिक प्रकटीकरण योजना आहे.

****

मुलींच्या सक्षमीकरणासंबंधी लेक लाडकी योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. आता आधार क्रमांकाच्या आधारे आवश्यक माहिती संगणकाद्वारे मिळवली जाणार असून लाभार्थी, तिचे माता पिता यांची ई-केवायसी करण्यात येणार असल्यानं वारंवार कागदपत्रं सादर करण्याची गरज नसेल. तसंच पुढील टप्प्यांतील लाभांसाठीदेखील पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत केलेल्या रस्त्यांच्या कामांच्या गुणवत्तेबाबत येत्या १९ ऑगस्ट दरम्यान प्रत्यक्ष पाहणी करून गुणवत्ता तपासणी करण्यात येणार आहे. खासदार संदीपान भुमरे यांनी ही माहिती दिली. या कामांबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेत केंद्र सरकारकडून ही गुणवत्ता तपासणी करण्यात येत असल्याचं भुमरे यांनी सांगितलं.

****

ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर इथलं उपजिल्हा रुग्णालय आणि खर्डी इथल्या ग्रामीण रुग्णालयासह राज्यातल्या १२४ आरोग्य संस्थांचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल दूरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात आलं. सामान्य नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याची ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव निपुण विनायक, यावेळी उपस्थित होते.

****

मातीचं संवर्धन आणि पाण्याचं शाश्वत व्यवस्थापन ही केवळ शासनाची जबाबदारी न राहता ती व्यापक लोकचळवळ बनणं ही काळाची गरज आहे. याच विचारातून मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीनं राज्यात यंदा २१ ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्त साजरा होणारा हा दिवस महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी नव्या संकल्पाची सुरुवात ठरेल, असं राज्याचे मृदू आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी म्हंटलं आहे. स्वातंत्र्यदिन सोहळ्यात शपथेचं वाचन आणि जलसंधारण अभियानाच्या संकेत चिन्हाचं प्रकाशन करताना ते बोलत होते.

****

पुढील वर्षी नाशिक आणि त्रंबकेश्वर इथं होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी विविध पायाभूत सुविधांच्या कामात बनावट वर्क ऑर्डर देण्याचा प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी 2-3 आरोपी असल्याची माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी काल नाशिकमध्ये दिली.

****

झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज २३ व्या दिवशीही तोडगा निघू शकलेला नाही. दरम्यान, या विद्यार्थ्यांनी आता २४ जिल्हयांमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे पुतळे जाळून निषेध करणार असल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे.

****

No comments:

Post a Comment