Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 20 August 2026
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० ऑगस्ट २०२६ दुपारी १.०० वा.
****
जपानचे संरक्षण मंत्री शिंजीरो कोइझुमी
पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आले आहेत. आज नवी दिल्लीत भारत आणि जपान यांच्यातील द्विपक्षीय
संरक्षण मंत्रीस्तरीय बैठक पार पडत आहे. कोइझुमी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या
बैठकीत सहभागी झाले आहेत, दोन्ही
देशांतील संरक्षण संबंध अधिक दृढ करणं, हिंद-प्रशांत क्षेत्रातील
शांतता आणि सुरक्षितता वाढवणं, सहकार्याच्या नव्या क्षेत्रांवर
चर्चा होत आहे तसंच सागरी सुरक्षा अधिक मजबूत करणं आणि ‘मेक-इन-इंडिया’
अंतर्गत संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञान सहकार्य वाढवण्यावरही या बैठकीत
भर दिला जात आहे. तत्पूर्वी, सकाळी जपानच्या संरक्षण मंत्र्यांनी
राष्ट्रीय समर स्मारक इथं हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण केलं.
****
काँग्रेस कार्यकारणी समितीनं वंदे मातरम्
या राष्ट्रीय गीताची दोनच कडवे गाण्याचा ठराव मंजूर केला आहे. याबद्दल मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी आज काँग्रेसवर टीका केली. हे इंग्रजांच्या काळातील मानसिकतेचे
दर्शन असून काँग्रेस त्याच मानसिकतेत आताही वागत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते आज
नागपूर इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, राहुल गांधींच्या पुण्यात होणाऱ्या ‘छात्रों
की गुंज’ कार्यक्रमांमध्ये पुणे परिसरातील काँग्रेसच्या शैक्षणिक
संस्थातील मुलींची नोंदणी होत आहे. काँग्रेस या निमित्तानं छात्रोकी गुंज ऐवजी आपली
जमिनीवरील जागा चाचपणार असल्याची टीका फडणवीस यांनी यावेळी केली.
****
राज्यातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब
ठाकरे समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री उभारणीचे काम सुरु आहे, यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज
दुपारी तीन ते चार वाजेदरम्यान मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्पुरती बंद राहणार आहे. या
दरम्यान, वाहनचालकांनी सहकार्य करुन प्रवासाचं नियोजन करावं,
असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात
घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड-तिरुपती मार्गावरील विशेष रेल्वेगाडीची सेवा सप्टेंबरमध्येही
सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०७६०३ नांदेड-तीरुचानुर ही विशेष रेल्वे
एक सप्टेंबरपासून दर मंगळवारी, तर गाडी क्रमांक ०७६०४ तीरुचानुर-नांदेड विशेष रेल्वे दोन सप्टेंबरपासून
दर बुधवारी धावणार आहे.
****
बीड इथं आज, राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना
अभिवादन करण्यात आलं. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आधुनिक भारताच्या
उभारणीत त्यांच्या योगदानाचं यावेळी स्मरण करण्यात आलं. देशाच्या विकासाला विज्ञान,
तंत्रज्ञान आणि संगणकीकरणाची जोड, युवकांना राष्ट्रनिर्मितीच्या
प्रक्रियेत सहभागी करून घेणं आदी महत्त्वपूर्ण कार्य राजीव गांधी यांनी केलं. यावेळी
एकता, सद्भावना आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचा संकल्प करण्यात
आला. या कार्यक्रमात माजी आमदार सय्यद सलीम यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.
****
जलसंधारण दिनानिमित्त उद्या नांदेडमध्ये
‘वॉक फॉर वॉटर’ या महावॉकथॉनचं
आयोजन करण्यात आलं आहे. समाजामध्ये माती आणि जलसंवर्धनाचे महत्त्व रुजवण्यासह जलसंधारणाच्या
उपक्रमांमध्ये लोकसहभाग वाढवण्याच्या उद्या शहरात दिंडी निघणार आहे. शासकीय तंत्रनिकेतनच्या
मैदानावर सकाळी सहा वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल. ‘माती वाचवा, पाणी वाचवा आणि भविष्य घडवा’ हा संदेश
देत आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमातून माती व पाण्याचे संवर्धन, जलसंधारणाची गरज आणि त्यातील लोकसहभाग याबाबत व्यापक जनजागृती करण्याचा प्रयत्न
आहे.
****
बीड इथं विलास घुले हत्याप्रकरणी
पीडित कुटुंबाला न्याय, आर्थिक
मदत आणि सुरक्षा मिळावी, या मागणीसाठी आज मोर्चाचं आयोजन करण्यात
आलं आहे. याबाबत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. घुले कुटुंबीयांचे
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू असून, प्रशासनानं
तातडीनं दखल घ्यावी तसंच आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी
यावेळी करण्यात आली. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम इथून अण्णाभाऊ साठे
चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे.
****
येत्या दोन दिवसांत कोकणात बहुतांश
ठिकाणी, मध्य
महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी
पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाड्यात परभणी,
बीड आणि नांदेड या जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला
आहे.
****
बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत
आज उप-उपांत्यपूर्व फेरीच्या अत्यंत महत्त्वाच्या लढती रंगणार आहेत. महिला एकेरीत भारताची
अव्वल खेळाडू पी. व्ही. सिंधू आणि चीनची खेळाडू वँग झी यी यांच्यात थोड्याच वेळात सामन्याला
सुरुवात होत आहे. इतर सामन्यांमध्ये, पुरुष एकेरीत पदार्पण करणारा भारताचा तरुण खेळाडू
आयुष शेट्टी दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी होणाऱ्या इंडोनेशियाच्या अल्वी फरहानविरुद्ध
लढेल. तर, स्टार पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी
आणि चिराग शेट्टी दुपारी दीड वाजता मलेशियाच्या जुनैदी आरिफ आणि रॉय किंग याप जोडीविरुद्ध
खेळतील.
****
No comments:
Post a Comment