Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 20 August
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २० ऑगस्ट
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
अर्थमंत्री निर्मला
सीतारामन यांनी आज सिंगापूरमध्ये पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांची भेट घेतली. या बैठकीला
परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस. जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष
गोयल आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद हेही उपस्थित
होते.
सितारामण आणि
पंतप्रधान वोंग यांनी सर्वसमावेशक सामरिक भागीदारीचा आराखडा तसंच अंमलबजावणीतील प्रगतीचा
आढावा घेतला. दोन्ही नेत्यांनी आर्थिक सहकार्य, डिजिटलायझेशन, संपर्कयंत्रणा, कौशल्य विकास
आणि शाश्वतता यासह विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्याबाबत
चर्चा केली अशी माहिती अर्थ मंत्रालयाकडून प्राप्त झाली आहे. आज होणाऱ्या भारत-सिंगापूर
मंत्रीस्तरीय गोलमेज बैठकीच्या चौथ्या फेरीत सहभागी होण्यासाठी हे मंत्री सिंगापूर
दौऱ्यावर आले आहेत.
***
देशाचे माजी पंतप्रधान
राजीव गांधी यांची आज जयंती. यानिमित्त उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना
आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपतींनी राजीव गांधी यांनी राष्ट्रासाठी दिलेलं योगदान आणि
सार्वजनिक जीवनातील त्यांच्या सेवांचं स्मरण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही
राजीव गांधींना आदरांजली वाहिली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल
गांधी वीरभूमी इथं वडील , माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना
पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
***
हिंदुहृदयसम्राट
बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री उभारणीचे काम सुरु आहे, यासाठी छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात आज २० ऑगस्ट रोजी बेंदेवाडी ते फातियाबाद ही नागपूरकडे जाणारी
वाहतूक दुपारी १२ ते एक वाजेपर्यंत तात्पुरती बंद राहील तसंच दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यान
मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्पुरती बंद राहणार आहे. या दरम्यान, वाहनचालकांनी
सहकार्य करुन प्रवासाचं नियोजन करावं, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
***
माजी मुख्यमंत्री
सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त उद्या मृदा आणि जलसंधारण विभागाने आयोजित केलेला
'महा वॉकॅथॉन-
वॉक फॉर वॉटर' हा राज्यस्तरीय उपक्रम मुंबईतील
वरळी प्रोमनेड आणि सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयांमध्ये होणार आहे. राज्यभरात सुरू असलेल्या
जलसंधारण जनआंदोलनात सहभागी होऊन महाराष्ट्राच्या जल-सुरक्षित भविष्य घडवावं तसंच 'पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र
घडवा' हा संदेश सर्वत्र पसरवण्याचं आवाहन मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी
केलं आहे.
***
मुंबई विद्यापीठातर्फे
आयोजित, अपार आयडी, एबीसी आयडी लिंकिंग
आणि आधार प्रमाणीकरणासंदर्भातील विद्यार्थ्यांच्या अडचणींचं तातडीनं निराकरण करण्यासाठी
विशेष सुविधा शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांचा
वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन शिबिराला उद्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, या शिबिराला आतापर्यंत
८०० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन अपार आयडी, एबीसी आयडी लिंकिंग
तसंच आधार प्रमाणीकरणासंदर्भातील आपल्या अडचणींचं निराकरण करून घेतलं. विद्यार्थ्यांना
येणाऱ्या विविध तांत्रिक आणि नोंदविषयक समस्यांवर शिबिरात तातडीनं कार्यवाही करण्यात
येत आहे.
***
कोल्हापूरच्या
करवीर तालुक्यातील प्रती पंढरपूर असलेल्या नंदवाळ तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ५०
एकर जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत
मुंबईतल्या मंत्रालयात गायरान जमिनीबाबत नुकतीच उच्चस्तरीय बैठक झाली. आमदार चंद्रदीप
नरके यांनी याबाबत पाठपुरावा करत विधानसभेत लक्षवेधी प्रश्न मांडण्यापासून ते मंत्रालयीन
बैठका आणि संबंधित विभागांशी सातत्यानं समन्वय साधला होता. या बैठकीत कदम यांनी गावालगतची
सपाट जागा तीर्थक्षेत्र विकास तसंच ग्रामस्थांच्या वापरासाठी राखीव ठेवण्याबाबत निर्देश
दिले तसंच प्रशासनाला मोजणी करून अहवाल तातडीनं सादर करण्याचेही निर्देश दिले आहेत.
***
लातूर जिल्ह्यातील
उदगीरमध्ये लक्ष्मीपूजेच्या नावाखाली अंधश्रद्धेला खतपाणी घालत पैशाचा पाऊस पाडण्याचे
आमिष दाखवल्या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसांनी एका संशयिताला तेलंगणा राज्यातून अटक
केली आहे. बालाजी मंगल बलराज असं या संशयिताचं नाव आहे, तो तेलंगणाच्या
कामारेड्डी जिल्ह्यातील रहिवाशी आहे. पैशाचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली करण्यात येणाऱ्या
या अघोरी लक्ष्मीपूजेची जबाबदारी या संशयिताकडे होती, असं तपासात समोर
आलं आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन भातलवंडे आणि पोलिस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलिस पथकानं तेलंगणा राज्यात जाऊन ही कारवाई केली.
***
राज्यात यंदाच्या
पावसाळ्यात एक जून ते २० ऑगस्ट दरम्यान सरासरीच्या ९२ टक्के इतका पाऊस झाला आहे. राज्यात
या कालावधीत ७२३ मिलीमीटर पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ६६५ पुर्णांक
१ शतांश मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला आहे.
जुलैमध्ये राज्यात सरासरीच्या १३१ पुर्णांक पाच शतांश टक्के पाऊस झाला; मात्र ऑगस्टमध्ये
पावसाचा जोर कमी झाला आहे. एक ते २० ऑगस्टदरम्यान राज्यात १८४ पुर्णांक पाच शतांश मिलीमीटर
सरासरीच्या तुलनेत १०४ पुर्णांक दोन शतांश मिलीमीटर पाऊस झाला आहे.
***
No comments:
Post a Comment