▼

Friday, 21 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.08.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 21 August 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ ऑगस्ट २०२६ दुपारी १.०० वा.

****

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती आज जलसंधारण दिन म्हणून साजरी होत आहे. मृद आणि जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी आज ‘महा वॉकेथॉन - वॉक फॉर वॉटर’ हा उपक्रम राबवण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौक ते महात्मा फुले पुतळा या दरम्यान झालेल्या या जनजागृती पदयात्रेत हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. विधान परिषदेचे अअमदार सुहास शिरसाट, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम, मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. मृद आणि जलसंधारणाची शपथ यावेळी घेण्यात आली.

हिंगोली इथं जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी वॉकेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. या महा-वॉकेथॉनमध्ये मुली, महिला अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

बीड इथं जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी हिरवा झेंडा दाखवून महा वॉकेथॉनला सुरूवात केली. या रॅलीमध्ये माती-पाणी संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थी, शासकीय कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले होते.

सांगली इथंही पदयात्रा काढण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना जलसंधारण विषयी शपथ दिली. यावेळी उत्कृष्ट स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या उपक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थी तसंच शासकीय कर्मचारी अधिकारी सहभागी झाले होते.

यवतमाळ मध्ये आयोजित वॉकेथॉनमध्ये ‘माती वाचवा, पाणी जपा, भविष्य सुरक्षित करा’ हा संदेश देत मृद आणि जलसंधारणाविषयी जनजागृती करण्यात आली. यात २३ हजार ८०० स्पर्धकांनी सहभाग घेतला.

सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अकोला, धुळे, गोंदिया, जळगाव याठिकाणीही वॉकेथॉनला नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतसाद मिळाला.

****

ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांच्या बैठकीला आज पुण्यात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली. या परिषदेत सदस्य देशांचे दूरसंवाद मंत्री आणि वरीष्ठ प्रतिनिधी सहभागी झाले असून, माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान, डिजिटल रुपांतरण, नवोन्मेष तसंच लवचिक डिजिटल पायाभूत सुविधा याविषयी चर्चा करतील. बदलासाठी अनुकूल भविष्यासाठी माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान क्षेत्रात नवोन्मेष, सहकार्य आणि हस्तांतरण ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे.

****

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे सुरू करण्यात आलेल्या 'प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान' - पीएम आशा या योजनेसाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. या योजनेअंतर्गत २०२४-२५ या वर्षातील प्रत्यक्ष खर्च अंदाजे पाच हजार ४०० कोटी रूपये होता. २०२६-२७ या वर्षी खर्चात वाढ होऊन तो सात हजार कोटींहून अधिक झाला असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. पिकांच्या किमान आधारभूत किंमतीचा लाभ लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी मंत्रालयानं सप्टेंबर २०१८ मध्ये या योजनेला सुरूवात केली.

****

राज्यभरात ११ हजार ५८७ ‘शेतकरी मित्र’ नियुक्त करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. नवीन संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित शेती पद्धती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकरी मित्र नियुक्त करण्यात येणार आहे. ‘आत्मा’ यंत्रणेच्या निधीतून शेतकरी मित्रांना दरमहा एक हजार ५०० रुपये मानधन दिलं जाणार आहे. शेतीशाळेतली उपस्थिती, विविध सर्वेक्षणांमधला तसंच ग्रामसभेतला सहभाग यांसह अन्य निकषांच्या आधारे शेतकरी मित्रांच्या कामाचं दरवर्षी मूल्यांकन केलं जाणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद इथं प्रसिद्ध हजरत ख्वाजा शेख मुंतजबोद्दीन उर्फ जर जरी बक्ष यांच्या ७४० व्या उरुसाला कालपासून सुरुवात झाली. या निमित्त राज्यभरातून येणाऱ्या भाविकांसाठी परिवहन महामंडळाच्या वतीनं विविध भागातून खुलताबादसाठी ६८ जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. विभागीय वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांनी ही माहिती दिली. २६ ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद च्या दिवशी या उर्सची सांगता होईल.

****

जिल्हास्तरीय विकासाला चालना देण्यासाठी, संस्थात्मक क्षमता बळकटीकरण प्रकल्प अर्थात महास्ट्रॉईड प्रकल्प राज्यातल्या विविध जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाला जागतिक बँकेचं अर्थसहाय्य मिळालं आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये शंभर टक्के गुण मिळवून कोल्हापूर जिल्ह्यानं राज्यात प्रथाम क्रमांक पटकावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यासह सर्व प्रशासनाचं अभिनंदन केलं आहे.

****

बीड जिल्ह्यात आष्टी इथं दुध भेसळ प्रकरणी पोलीसांनी आज कारवाई केली. या कारवाईत दूध भेसळ पावडरचे ७२ पोते आणि पिकअप वाहनासह पावणेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. तसंच या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

No comments:

Post a Comment