Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 21 August 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ ऑगस्ट २०२६ सायंकाळी
६.१०
****
· केंद्र शासनाच्या ‘मोबाईल फोन उत्पादन योजने’ला आजपासून प्रारंभ
· न्यायिक सेवा परीक्षेच्या अर्हतेत वकिली व्यवसायाची अट सर्वोच्च
न्यायालयाकडून शिथिल
· मृद आणि जलसंधारण जनजागृतीसाठीच्या महावॉकेथॉनला नागरिकांचा
उत्स्फुर्त प्रतिसाद
आणि
· बी डब्ल्यू एफ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिसा जॉली आणि
गायत्री गोपीचंद जोडीची उपांत्य फेरीत धडक
****
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी
वैष्णव यांनी आज ‘मोबाईल फोन उत्पादन योजना’ MPMS ला आजपासून प्रारंभ केला. केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या महिन्यात ६२ हजार ५००
कोटी रुपयांच्या तरतुदीसह या योजनेला मंजुरी दिली आहे. १ एप्रिल २०२६ पासून लागू झालेली
ही योजना २०२६-२७ ते २०३०-३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी कार्यरत असेल. या योजनेबाबत
अधिक माहिती देतांना वैष्णव म्हणाले -
बाईट - केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि
माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव
मोबाईल उत्पादनाची पुरवठा साखळी बळकट करणं, देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवून जागतिक स्पर्धात्मकता उंचावणं, मोबाईल फोन उत्पादनाला प्रोत्साहन देणं आणि भारतीय मोबाईल फोन ब्रँड्सना आधार देणं, हा या योजनेचा उद्देश आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये किमान १० हजार कोटी रुपये
उलाढाल असलेल्या आणि भारतात नोंदणीकृत असलेले मोबाइल फोन उत्पादक या योजनेसाठी पात्र
ठरणार आहेत.
****
पुणे इथं सुरू असलेल्या पाच दिवसीय ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद
मंत्र्यांच्या बैठकीचा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत आज समारोप
झाला. ‘डिजिटल इंडिया’च्या संकल्पनेवर आधारित दृष्टीकोन ठेऊन त्याद्वारे
लवचिक,
विश्वासार्ह, आणि सर्वसमावेशक भविष्य घडवण्याचं
उद्दिष्ट असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितले.
****
न्यायिक सेवा परीक्षा देण्याच्या अर्हतेत किमान तीन वर्षं वकिली
व्यवसायाची अट सर्वोच्च न्यायालयाने शिथिल केली आहे. आता फक्त एक वर्ष वकिली व्यवसाय
केलेले उमेदवार ही परीक्षा देऊ शकतील, मात्र त्यांना न्यायिक
अकादमीत प्रशिक्षण पूर्ण करून एक वर्ष सहाय्यक म्हणून काम करावं लागेल. हा नियम १ एप्रिल
२०२७ नंतर जारी होणाऱ्या अधिसूचनेतल्या परीक्षांना लागू होईल. सरन्यायाधीश न्यायमूर्ती
सूर्यकांत,
न्यायमूर्ती ए जी मसीह, आणि
न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांनी हा निवाडा दिला. २५ मे २०२५ ते ३१ मार्च २०२७ या
काळात अधिसूचना जारी झालेली परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना पूर्वानुभवाची अट घातली जाणार
नाही. त्यांना एका वर्षासाठी प्रशिक्षणार्थी न्यायिक अधिकारी म्हणून नेमणूक दिली जाईल.
आणि नंतर एक वर्षभर न्यायालय सहाय्यक पदावर काम करावं लागेल, असं न्यायालयाने सांगितलं आहे.
****
गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी एसटीच्या एकेरी
गट आरक्षणावर आकारण्यात येणारं ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द केल्याची माहिती परिवहन
मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकणातून रिकाम्या येणाऱ्या
या बसमुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी महामंडळानं यंदा ३० टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याचा
निर्णय घेतला होता. त्याला होणारा विरोध लक्षात घेत, अतिरिक्त
शुल्क आकारण्याचा निर्णय रद्द करण्यात आला.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात मुंबई
तसंच उपनगरांमधली वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने मेगाब्लॉक घेऊ नये तसंच आवश्यकतेनुसार
मध्यरात्रीपर्यत मेट्रो सेवा सुरु ठेवावी अशी सूचना मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात
लोढा यांनी केली आहे.
****
माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती आज जलसंधारण दिन
म्हणून साजरी करण्यात आली. मृद आणि जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी
काढण्यात आलेल्या ‘महा वॉकेथॉन - वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फुर्त
प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी मृद आणि जलसंधारणाची शपथ घेत, या
अभियानात सक्रीय योगदानाचा संकल्प केला.
मुंबईत वरळी इथे झालेल्या राज्यस्तरीय ‘महा वॉकेथॉन: वॉक फॉर
वॉटर २०२६’ या उपक्रमाला मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, राज्यमंत्री इंद्रनील
नाईक,
मृद आणि जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. माती आणि पाणी हे राज्याच्या भवितव्याशी
निगडित विषय असून, त्यांच्या संवर्धनासाठी शासनाच्या प्रयत्नांना
जनतेची साथ मिळणं आवश्यक आहे. विशेषतः युवकांनी या जलसंधारणाच्या चळवळीला बळ द्यावं, असं आवाहनही मंत्री राठोड यांनी केलं.
छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौक ते महात्मा फुले पुतळा
या दरम्यान झालेल्या या जनजागृती पदयात्रेत शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. आमदार सुहास
शिरसाट,
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम, मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी या पदयात्रेत सहभागी
झाले.
जालना शहरात काढण्यात आलेल्या ‘महा वॉकेथॉन’ ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी कार्यालयापासून पोलीस
मैदानापर्यंत निघालेल्या या वॉकेथॉनमध्ये विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी तसंच
शासकीय-निमशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत जलसंधारण, पाणी बचत आणि जलसंवर्धनाबाबत जनजागृती केली.
परभणी इथं जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा,
जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश देत ‘महा-वॉकेथॉन - वॉक फॉर
वॉटर’ पदयात्रा काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय ते कृषी विद्यापीठातील क्रीडा
संकुलापर्यंत काढण्यात आलेल्या या पदयात्रेत चित्ररथाच्या माध्यमातूनही जलसंधारणाबाबत
जनजागृती करण्यात आली. प्रत्येक नागरिकाने आपल्या माती आणि जलसंवर्धनासाठी योगदान देण्याचं
आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी यावेळी केलं. त्या
म्हणाल्या –
बाईट – नतिशा माथुर, मुख्य कार्यकारी अधिकारी,
जि.प.परभणी
हिंगोली इथं जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी वॉकेथॉनला हिरवा
झेंडा दाखवला. या महा-वॉकेथॉनमध्ये मुली, महिला अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले.
बीड इथं जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी हिरवा झेंडा दाखवून
महा वॉकेथॉनला सुरूवात केली. या पदयात्रेत सहभागी झालेले विद्यार्थी, शासकीय अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी माती-पाणी संवर्धनाचा संदेश दिला.
नांदेड इथल्या शासकीय तंत्रनिकेतन मैदानावर आज जलसंधारण दिन
साजरा करण्यात आला. यानिमित्त तीन किलोमीटर पर्यंत महावॉकेथॉन काढण्यात आली. मृद आणि
जलसंधारण विभागाच्या विविध कामाच्या चित्रांचं प्रदर्शन यावेळी भरवण्यात आलं.
लातूर इथं जिल्हा परिषद ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत
काढण्यात आलेल्या पदयात्रेत जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्यासह महाविद्यालयीन
विद्यार्थी,
खेळाडू, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह
सर्व वयोगटांतील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा,
जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ असा संदेश देत जलसंधारणासाठी जनजागृती
करण्यात आली.
राज्यात सांगली, सोलापूर, रत्नागिरी,
सिंधुदुर्ग, अकोला, धुळे,
जळगाव, भंडारा, गोंदिया,
तसंच यवतमाळ इथे आज झालेल्या वॉकेथॉनला नागरिकांनी चांगला प्रतिसाद
दिला.
****
मराठवाडा नाट्य परिषदेच्या छत्रपती संभाजीनगर शाखेची कार्यकारिणी
आज जाहीर करण्यात आली. परिषदेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ रंगकर्मी गिरीधर पांडे यांची
निवड करण्यात आली. डॉ. योगिता तळेकर आणि संदीप राजहंस यांची उपाध्यक्षपदी, पंडित विश्वनाथ दाशरथे यांची सचिवपदी तर श्रीपाद पदे यांची सहसचिवपदी निवड करण्यात
आली आहे. मी नाटक का करतो? हा ज्येष्ठ नाट्यकर्मींच्या
अनुभवावर आधारित कार्यक्रम दर महिन्यात सादर करण्याचा आणि दिवाळीच्या सुटीत शालेय विद्यार्थ्यांसाठी
मोफत बालनाट्य कार्यशाळेचं आयोजन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
****
बॅडमिंटन जागतिक महासंघाच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिसा
जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. अटीतटीच्या
सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला. सामन्यातला पहिला गेम १६-२१ असा गमावल्यानंतर
त्रिसा आणि गायत्री यांनी जोरदार पुनरागमन करत, पुढचे
दोन गेम २१-१५,
२१-१३ असे जिंकून, पुढच्या फेरीत धडक मारली.
उद्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय जोडीची चीनी जोडीसोबत लढत होणार आहे.
****
No comments:
Post a Comment