▼

Sunday, 23 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.08.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 23 August 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ ऑगस्ट २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

राष्ट्रीय अंतराळ दिवस आज साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त पंतप्रधान     नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिकांह सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. समाज माध्यमावरील आपल्या संदेशात मोदी यांनी नव्या जागतिक व्यवस्थेत भारत निरंतर आपल्या अंतराळ क्षेत्राचा  विस्तार करत असून नव्या पिढीतील अभियंते, संगणक माहिती तंत्रज्ञ आणि वैज्ञानिक नविन तंत्रज्ञान विकसित करत असल्याचं नमूद केलं. आपलं अंतराळ क्षेत्र जागतिक गुंतणूकदारांसाठी आकर्षणाचं केंद्र बनल्याचं ते म्हणाले. भारताच्या २०४७ मध्ये विकसीत राष्ट्र बनवण्याच्या संकल्पामध्ये अंतराळ क्षेत्र महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

****

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार राज्यातल्या सर्व अकराशे शहान्नऊ बाल तपासणी पथकांचं प्रशासकीय नियंत्रण आता थेट तालुका आरोग्य अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.

****

राज्यात मॉन्सूनचा जोर सध्या ओसरला असून मराठवाड्यात हवामान ढगाळ आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, धाराशिव, लातूर आणि नांदेडसह काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे, तर उर्वरित भागात पावसाची काहीशी उघडीप राहील. आमच्या वार्ताहरानं दिलेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यात पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे.

****

भारतानं श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात कोलंबो इथं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करली आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा भारताच्या अकराव्या षटकात एक बाद ३७ धावा झाल्या होत्या. या सामन्यासाठी भारतानं कुलदीप यादवऐवजी ३३ वर्षीय अष्टपैलू फिरकी गोलंदाज सारांश जैन याला प्रथमच संधी दिली आहे. दोन सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला आहे.

****

सोळाव्या हॉकी इंडिया कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम लढत आज पिंपरीत होणार आहे. झारखंड आणि हरियाणा यांच्यात जेतेपदासाठी सामना होईल. काल झालेल्या उपांत्य फेरीत हॉकी झारखंडनं मध्य प्रदेशचा शूटआउटमध्ये दोन-एक असा पराभव केला होता.

****

महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाऊंडेशन यांच्यावतीनं दिला जाणारा ज्येष्ठ कवी स्वर्गीय दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार नामवंत कवी आणि अभिनेते किशोर कदम म्हणजेच सौमित्र यांना जाहीर झाला आहे. रोख दहा हजार रुपये, चांदीचं कमळ, आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. उद्या सोलापुरात पुरस्कार सोहळा होईल अशी माहिती साहित्य परिषद जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी दिली.

****

नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथल्या बाजार समितीमध्ये काल कांदा परिषद झाली. कांद्याला प्रतिक्विंटल दोन हजार रुपये भाव मिळेल अशा पद्धतीने योजना लागू करावी, नाफेड आणि एनसीसीएफमार्फत होणारी कांदा खरेदी बंद करून याची परदेशात विक्री न करता देशांतर्गत बाजारपेठेत विक्री करावी, यासह आठ ठराव या परिषदेत मंजूर झाले. या ठरावांची दखल न घेतल्यास दिल्लीत आंदोलन करण्याचा इशाराही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.

****

दक्षिण मुंबईत काल रात्री गणपती मुर्तीच्या आगमनप्रसंगी, मुर्ती अंगावर पडून दोन जण ठार तर पाच जण जखमी झाले. काल रात्री दहाच्या सुमारास दक्षिण मुंबईच्या जय अम्बे चौक भागात भुलेश्वरचा राजाचं आगमनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही दुर्घटना झाली.

****

देशभावना सतत जागृत ठेवण्यासाठी युवकांची शक्ती महत्त्वाची असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी केलं आहे. पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काल 'युवा की आवाज' उपक्रम पार पडला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 'वंदे मातरम् कृती समिती'च्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

संसदेनं वंदे मातरम् गीत गाण्यासंदर्भात कायदा केला आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने वंदे मातरम् गीताचा आदर करावा असंही मोहोळ यावेळी बोलतांना म्हणाले.

****

नांदेड इथं राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांच्या चाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त आज विविध धार्मिक तसंच सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीरांच्या आयोजनासह उपस्थित भाविकांना व्यसनमुक्तीची शपथही देण्यात येणार आहे.

****

माओवाद्यांनी आता आपलं लक्ष विद्यार्थी चळवळींकडे वळवलं असून समाजानं याबाबत वेळीच सावध होण्याची गरज आहे, असा गंभीर इशारा नक्षलवादाचे अभ्यासक राजीव रंजन प्रसाद यांनी दिला आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या 'देवर्षि नारद माध्यम पुरस्कार' सोहळ्यात ते काल पुण्यात बोलत होते. संवैधानिक लोकशाही व्यवस्था नष्ट करण्यासाठी माओवाद्यांनी आजवर शेतकरी, कामगार आणि आदिवासींचा हत्यार म्हणून वापर केला, असं ते म्हणाले.

****

No comments:

Post a Comment