Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 26
August 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ ऑगस्ट २०२६ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय
क्रीडा दिनानिमित्त उद्या २७ तारखेला खेलो इंडिया डायलॉग ला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून
संबोधित करणार आहेत. देशाच्या क्रीडा यात्रेत युवकांचा सहभाग वाढवणं आणि युवकांच्या
नेतृत्वातला विकसित भारत निर्माण करण्यासाठी त्यांचे विचार जाणून घेणं, हा या कार्यक्रमाचा
उद्देश आहे. क्रीडा, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आरोग्यदायी
जीवनशैली आणि राष्ट्र-निर्माणातील युवकांची भूमिका याबाबत पंतप्रधान या कार्यक्रमात
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. मेरा युवा भारत अर्थात माय भारत द्वारे आयोजित या
कार्यक्रमात देशातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन महाविद्यालयातले युवक
सहभागी होणार आहेत. पुण्यात हा कार्यक्रम डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, टी. जे. कॉलेज, सिंबायोसिस
इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आणि विश्वकर्मा युनिव्हर्सिटी या चार ठिकाणी होणार आहे. यामध्ये
विद्यार्थी, एनएसएस स्वयंसेवक, माय भारत चे युवा स्वयंसेवक आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू
सहभागी होणार आहेत.
****
ईद-ए-मिलाद-उन-नबी आज साजरी
होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद-ए-मिलाद-उन-नबी
हा पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणींचं स्मरण करण्याचा दिवस असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू यांनी म्हटलं. त्यांच्या शिकवणी आपल्याला सदाचार आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गावर
चालण्याची प्रेरणा देतात. त्यांच्या उदात्त आदर्शांमधून सर्वसमावेशक आणि विकसित भारत
घडवण्यासाठी योगदान देण्याची प्रेरणा मिळत राहो, अशी भावना राष्ट्रपतींनी व्यक्त
केली.
पंतप्रधानांनी ईद-ए-मिलादच्या
शुभेच्छा देताना, एकता आणि आनंद वृद्धिंगत होवो, तसंच समाजासाठी
योगदान देण्याची प्रेरणा या दिवसातून मिळो, अशा शब्दात शुभेच्छा दिल्या.
तर राज्यपालांनी, ईद-ए-मिलाद हा प्रेषित मोहम्मद यांच्या प्रेम, दया आणि त्यागाच्या
शिकवणींचं स्मरण करून देणारा सण असल्याचं नमूद केलं.
****
देशातल्या असंघटित कामगारांच्या
सामाजिक सुरक्षेला बळकटी देणाऱ्या ई-श्रम पोर्टलनं आज पाच वर्षांचा महत्त्वाचा टप्पा
पूर्ण केला. कामगार आणि रोजगार मंत्रालयानं २०२१ मध्ये सुरू केलेल्या ई-श्रम पोर्टलद्वारे
आधारशी संलग्न असंघटित कामगारांचा देशातला पहिला राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यात आला.
आजवर ३१ कोटी ८९ लाखांहून अधिक कामगारांची नोंदणी झाली असून, विविध योजनांचे
लाभ पोहोचवणं, लाभांची पोर्टेबिलिटी आणि पुराव्यावर आधारित धोरणनिर्मिती यांना यामुळे मोठी मदत
झाली आहे.
****
देशातल्या सर्जनशील क्षमतेचा
पुरेपूर वापर करण्यासाठी आणि जनसंवाद अधिक प्रभावी करण्यासाठी केंद्र आणि राज्यांमध्ये
अधिक बळकट आणि संस्थात्मक सहकार्याची गरज असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे
सचिव चंचल कुमार यांनी सांगितलं. नवी दिल्लीत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या
माहिती आणि जनसंपर्क विभागांच्या सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेत ते काल बोलत होते. सार्वजनिक
सेवा प्रसारण अधिक सक्षम करण्यासाठी आशयाची सहनिर्मिती, राज्यनिहाय कार्यक्रमांची
निर्मिती आणि जनतेपर्यंत अधिक प्रभावी पोहोच निर्माण करण्याबाबत या परिषदेत चर्चा झाली.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं
अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी घेण्यात आलेली
भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या चाळणी
परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयोगाकडून प्राथमिक चौकशी
करण्यात आली. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच काही उमेदवारांना प्रश्नपत्रिका किंवा प्रश्न
मिळाल्याचा आणि ते सोशल मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित झाल्याचा दावा
तक्रारींमध्ये करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आयोगानं संपूर्ण भरती प्रक्रिया
रद्द केली असून, औषध निरीक्षक पदासाठी फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. फेरपरीक्षेची तारीख आणि इतर
तपशील स्वतंत्र प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात येणार आहेत.
****
महाराष्ट्राला देशाच्या विकासाचं
‘ग्रोथ इंजिन’ बनवण्यासाठी सरकारनं विविध पातळ्यांवर पावलं उचलली आहेत, असं उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. जगभर झपाट्यानं विकास होत असताना देश आणि राज्याच्या
गतिशील विकासाचे ‘चेंज मेकर्स’ बनण्याचं आवाहन त्यांनी केलं. मुंबईत काल इकॉनॉमिक टाइम्स
बिझनेस कॉनक्लेव्ह अँड अवॉर्ड्स २०२६ मध्ये ते काल बोलत होते. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था
एक ट्रिलियन डॉलरच्या दिशेनं वाटचाल करत असून, राज्यातल्या तरुणांना रोजगार
आणि संधींसाठी राज्याबाहेर जावं लागू नये, यासाठी उद्योग, गुंतवणूक आणि
रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या जात असल्याचं शिंदे यांनी नमूद केलं.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान
सुरु असलेल्या दुसर्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेचा पहिला
डाव २९० धावांवर संपुष्टात आल्यानंतर त्यांना फॉलोऑन मिळाला. पहिल्या डावात भारताकडून
प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतारने प्रत्येकी तीन, सारांश जैननं दोन, तर मोहम्मद
सिराज आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी एक गडी बाद केला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा
श्रीलंकेच्या दुसर्या डावात दोन बाद ९७ धावा झाल्या होत्या.
****
No comments:
Post a Comment