▼

Wednesday, 26 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 26.08.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 26 August 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ ऑगस्ट २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

ईद-ए-मिलाद-उन-नबी आज साजरी होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद-ए-मिलाद-उन-नबीचा सण हा पैगंबर मुहम्मद यांच्या शिकवणींचं स्मरण करण्याचा दिवस आहे. त्यांची शिकवण आपल्याला सदाचार आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गाचे अनुसरण करण्यास प्रेरित करते. मुहम्मद पैगंबर यांचे उदात्त आदर्श आपल्याला एक सर्वसमावेशक आणि विकसित भारत घडवण्यासाठी सक्रियपणे योगदान देण्यास प्रेरित करत राहोत, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

हा पवित्र दिवस आपल्या समाजात एकोपा, आनंद आणि बंधुभाव अधिक दृढ करो. दया, माणुसकी आणि समाजासाठी योगदान देण्याची भावना आपल्याला सदैव मार्गदर्शित करो, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे, तर राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा संदेशात, ईद ए मिलाद हा सण प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या प्रेम, दया आणि त्यागाच्या शिकवणीचं स्मरण करुन देत असल्याचं नमूद केलं.

****

महाराष्ट्राला देशाच्या विकासाचं ‘ग्रोथ इंजिन’ बनवण्यासाठी सरकारनं विविध पातळ्यांवर पावलं उचलली आहेत, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. जगभर झपाट्यानं विकास होत असताना देश आणि राज्याच्या गतिशील विकासाचे ‘चेंज मेकर्स’ बनण्याचं आवाहन त्यांनी केलं. मुंबईत काल इकॉनॉमिक टाइम्स बिझनेस कॉनक्लेव्ह अँड अवॉर्ड्स २०२६ मध्ये ते बोलत होते. महाराष्ट्राचा विकास केवळ आर्थिक प्रगतीपुरता मर्यादित न राहता आधुनिक, शाश्वत, जागतिक स्पर्धेत सक्षम आणि सर्वसामान्यांसाठी अनुकूल असावा, अशी सरकारची भूमिका असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.

****

मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असून, प्रलंबित विषयांवर तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. मराठा समाजाशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. राज्य शासनानं ओबीसी प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सोयी-सुविधा आणि सवलती मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासंदर्भात तसंच कुणबी जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या कामकाजाचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी घेण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयोगाकडून प्राथमिक चौकशी करण्यात आली. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच काही उमेदवारांना प्रश्नपत्रिका किंवा प्रश्न मिळाल्याचा आणि ते सोशल मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित झाल्याचा दावा तक्रारींमध्ये करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आयोगानं संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द केली असून, औषध निरीक्षक पदासाठी फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. फेरपरीक्षेची तारीख आणि इतर तपशील स्वतंत्र प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात येणार आहेत.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अहिल्यानगर इथं श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या १७९व्या अखंड हरिनाम सप्ताहात सहभाग घेतला. वारकरी, हरिनाम, सनातन आणि हिंदू परंपरांमुळे देशाची संस्कृती, सभ्यता आणि मनातील ईश्वराचं स्थान अबाधित राहिलं, असं ते यावेळी म्हणाले. महायुती सरकारने सराला बेटाच्या विकासाचा आराखडा तयार करून त्यानुसार कामांना सुरुवात केली आहे. येत्या काळात सराला बेट हे भाविकांसाठी सुंदर आणि ऊर्जादायी आध्यात्मिक केंद्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

**

दरम्यान, महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दररोज १२ तास मोफत वीज देण्याची आणि शेतकऱ्यांची ५८ हजार कोटी रुपयांची थकित वीजबिलं माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी काल अहिल्यानगर इथं केली. सध्या राज्यातल्या ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. आत्तापर्यंत १२ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा झाली असून एकंदर ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग येत्या एक ते आठ सप्टेंबर या कालावधीत, पुढच्या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय संचलनासाठी सराव शिबीर घेणार आहे. यासाठीची निवड चाचणी काल पार पडली. यात प्राथमिक स्तरावर ३० स्वयंसेवकांची निवड झाली. या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात येणार असून, राष्ट्रीय स्तरावरच्या पथसंचलनासाठी सक्षम करण्याच्या दृष्टीनं विविध प्रशिक्षण सत्रांचं आयोजन करण्यात येणार आहे.

****

राज्य शासनानं यावर्षी घेतलेला, लघुलेखक संवर्ग मृत संवर्ग घोषित करण्याचा निर्णय रद्द करावा आणि नियमित लघुलेखक भरती प्रक्रिया सुरू करावी, या मागणीसाठी युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीनं नांदेडमध्ये कालपासून उपोषण सुरू करण्यात आलं.

****

No comments:

Post a Comment