Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 30 August
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ३० ऑगस्ट
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर असून, आज पंतप्रधान मोदी उझबेकिस्तानचे
राष्ट्राध्यक्ष शावकत मिर्झियोयेव्ह यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, डिजिटल संपर्क, ऊर्जा, शिक्षण आणि दोन्ही देशांच्या
नागरीकांदरम्यान संपर्क वाढवणं, आदी
मुद्यांवर या बैठकीत चर्चा होईल. पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी उझबेकीस्तान योग संघटनेनं
ताश्कंद इथं घेतलेल्या एका विशेष योगासन कार्यक्रमात सहभाग घेतला.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज, आता
थोड्याच वेळात म्हणजेच सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरील 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे देश-विदेशातील जनतेशी संवाद साधणार
आहेत. हा या कार्यक्रमाचा हा १३७ वा भाग असणार आहे. हा कार्यक्रम संपूर्ण आकाशवाणी
आणि दूरदर्शन वाहिन्या, एआयआर
न्यूज संकेतस्थळ आणि 'न्यूज
ऑन एअर' भ्रमणध्वनीच्या
ॲपवरही प्रसारित केलं जाईल.
****
नेपाळमधील
भीषण पुरातील मृतांची संख्या पावणेसातशेंवर पोहोचली असून जवळपास अडीच हजार जण अजूनही बेपत्ता आहेत. यातील
अद्याप २६१ परदेशी पर्यटकांशी संपर्क होऊ शकलेला नाही. २७५ हून अधिक भारतीय नागरिक
आणि भारतीय वंशाचे १२८ लोक अजूनही बेपत्ता आहेत. पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या
मदतीसाठी विविध पातळीवर शासकीय यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करत असून सर्वजण सुरक्षितपणे
परत पोहोचण्याकरता सतर्कतेने नियोजनाचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
दिले आहेत. राज्यातील काही नागरीक परत आले आहेत, तर काही जण सुरक्षितपणे परतीच्या मार्गावर आहेत. एका
ऑनलाइन लिंकद्वारेही काही जणांची माहिती मिळाली आहे.
****
आगामी
दिवसभरात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य
महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल
असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
****
मराठा
आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्याच्या अंतरवाली सराटी इथं सुरु
असलेल्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मराठा आरक्षणविषयक विविध मागण्यांसाठी विशेषत:
कुणबी नोंदींसंदर्भात कालपासून त्यांनी पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. मागण्या
मान्य न झाल्यास मुंबईत आंदोलन करण्याचा इशाराही जरांगे यांनी दिला आहे. तर दुसरीकडे
इतर मागास प्रवर्ग-ओबीसी आरक्षण संरक्षण लढाईसाठी लक्ष्मण हाके यांनी येत्या एक सप्टेंबर
रोजी मुंबईवर मोर्चा कणार असल्याचं सांगितलं आहे.
****
सातपुड्याच्या
दुर्गम डोंगररांगांचं गतवैभव परत मिळवण्यासाठी तळोदा मेवासी वनविभागानं आधुनिक तंत्रज्ञानाची
कास धरली आहे. महाराष्ट्रातील पहिल्याच नाविन्यपूर्ण प्रयोगांतर्गत २५० हेक्टर अवनत वनक्षेत्रात ड्रोनद्वारे तब्बल ७ लाखाहून अधिक बियांचे गोळे टाकण्याच्या मोहिमेला अमोनी येथे सुरुवात झाली आहे.
कार्यक्रमात आमदार राजेश पाडवी आणि जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी आश्रमशाळेच्या
विद्यार्थ्यांसोबत माती शेणखताचे बियांचे गोळे तयार करून सहभाग नोंदवला. दुर्गम, उंच
भागात माणसांविना सहज पोहोचणं, पशू-पक्ष्यांपासून
बियांचं रक्षण आणि वेळेची मोठी बचत या तंत्रज्ञानामुळं साध्य होणार असून, सातपुड्यातील वनसंपदा आणि पर्यावरण
संवर्धनासाठी हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरणार आहे.
****
केंद्रीय
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविय यांनी आज नवी दिल्लीत निरोगी भारत अभियानांतर्गत
संडे ऑन सायकल अर्थात रविवारी सायकल स्वारी उपक्रमाच्या ८८व्या भागात सहभाग नोंदवला.
राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त ब्रिक्स देश संघटनेच्या सहकार्यातून जवाहरलाल नेहरू
मैदानावर यानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. सायकल चालवणं आरोग्यासह वाहनांची वर्दळ
आणि प्रदुषण कमी करणं यासाठी उपयोगी असल्याचं मांडवीय यांनी यावेळी नमूद केलं.
****
भारताचा
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रानं दुखापतीमुळं खेळाच्या यंदाच्या
उर्वरित हंगामातून माघार घेत असल्याची माहिती दिली आहे. लॉझानमध्ये हंगामातील सर्वोत्तम
कामगिरी केल्यानंतर प्रशिक्षणादरम्यान त्याच्या गुडघ्यात दुखापत झाली. डॉक्टरांसोबत
चर्चा केल्यानंतर उर्वरित हंगामात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याचं नीरजनं समाज
माध्यमावरील एका संदेशात म्हटलं आहे. या निर्णयामुळं
निराश झालो असलो, तरी
आता पूर्णपणे बरा होण्यावर आणि आणखी मजबूत पुनरागमन करण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचं
नीरजनं म्हटलं आहे.
****
आंतरराष्ट्रीय
रायफल नेमबाज - शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारविजेत्या पुण्याच्या पूजा घाटकर यांची जपानमध्ये
आयोजित वीसाव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय दहा मीटर रायफल नेमबाजी संघ प्रशिक्षकपदी
निवड करण्यात आली आहे.
****
महिलांच्या
अशिया चषक क्रिकेट टी-ट्वेंटी स्पर्धेत आज भारताचा सामना थायलंडसोबत होणार आहे. संयुक्त
अरब अमिरातीच्या दुबईमध्ये आज भारतीय वेळेनुसार रात्री साडेआठ वाजता सामन्याला सुरुवात
होईल. भारत स्पर्धेच्या अ गटात आहे.
****
No comments:
Post a Comment