Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 31 August
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ३१ ऑगस्ट
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
किर्गिस्तानची राजधानी बिश्केक इथं आयोजित २६व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. शांघाय सहकार्य संघटनेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही शिखर परिषद विशेष महत्त्वाची ठरत आहे. भारत २०१७ पासून या संघटनेचा पूर्ण सदस्य आहे. या परिषदेच्या निमित्ताने ते SCO
सदस्य देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. याशिवाय, मध्य आशियाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडवणाऱ्या सहाव्या जागतिक भटक्या जमातींच्या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यालाही पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत.
****
२०२६-२७ या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकासदर सात टक्के किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली. अमेरिका दौऱ्यात त्या काल भारतीय समुदायाला संबोधित करत होत्या. अमेरिका-इराण संघर्ष, होर्मुझ सामुद्रधुनीतले अडथळे आणि त्यातून निर्माण झालेली भू-राजकीय अनिश्चितता तसंच पुरवठा साखळीत व्यत्यय असूनही भारत आपली विकासाची गती कायम राखेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताची अर्थव्यवस्था विस्तारत असताना सरकारकडून पद्धतशीर आर्थिक सुधारणांची प्रक्रिया सुरूच राहणार असून, विशेषतः परदेशातून अधिक भांडवल आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं.
****
नेपाळमध्ये चिलिमे आणि लांगटांग परिसरातल्या जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये भारत आणि नेपाळच्या पथकांकडून शोध आणि बचावकार्य सुरू आहे. त्रिशुली-३ ए प्रकल्पासह विविध जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी नेपाळकडून बचावकार्य तीव्र करण्यात आलं आहे. भारत आणि चीनमधल्या तज्ज्ञांसह बचाव पथकं बोगद्यांमध्ये अडकलेल्या व्यक्तींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आतापर्यंत बोगद्याच्या आतून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. बेपत्ता झालेल्या सुमारे अडीच हजार लोकांपैकी शेकडो जण नेपाळमधल्या जलविद्युत प्रकल्पांमध्ये कार्यरत असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, ४०३ भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले असून, ५०० भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या ४०४ नागरिकांची नोंद झाली आहे.
****
वेगळं मत मांडणाऱ्या किंवा
प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना दंडात्मक कारवाईचा धाक दाखवणं हे घटनाबाह्य आणि अधिकाराचा
गैरवापर करणारं आहे, असं मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती
न्यायाधीश उज्जल भुयान यांनी व्यक्त केलं. दिल्लीच्या राष्ट्रीय विधी महाविद्यालयाच्या
१३व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. विद्यापीठांमध्ये प्रस्थापित पदांची
चिकित्सा व्हायला हवी, त्यांच्यावर प्रश्न उपस्थित व्हायला हवेत आणि मतभेदांची परिणती
वैमनस्यात होता कामा नये, असंही ते म्हणाले.
****
बुलढाणा जिल्ह्यातल्या कदमापूर इथल्या जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेनं 'मोबाईलमुक्त विद्यार्थी' हा ठराव
मंजूर केला आहे. केवळ उपदेश न देता किंवा मुलांवर जबरदस्ती न करता, शाळा
व्यवस्थापन समितीने आधुनिक तंत्रज्ञानाचाच आधार घेतला आहे. मुलांच्या मोबाईलमध्ये 'डिजिटल
वेलबिइंग अँड पॅरेंटल कंट्रोल्स' या उपकरणाचा प्रभावी वापर करणारी कदमापूर ही
राज्यातली पहिलीच जिल्हा परिषद शाळा ठरली आहे. या प्रणालीद्वारे विद्यार्थी दिवसभरात किती वेळ
मोबाईल वापरतात आणि काय पाहतात, याची अचूक नोंद पालकांना मिळणार आहे.
****
राज्यातला ऊसाचा २०२६-२७ या
वर्षाचा गाळप हंगाम सुरु होत आहे; या पार्श्वभूमीवर वजनकाट्यांची तपासणी करण्याबाबत
राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. उसाच्या
वजनकाट्यांची तपासणीसाठी आपापल्या जिल्ह्यात भरारी पथकांची स्थापना
करावी, अशी सूचना साखर आयुक्तांनी केली आहे.
****
धुळे इथल्या इतिहासाचार्य
वि. का. राजवाडे संशोधन मंडळातर्फे राष्ट्रवादी
काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, खासदार
शरद पवार यांच्या कृतज्ञता सोहळ्याचं
काल आयोजन करण्यात आलं होतं. विविध क्षेत्रातले मान्यवर यावेळी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी
दूरस्थ माध्यमातून या कार्यक्रमाला
संबोधित करत इतिहास संशोधन संस्थांचं महत्त्व
अधोरेखित केलं.
****
पुण्यात
होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आणि त्या
दरम्यान होणाऱ्या ९९ नांदी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं महाराष्ट्र साहित्य
परिषदेच्या सांगली शाखेच्या वतीनं 'साहित्य प्रेमींचा स्नेह मेळावा' आयोजित
करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे अध्यक्ष योगेश सोमन यांनी
मार्गदर्शन केलं.
****
भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिने महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दीप्ती शर्माने आतापर्यंत १७१ बळी घेत महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज होण्याचा मान मिळवला आहे. दुबईत सुरू असलेल्या महिला टी-20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आपल्या १५०व्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात दीप्तीने हा शानदार विक्रम आपल्या नावावर केला.
****
No comments:
Post a Comment