Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date – 18 August 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ ऑगस्ट २०२६ सायंकाळी ६.१०
****
§ जायकवाडी प्रकल्पाच्या दुसऱ्या
टप्प्यासाठी सहा हजार ४७७ कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
§ राज्यात अन्न आणि औषध प्रशासन
विभागाकडून उत्तम कार्यवाही सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
§ नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातला
दोषी सचिन अंदुरेला जामीन
आणि
§ २०२५ चे राष्ट्रीय क्रीडा
पुरस्कार जाहिर; ग्रँडमास्टर दिव्या देशमुखसह १७ खेळाडूंचा अर्जुन पुरस्काराने गौरव
****
जायकवाडी
प्रकल्पाच्या दुस-या टप्प्यासाठी सहा हजार ४७७ कोटी ८८ लाख रुपयांच्या आर्थिक तरतुदीला
राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यामुळे गोदावरी खोऱ्यातल्या सिंदफणा नदीवरच्या माजलगाव
धरणाच्या कामाला गती मिळणार असून, यातून छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी
आणि नांदेड या पाच जिल्ह्यातल्या सुमारे एक लाख ३१ हजार ६५२ हेक्टर जमिनीला सिंचनाचा
लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे या भागातला औद्योगिक पाणी पुरवठा, मत्स्य व्यवसाय आणि
विद्युत निर्मितीलाही चालना मिळणार आहे.
श्री
क्षेत्र पंढरपूर इथल्या विशेष पुनर्वसन धोरणालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या निर्णयामुळे
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आणि वाणिज्य संकुल आराखड्यातल्या तीन हजार ९९३ कोटी
९० लाख रुपयांच्या विकास कामांना गती मिळणार आहे.
सार्वजनिक
बांधकाम विभागामध्ये ट्रेडस प्लॅटफॉर्म प्रणालीचा वापर करण्याला, किमान आधारभूत किंमत
योजनेत २०२४-२५ हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धान आणि भरडधान्याच्या वाहतूक खर्चाकरता
३२८ कोटी ४७ लाख रुपयांची तरतूद करण्याला, महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन विकास आणि विनियमन
नियम २०१३ मध्ये सुधारणा करण्याला तसंच वित्त आणि नियोजन विभागांची पुनर्रचना करण्यालाही
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
****
समृद्ध
भारताच्या निर्मितीसाठी गुंतवणूकदारांचं महाराष्ट्र हे पसंतीचं राज्य असल्याचं प्रतिपादन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आज इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या
राष्ट्रीय परिषद २०२६ मध्ये ते बोलत होते. अमेरिकेतल्या गुंतवणूकदारांनी आपल्या कल्पना, संशोधन घेऊन महाराष्ट्रात यावं, महाराष्ट्र शासन
त्यांना इथलं कौशल्य, बाजारपेठ आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देईल, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी
केलं. या कार्यक्रमाला भारत आणि अमेरिकेतील गुंतवणूकदार उपस्थित होते.
**
दरम्यान,
या कार्यक्रमानंतर वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, राज्यात अन्न आणि औषध प्रशासन
विभागाकडून उत्तम कार्यवाही सुरू असल्याचं सांगितलं. अन्नपदार्थांशी संबंधित नियमांचं
उल्लंघन झाल्यास नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कठोर कारवाईची
आवश्यकता होती आणि त्यानुसार कारवाई सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यापुढेही एफडीएची
ही कार्यवाही सुरूच राहील, असं त्यांनी सांगितलं.
****
राज्य
शासनानं 'महाराष्ट्र शासन कामकाज नियम २०२६' लागू केले आहेत. या नवीन नियमावलीमुळे,
न्यायप्रविष्ट प्रकरणं वगळता, इतर कोणत्याही प्रकरणी, कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला
निर्णय फिरवण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. याशिवाय,
मुख्यमंत्री प्रशासकीय कामकाजाबाबत कोणतीही माहिती कोणत्याही मंत्री, राज्यमंत्री किंवा
सचिवांकडून मागवू शकतील, आणि ती त्वरित पुरवणं संबंधित विभागाला बंधनकारक राहणार आहे.
****
सामाजिक
कार्यकर्ते नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातला दोषी सचिन अंदुरेला मुंबई उच्च
न्यायालयानं जामीन दिला आहे. दाभोळकरांच्या मारेकऱ्यांमध्ये अंदुरेचा समावेश होता आणि
२०२४ मध्ये सत्र न्यायालयानं त्याला जन्मठेप सुनावली होती. या शिक्षेलाही मुंबई उच्च
न्यायालयानं स्थगिती दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातही
अंदुरे दोषी आहे.
****
नीट
पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणाची चौकशी करण्यासाठी
सर्वोच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या
कारवाईची चौकशीही ही समिती करेल. संसदेवर झालेल्या मोर्चाचं व्हिडीओ चित्रण या समितीकडे
देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.
****
२०२५
च्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. ग्रँडमास्टर विदित गुजराथी,
दिव्या देशमुख, बॅडमिंटन महिला दुहेरी जोडी ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद, अॅथलेटिक्स
खेळाडू तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल व्ही. आणि प्रियांका गोस्वामी, मुष्टीयोद्धा नरेंद्र,
दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांच्यासह एकूण १७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर
झाला आहे.
फुटबॉल
क्षेत्रातल्या भरीव योगदानासाठी इसायाह अरुमैना यागम यांना अर्जुन जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. एथलेटिक्स
कोच परवीर सिंह, बॉक्सिंग कोच छोटेलाल यादव आणि शूटिंग कोच नेहा नंदकुमार चव्हाण यांना
द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय, क्रीडाक्षेत्राच्या प्रोत्साहन
आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय
क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार पुण्यातल्या आर्मी पॅरालंपिक नोडला दिला जाणार आहे.
****
भारत
आणि श्रीलंकेदरम्यान सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या चौथ्या दिवशी
भारताचा दुसरा डाव १९३ धावांवर संपुष्टात आला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या
दुसऱ्या डावात चार बाद ८७ धावा झाल्या असून, भारताकडे ३२५ धावांची आघाडी आहे.
दरम्यान,
फलंदाज ऋषभ पंतनं या सामन्यात कसोटी क्रिकेटमधले आपले शंभर षट्कार पूर्ण केले. ही कामगिरी
करणारा तो पहिला भारतीय आणि जगातला चौथा खेळाडू ठरला आहे.
****
हिंगोली
तालुक्यातल्या लिंबाळा मक्ता इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या शिक्षकांच्या रिक्त
जागा भराव्यात आणि विद्यार्थ्यांकरता आवश्यक त्या सोयी- सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,
या मागणीसाठी क़ॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी ग्रामस्थांसोबत शाळेसमोर
आंदोलन सुरू केलं आहे. त्यांच्या मागणीनुसार या शाळेचे मुख्याध्यापक विनोद कटके यांच्यावर
काल शिक्षण विभागानं निलंबनाची कारवाई केली, मात्र, शिक्षकांची पदे भरली जाईपर्यंत
आंदोलन मागे घेणार नसल्याचं दीपके यांनी सांगितलं आहे.
****
लातूर
महापालिकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्यानं कामकाज ठप्प झालं
आहे. सत्ताधारी गटातल्या चार नगरसेवकांकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात
असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.
****
नानाजी
देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या
महिला बचत गटांना गावपातळीवर कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी प्रकल्प मूल्याच्या
६० टक्के म्हणजेच कमाल २४ लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. प्रत्येक गावातून
केवळ एकाच पात्र महिला बचत गटाची या योजनेसाठी निवड केली जाणार असल्याची माहिती प्रकल्प
संचालक धनश्री जाधव यांनी दिली.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातल्या मौजे बोधडी परिसर इथल्या शेवगा प्रक्रिया केंद्राचं
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते काल उद्घाटन करण्यात आलं. आदिवासी शेतकऱ्यांच्या
शेवगा उत्पादनाला मूल्यवर्धनाची जोड देण्यासाठी हे केंद्र उभारण्यात आलं आहे.
****
परभणी
इथं राज्य सरकारच्या मिशन लक्ष्यवेध या योजनेअंतर्गत विविध खेळांच्या स्पर्धा पार पडल्या.
ऑलिम्पिक स्तरावर खेळल्या जाणाऱ्या १२ खेळ प्रकारांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सरकार
ही योजना राबवत आहे. यामध्ये परभणी जिल्ह्यातल्या क्रीडा प्रतिभा विकास केंद्रामार्फत
अॅथलेटिक्स, कुस्ती आणि टेबल टेनिस या तीन क्रीडा प्रकारांमध्ये प्रत्येकी २० खेळाडूंची
निवड करण्यात आली.
****
मतदार
यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सहा लाख
१२ हजार ७०१ मतदारांची नावं अंतिम यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. हे प्रमाण एकूण
मतदारांच्या १९ पूर्णांक ०५ टक्के आहे. शहरातल्या तीन लाख ४३ हजार ९६३ मतदारांची माहिती
उपलब्ध झालेली नाही. नाव वगळलं गेल्यास नागरिकांना फॉर्म-६ भरून पुन्हा मतदार यादीत
नाव नोंदवता येणार आहे.
****
लातूर
जिल्ह्यात पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून, अनेक ठिकाणी पिकं पिवळी पडत आहेत. या
परिस्थितीत शेतीचा हंगाम वाचावा आणि चांगला पाऊस पडावा, यासाठी शेतकरी आणि ग्रामस्थांनी
अनोख्या पद्धतीनं प्रार्थना करताना, चाकूर तालुक्यातल्या वडवळ नागनाथ मंदिरात महादेवाची
पिंड पाण्यामध्ये ठेवून संपूर्ण गाभारा पाण्यानं भरून टाकला. असं केल्यानं पाऊस पडतो,
अशी ग्रामस्थांची समजूत आहे.
****
No comments:
Post a Comment