▼

Tuesday, 18 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 18.08.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 18 August 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ ऑगस्ट २०२६ दुपारी १.०० वा.

****

बारावी ब्रिक्स पर्यावरण मंत्री बैठक नवी दिल्लीत भारत मंडपम इथं सुरू आहे. ब्रिक्स देशांचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ या बैठकीत भाग घेत आहेत. पर्यावरण क्षेत्रातलं सहकार्य अधिक बळकट करणं, सदस्य देशांमध्ये सहमती निर्माण करणं आनि पर्यावरणाशी संबंधित महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा पुढे नेणं, हा या बैठकीचा उद्देश आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत.

****

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरात राज्यांसाठी नव्या प्रभारींची घोषणा केली आहे. यामध्ये विनोद तावडे हे उत्तर प्रदेशचे, डॉक्टर सतीश पुनिया पंजाबचे तर तरुण चुघ गुजरातचे पक्षाचे राज्य प्रभारी म्हणून काम पाहतील.

****

विरोधी पक्ष, परकीय योगदान नियमन कायदा अर्थात एफसीआरए बाबत व्होट बँकेच्या राजकारणासाठी चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे. एका खाजगी वृत्तसंस्थेशी ते बोलत होते. या कायद्यामुळे परदेशी फंडिंगमध्ये पारदर्शकता येईल आणि आता सत्य समोर येईल, असं ते म्हणाले.हे  विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवणं, हा एक उत्कृष्ट निर्णय असल्याचं मत रिजिजू यांनी व्यक्त केलं.

****

झारखंड सरकारच्या, JSSC-CGLपरीक्षा आणि TDPLएजन्सीद्वारे घेण्यात आलेल्या सर्व स्पर्धा परीक्षा रद्द करण्याच्या घोषणेनंतरही विद्यार्थ्यांचं आंदोलन आज पंचविसाव्या दिवशी सुरूच आहे. परिक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचं विद्यार्थ्यांनी स्वागत केलं, पण हा विजय अपूर्ण असल्याचं सांगत या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी आणि परिक्षा पद्धतीत सर्वसमावेशक बदल व्हावा, ही आपली मागणी लावून धरली. येत्या वीस तारखेला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा नेण्याबाबत हे विद्यार्थी आज निर्णय घेतील, अशी शक्यता असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहनं चालवणाऱ्या चालकांना व्यवहारिक मराठी भाषेचं ज्ञान असणं अनिवार्य करण्यात आल्यानंतर यासंदर्भातल्या नियमांच्या अंमलबजावणीसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्या मोटार परिवहन विभागातल्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. परिवहन विभागाकडून गेल्या साडेतीन महिन्यांपासून राबवण्यात आलेल्या‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी संवाद पाठ्यक्रम’ अभियानात १ लाख ६५ हजारांहून अधिक चालकांनी सहभाग नोंदवला. या अभियानानंतर, कारवाईच्या कक्षेत येणाऱ्या उर्वरित अमराठी चालकांच्या बाबतीत नियमांची अंमलबजावणी कोणत्या पद्धतीनं करावी, याबाबत उद्याच्या बैठकीत सविस्तर चर्चा केली जाणार आहे.

****

हिंगोली तालुक्यातल्या लिंबाळा मक्ता इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात आणि विद्यार्थ्यांकरता आवश्यक त्या सोयी- सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी क़ॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी ग्रामस्थांसोबत शाळेसमोर आंदोलन सुरू केलं आहे. दीपके यांनी सुरू केलेल्या ‘सरकारी स्कूल ठीक करो’ या अभियानाचा हा भाग आहे. दीपके यांच्या मागणीनुसार या शाळेचे मुख्याध्यापक विनोद कटके यांच्यावर काल शिक्षण विभागानं निलंबनाची कारवाई केली, मात्र, शिक्षकांची पदे भरली जाईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं दीपके यांनी सांगितलं आहे.

****

मराठी जेन झी प्रेक्षकवर्ग अन्य भाषिक मनोरंजनाकडे वळण्याऐवजी मराठी चित्रपटांकडे आकर्षित व्हावा, यासाठी मराठी आत्मा कायम ठेवून आधुनिक तंत्रज्ञान, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि प्रभावी निर्मितीमूल्यांचा वापर करणारा चित्रपट निर्माण होणं गरजेचं असून, अशा चित्रपटाच्या निर्मितीत राज्य सरकार सहभागी होईल, असं प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांनी मुंबईत संयुक्तपणे आयोजित केलेल्या परिसंवादात ते बोलत होते. मराठी चित्रपटांमध्ये गुणवत्ता आणि नावीन्य आहे, मात्र निर्मितीइतकाच स्क्रीन, वितरण आणि प्रेक्षकवर्ग यांचाही अभ्यास करणं आवश्यक आहे, यासाठी व्यवहार्य मॉडेल तयार झाल्यास महाराष्ट्र शासन त्यात गुंतवणूकदार म्हणून भाग घेईल, असं शेलार यांनी सांगितलं.

****

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी भारतीय संघानं पाच बाद १२० धावा केल्या आहेत. भारताकडं आता एकूण २९४ धावांची आघाडी झाली आहे. दुसऱ्या डावात देवदत्त पडिकल ४४ धावा काढून बाद झाला.

****

No comments:

Post a Comment