▼

Tuesday, 18 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 18.08.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 18 August 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ ऑगस्ट २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

नवी दिल्लीमध्ये आज बारावी ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची बैठक होत आहे. पर्यावरण क्षेत्रातलं सहकार्य अधिक बळकट करणं, सदस्य देशांमध्ये सहमती निर्माण करणं आणि पर्यावरणाशी संबंधित महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा पुढे नेणं, हा या बैठकीचा उद्देश आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील.

****

झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षांच्या उमेदवारांनी केलेल्या चोवीस दिवसांच्या आंदोलनानंतर, राज्य सरकारनं २०२४ ची JSSC-CGL परीक्षा आणि TDPL एजन्सीद्वारे घेण्यात आलेल्या सर्व स्पर्धा परीक्षा रद्द केल्या आहेत. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी काल संध्याकाळी मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीनंतर या निर्णयाची घोषणा केली. याशिवाय, २०१४ पासून झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोग यांनी घेतलेल्या भरती परीक्षांची सखोल चौकशी करण्याचे आदेशही राज्य सरकारनं दिले आहेत. आंदोलकांच्या काही मागण्या अजूनही प्रलंबित आहेत, असं आंदोलक विद्यार्थी नेते पियुष कुमार यांनी सांगितलं आहे.

****

लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ यांना नेपाळ लष्कराच्या 'मानद जनरल' या पदवीनं सन्मानित करण्यात आलं आहे. काठमांडू इथल्या एका विशेष समारंभात काल नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या हस्ते हे मानद पद प्रदान करण्यात आलं. १९५० पासून चालत आलेल्या या परंपरेनुसार भारत आणि नेपाळ एकमेकांच्या लष्कर प्रमुखांना 'मानद जनरल' हा दर्जा प्रदान करतात.

****

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी काल पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या चमूची घोषणा केली. यात, वसुंधरा राजे सिंधिया, तीरथसिंह रावत, राम माधव, बैजयंत जय पांडा, सरदार मनप्रीतसिंग बादल आणि रेखा वर्मा यांच्यासह तेरा राष्ट्रीय उपाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे; तर विनोद तावडे, सुनील बन्सल, स्मृती इराणी आणि बिप्लब कुमार देब यांच्यासह आठ नेत्यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

****

माजी मुख्यमंत्री  सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनी, म्हणजे २१ ऑगस्टला दरवर्षी ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. जलसंधारण क्षेत्रात सुधाकरराव नाईक यांच्या योगदानाचं स्मरण करणं आणि जलसंधारणाची लोकचळवळ अधिक व्यापक  करणं, हा यामागचा उद्देश आहे. या निमित्ताने राज्यभर ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’चं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या वॉकेथॉनमध्ये तरुणांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि जलसंधारणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

****

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले थोर क्रांतिकारक, आझाद हिंद सेनेचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा स्मृतिदिन दरवर्षी आजच्या दिवशी म्हणजे १८ ऑगस्टला पाळला जातो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दिनाच्या औचित्यानं नेताजींना आदरांजली वाहिली आहे. नेताजींचं अदम्य साहस आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेलं सर्वोच्च बलिदान म्हणजे प्रेरणेचा स्त्रोत आहे, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.

****

नाशिक जिल्ह्यातल्या नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांसाठी बोटिंग सफारी सुरू करण्यात येणार असून, निसर्ग परिचय केंद्र, पक्षी निरीक्षण गॅलरी अशा सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासन आणि वन्यजीव विभागानं संयुक्तपणे या अभयारण्यासाठी तयर केलेल्या इको टुरिझमच्या आराखड्याचं सादरीकरण झालं, त्यावेळी ही माहिती देण्यात आली.या अभयारण्यात जास्तीत जास्त पक्षी यावेत यासाठी जलगुणवत्ता सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे.

****

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करूनही युवकांना तातडीने रोजगार मिळण्यात येणा-या दूर करण्यासाठी बीडमध्ये कौशल्यवर्धन केंद्र अर्थात सी-ट्रिपल आयटी उभारण्यात आलं असून, यात उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षण देऊन युवकांना रोजगारक्षम बनवण्यात येणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना नियमित पदवी किंवा पदविका शिक्षण सुरू ठेवून अंशकालीन अभ्यासक्रम पूर्ण करता येतील. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शनिवार व रविवारीही वर्ग घेण्यात येणार आहेत. सप्टेंबरअखेर या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. या केंद्रात १८ अभ्यासक्रमांसह ९ अद्ययावत प्रयोगशाळा असतील.

****

माझं गाव, आरोग्य संपन्न गाव या अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हत्तीरोग शोध मोहिमेला सुरुवात झाली आहे. गावपातळीवर नागरिकांची तपासणी करून हत्तीरोगाचे संशयित आणि बाधित रुग्ण शोधणं, पूर्वी निदान झालेल्या रुग्णांचा पाठपुरावा करणं, त्यांना आवश्यक उपचार आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देणं, आणि हत्तीरोगाच्या प्रतिबंधाबाबत जनजागृती या मोहिमेअंतर्गत करण्यात येणार आहे.

****

No comments:

Post a Comment