▼

Saturday, 22 August 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.08.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 22 August 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ ऑगस्ट २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

ऑगस्ट महिन्यासाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेला साखरेचा कोटा मागणीच्या तुलनेत अपुरा पडत असल्यानं साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मागील तीन दिवसांत घाऊक बाजारात साखरेच्या दरात क्विंटलमागे ५०० रुपयांची वाढ झाली, सध्या किरकोळ बाजारात साखरेची ७५ ते ८० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. केंद्र सरकारनं ऑगस्ट महिन्यासाठी २२ लाख ५० हजार टन साखरेचा कोटा खुला केला आहे.

****

राज्यातल्या तीन शिक्षकांसह एकंदर ४८ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार काल जाहीर झाले. बीड जिल्ह्यातल्या केज इथल्या साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या शिक्षिका डॉक्टर कविता गित्ते, नाशिक महानगरपालिकेच्या १८ क्रमांकाच्या शाळेतील शिक्षिका कुंदा बच्छाव आणि साताऱ्याच्या सैनिकी शाळेतले शिक्षक शिवप्रसाद टिंगरे यांना यंदा या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. येत्या पाच सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी हे पुरस्कार प्रदान केले जातील.

****

नवतंत्रज्ञानातून भारतीय शेतीत हरीतक्रांती होईल, असा विश्वास भारतीय कृषी संशोधन संस्थानचे संचालक आर. एन. पडारिया यांनी व्यक्त केला आहे. माहिती आणि प्रसार कार्यालय-'पीआयबी' मुंबईच्या वतीने राज्यातील आकांक्षीत जिल्ह्यातील पत्रकार अभ्यास दौऱ्यादरम्यान धाराशिव इथं ते काल पत्रकारांशी बोलत होते. या अभ्यास दौऱ्यात राज्यातील धाराशिव, वाशिम, नंदुरबार आणि गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे. धाराशिव या आकांक्षीत जिल्ह्यात शेती उत्पादन वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रांची संख्या वाढवण्यासह खरीपातील सर्वाधिक घेतले जाणारे सोयाबीन या पिकासाठी संशोधन केंद्र सुरू व्हावे, ऊस संशोधन केंद्र सुरू व्हावे यासह जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना उत्पादन ते विक्री अशी साखळी तयार करण्यासाठी विशेष योजना कराव्यात, कृषी प्रक्रिया उद्योग आणि कृषी आधारित मोठे उद्योग धाराशिव जिल्ह्यात सुरू व्हावेत, ज्यामुळे धाराशिव जिल्ह्यात कृषी उद्योगाला चालना मिळेल अशा सूचना यावेळी जिल्ह्यातील पत्रकारांनी केल्या.

****

"राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात डेटा सेंटर उभारण्यात येणार असून येत्या काळात महाराष्ट्र आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर होईल" अशी माहिती विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर यांनी दिली आहे. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर इथल्या स्वेरी महाविद्यालयात "ज्ञान, तंत्रज्ञान आणि युवाशक्तीच्या माध्यमातून विकसित महाराष्ट्राची निर्मिती" या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. जगातील अनेक देशांचा डेटा सुरक्षित ठेवण्याचं काम महाराष्ट्र करेल, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान,मंगळवेढा इथं नगरपालिकेच्या शाळा क्रमांक पाचच्या नूतन इमारतीचं उद्घघाटन आणि कोनशिलेचे अनावरण नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आलं.

****

निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध या गावानं पुस्तकांचं गाव अशी आपली नवीन ओळख निर्माण केली आहे. उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुस्तकांचं गाव उपक्रमाचं काल उद्घघाटन करण्यात आलं. राज्यातील निवडक गावांपैकी तीन गावांना पुस्तकांचं गाव हा गौरव प्राप्त झाला असून नागपूर विभागातील पहिल्या गावाचा मान नवेगाव बांधला मिळाला आहे.

****

धुळे शहरात साक्री मार्गावर उभारण्यात आलेल्या १०० खाटांच्या महिला आणि  बाल रुग्णालयाचं तसंच 'एमआरआय' तपासणी केंद्र आणि शवविच्छेदन कक्षाचं लोकार्पण काल सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आलं. धुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य गरजू रुग्णांना खासगी तसंच मुंबई-नाशिकमध्ये उपलब्ध आरोग्य सुविधा सार्वजनिक आरेाग्य विभागाच्या माध्यमातून धुळे जिल्हा रुग्णालयातच उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आम्ही कटीबद्ध आहोत, असं प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी केलं.

****

अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या गहू संशोधन केंद्राला अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पांतर्गत देश पातळीवरील उत्कृष्ट केंद्राचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. जयपूर इथल्या राजस्थान कृषी संशोधन संस्थेमध्ये गेल्या १८ ऑगस्ट झालेल्या अखिल भारतीय गहू आणि जव संशोधन शास्त्रज्ञ बैठकीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गहू संशोधन केंद्राच्या वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ डॉक्टर स्वाती भराड यांनी विद्यापीठाच्या वतीने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारला.

****

जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीने महिला दुहेरीची उपांत्य फेरी गाठून भारताचं कांस्य पदक निश्चित केलं आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत या भारतीय जोडीने चीनच्या जिया यी फैन आणि झांग शू शियान या चौथ्या मानांकित जोडीचा १६-२१, २१-१५, २१-१३ असा पराभव केला. आज उपांत्य फेरीत त्रिशा आणि गायत्रीचा सामना चीनच्या लियू शेंग शू आणि टॅन निंग या शीर्ष मानांकित जोडीशी होईल.

****

महिला हॉकी विश्वचषकाच्या दुसऱ्या फेरीत, भारतीय महिला हॉकी संघाला नेदरलँड्सकडून ०-२ असा पराभव पत्करावा लागला. ॲमस्टेलवीन इथं झालेल्या सामन्यात यजमान संघानं दोन्ही गोल पेनल्टी कॉर्नरद्वारे केले. या पराभवामुळे भारतीय संघाचा उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला आहे. उद्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या फेरीतील अंतिम सामन्यात भारत विजयी झाला तर उपांत्य फेरी गाठू शकतो, त्यामुळे भारतीय संघासाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे.

****

No comments:

Post a Comment