▼

Saturday, 22 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.08.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 22 August 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ ऑगस्ट २०२६ दुपारी १.०० वा.

****

लहान मुलांच्या आरोग्याची सुरक्षितता लक्षात घेऊन केंद्र सरकारनं चार वर्षांखालील मुलांसाठीच्या विशिष्ट सर्दी-खोकल्याच्या औषधांवर कडक कारवाई केली आहे. सरकारनं ‘क्लोरफेनिरामाइन मॅलेट’ आणि ‘फेनिलेफ्राइन हायड्रोक्लोराइड’युक्त औषध मिश्रणांच्या उत्पादन, विक्री तसंच वितरणावर पूर्णपणे बंदी घातली आहे. औषधांच्या सुरक्षिततेबाबत तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, डॉक्टरांनी बालकांना ही औषधे न देण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

****

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ‘इपीएफओ’नं आस्थापनांसाठी ‘कर्मचारी नोंदणी मोहीम’, सुरू केली आहे. सध्या ‘ईपीएफ’च्या कक्षेत नसलेल्या कामगारांना भविष्य निर्वाह निधी, निवृत्तीवेतन आणि विम्याची सामाजिक सुरक्षा मिळवून देणं हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

कामगार आणि रोजगार मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, ही मोहीम येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. यादरम्यान कंपन्या, आस्थापना सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची अधिकृत ऑनलाइन पद्धतीद्वारे स्वयंस्फूर्त नोंदणी करू शकतील. पात्र कामगारांना सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आणून मालक आणि कर्मचारी या दोघांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.

****

देशात दोन वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रात झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. झारखंडमधील रामगड जिल्ह्यातील एका सिमेंट आणि स्टील ऊर्जा प्रकल्पात टरबाइनचा भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीत तीन अभियंत्यांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. अतिउच्च तापमानामुळे सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरल्याने हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रामगड-पत्रातू महामार्गावर रास्ता रोको करत मृतकांच्या कुटुंबाला भरपाईची मागणी केली.

दुसऱ्या घटनेत, तेलंगणाच्या यादद्री भुवनगिरी जिल्ह्यातील पोचमपल्ली भागातील ‘हॅझलो लॅब्स’ या कंपनीत रासायनिक भट्टीचा स्फोट होऊन दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले. जखमींवर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दोन्ही घटनांमधील स्फोटांच्या कारणांचा तपास स्थानिक प्रशासन करत आहे.

****

राज्यात व्यावसायिक सामाजिक दायित्व-सीएसआर निधीचा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि समन्वयित वापर करण्यासाठी ‘महा सीएसआर प्राधिकरण’ स्थापन करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या प्राधिकरणामार्फत सीएसआर निधीचं समन्वयन, निरीक्षण आणि योग्य वापर सुनिश्चित केला जाणार आहे. शासनाच्या प्राधान्यक्रमातील प्रकल्पांची दर्जेदार ‘प्रोजेक्ट बँक’ तयार करून ती कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांना उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. तसंच, सीएसआर निधीतून उभारलेल्या प्रकल्पांची देखभाल आणि दुरुस्ती यांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

****

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ‘नाट्य लेखन प्रोत्साहन योजने’साठी नवोदित लेखकांनी नाट्यसंहीता पाठवण्याचं आवाहन नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केलं आहे. या संहिता येत्या २० आक्टोबरपर्यंत पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी ८५ ९१ ७० ६८ ८७ या क्रमांकावर अथवा www.natyaparishad.org या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असं परिषदेतर्फे सांगण्यात आलं. या योजनेत उत्कृष्ठ संहितेसाठी २१ हजार रुपयांचं प्रथम पारितोषिक दिलं जातं. द्वितीय क्रमांकाच्या संहितेसाठी १५ हजार आणि तृतीय क्रमांकासाठी ११ हजार रुपये; तर उत्तेजनार्थ तीन हजार रुपये पारितोषिक दिलं जातं तसंच संगीत नाटकासाठी ११ हजार रुपयांचं विशेष पारितोषिक दिलं जातं.

****

मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये सव्वातीन कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचं अमली पदार्थ-हेरॉइन बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. पोलिसांनी काल रात्री कांदिवली भागात सापळा रचून या दोघांना पकडल्याचं सूत्रांनी सांगितलं.

****

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत येत्या तीन दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्यासह पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, जिल्ह्यातील काही भागांत आज पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात पावसाचा खंड कायम असून सोयाबीन पिकाला वाचवण्यासाठी शेतकरी तुषार सिंचनाद्वारे पाणी देत आहेत. पावसाअभावी पिकांवर पांढरा मावा आणि पिवळा मोझॅकसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभं राहिलं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

नेदरलँडमधल्या अमस्टेलवीन इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघातर्फे आयोजित पुरुष हॉकी विश्वचषकाच्या दुसऱ्या टप्प्यात आज भारताचा सामना यजमान नेदरलँड्सशी होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी साडे सात वाजता सुरू होईल. पाकिस्तानवर ५-३ असा शानदार विजय मिळवून भारतानं ‘ड’ गटात दुसरं स्थान निश्चित केलं. आता भारत, इंग्लंड आणि ‘अ’ गटामधील अव्वल दोन संघांसह ‘ई’ गटामध्ये सामील होईल. ‘गट ई’मधील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. भारतीय संघ शून्य गुणांसह दुसऱ्या टप्प्यात पोहोचला असून, इंग्लंडच्या खात्यात दोन गुण जमा आहेत.

****

No comments:

Post a Comment