▼

Saturday, 22 August 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.08.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 22 August 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ ऑगस्ट २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      बालकांसाठी सर्दी-खोकल्याच्या विशिष्ट औषध मिश्रणांवर केंद्र सरकारकडून बंदी

·      आपलं सरकार लोकसहभागातून व्यसनाधीनतेला पराभूत करेल-मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त

·      राज्यात मराठी न बोलणाऱ्या दोन हजार ७६७ रिक्षा-टॅक्सी चालकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

आणि

·      गुन्ह्यांबाबत शून्य सहनशीलता आणि पीडितेबाबत कमाल संवेदनशीलता, हेच प्रभावी पोलीस व्यवस्थेचं सूत्र-विजया रहाटकर यांचं प्रतिपादन

****

बालकांच्या सर्दी, खोकल्यावरच्या विशिष्ट औषध मिश्रणांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. आरोग्य मंत्रालयानं आज यासंबंधीची अधिसूचना जारी केली. क्लोरफे-निरामाइन मॅलेट आणि फेनिले-फ्राइन हायड्रोक्लोराइड असलेल्या सर्व निश्चित मात्रेच्या या औषधांवर 'चार वर्षांखालील मुलांना ही औषधे देऊ नयेत', असा स्पष्ट इशारा, नमूद करणं, अनिवार्य करण्यात आलं आहे. लहान मुलांचं आरोग्य आणि सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या औषधांच्या लेबल, माहितीपत्रकं आणि जाहिरातींवर हा इशारा स्पष्टपणे दर्शवण्याचे निर्देश सरकारनं औषध उत्पादक कंपन्यांना दिले आहेत.

****

आपलं सरकार लोकसहभागातून व्यसनाधीनतेला पराभूत करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. नशामुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत कॅम्पस कनेक्ट या मोहिमेचा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र तयार करण्याकरता नशा मुक्त अभियानात युवकांची मदत महत्त्वाची आहे. पुढची काही वर्ष लढाई लढावी लागेल पण अंतिम विजय हा आपलाच होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले –

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

नवी मुंबई विमानतळ पोलीस ठाणे, एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर, व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. तसंच रील आणि पोस्टर स्पर्धेतल्या विजेत्यांचा गौरवही करण्यात आला.

****

पोलीस दलात १० वर्षे सेवा बजावलेल्या पोलीस श्वानांना सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही पोलीस दलासोबतच ठेवण्यात येणार आहे. पोलिस दलात सेवेदरम्यान श्वान आणि त्यांच्या रखवालदारांमध्ये जिव्हाळ्याचं नातं निर्माण होतं. मात्र, निवृत्तीनंतर या श्वानांना इतरत्र दत्तक दिल्याने अनेकदा त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होऊन ते अन्नत्याग करत असल्याचं, निदर्शनास आलं. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा संवेदनशील निर्णय घेतला. पोलिस दलात मोलाची सेवा बजावलेल्या या श्वानांची काळजी घेणं ही आपलीच जबाबदारी असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर आता पोलीस श्वानांचे त्यांच्या रखवालदारांसोबतचे ऋणानुबंध कायम राहतील आणि त्यांचं उर्वरित आयुष्य सुखकर होईल. त्यांच्या भोजन तसंच देखभालीचा आवश्यक खर्च गृह विभागाकडून केला जाणार आहे.

****

व्यवहारी मराठी भाषेचा वापर न करणाऱ्या दोन हजार ७६७ रिक्षा-टॅक्सी चालकांना गेल्या दोन दिवसांत परिवहन विभागानं ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. राज्यभरात रिक्षा आणि टॅक्सीचालकांना कामकाजापुरती मराठी भाषा अवगत असणं अनिवार्य केल्यानंतर गुरुवारपासून परिवहन विभागानं विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. मुंबई महानगर क्षेत्र वगळता राज्यभरात ५ हजार २९९ रिक्षा-टॅक्सी चालकांची भाषा तपासणी करण्यात आली. यापैकी ७७७ चालकांना व्यवहार्य मराठी येत नसल्याचं निष्पन्न झालं. त्यापैकी ६६६ जणांना नोटीस बजावण्यात आली. ही तपासणी मोहीम ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

****

अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा गुंतवणूक परिषद पार पडली. पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. जिल्ह्यात नवीन उद्योग गुंतवणुकीसाठी पुढाकार घेत असून या उद्योगास सुरक्षा आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही विखे पाटील यांनी यावेळी दिली. जिल्ह्यात १३ हजार १७३ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार झाले असून यामध्ये ११ हजार ९४८ तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात ‘छात्रों की गूँज’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना संबोधित करणार आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षानं या कार्यक्रमावर टीका केली आहे. या कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काँग्रेसनं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना पैसे दिल्याचा दावा भाजपनं केला असून, काँग्रेस पक्षाकडून त्याचं खंडन करण्यात आलं आहे.

****

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ‘नाट्य लेखन प्रोत्साहन योजने’साठी नवोदित लेखकांनी नाट्यसंहीता पाठवण्याचं आवाहन नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केलं आहे. या संहिता येत्या २० ऑक्टोबरपर्यंत पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी www.natyaparishad.org या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असं आवाहन परिषदेतर्फे करण्यात आलं आहे.

****

विद्यार्थ्यांना साहित्याशी जोडून मराठीचा वापर आणि महत्त्व वाढवण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नियोजित शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत झालेल्या बैठकीत, ते दूरदृश्यप्रणालीद्वारे बोलत होते. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी यावेळी बोलतांना, हे संमेलन पुढील शतकाच्या साहित्यिक वाटचालीचा पाया घालणारं ठरावं, अशी अपेक्षा व्यक्त करत, विद्यार्थी, आणि नवोदित तसंच ग्रामीण साहित्यिकांना व्यापक व्यासपीठ देत सर्व मिळून हे संमेलन ऐतिहासिक करूया, असं आवाहन केलं. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ साहित्यिकांना साहित्य संमेलनात सहभागी करून घेण्यासाठी परिवहन विभागाच्या माध्यमातून विशेष व्यवस्था करण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली. राज्यातल्या विद्यापीठांमध्येही विद्यार्थी साहित्य संमेलनं आयोजित करण्याचं आवाहन मंत्री पाटील यांनी यावेळी केलं.

****

गुन्ह्यांबाबत शून्य सहनशीलता आणि पीडितेबाबत कमाल संवेदनशीलता, हेच प्रभावी पोलीस व्यवस्थेचं सूत्र असलं पाहिजे, असं प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केलं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र पोलिसांच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर इथं ‘शक्ती आणि सुरक्षा’ कार्यक्रमांतर्गत, सायबर गुन्ह्यांविरोधात पोलिसांची क्षमतावृद्धी या विषयावरच्या कार्यशाळेत त्या आज बोलत होत्या. तक्रारदार महिलेबाबत कोणताही पूर्वग्रह न ठेवता तिला पुरेसा वेळ देऊन तिचं म्हणणं नीट ऐकून घ्यावं. सन्मानपूर्वक वागणुकीतून तिचा पोलिसांवरील विश्वास वाढतो, असं रहाटकर यांनी नमूद केलं. सायबर गुन्हे, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून होणारी फसवणूक, बनावट चित्रफिती आणि डिजिटल आर्थिक फसवणुकीसारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी पोलिसांनी तंत्रज्ञान, माहिती आणि वैज्ञानिक पद्धतींचा प्रभावी वापर करावा असं रहाटकर यांनी सांगितलं.

दरम्यान, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि महिला’ या विषयावरील क्षमता बांधणी कार्यशाळेलाही रहाटकर यांनी मार्गदर्शन केलं. महिला उद्योजक तसंच बचत गटातील महिलांनीही एआयचा उपयोग व्यवसायवृद्धीसाठी करावा, असं आवाहन त्यांनी केलं.

****

नाशिक इथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते या महोत्सवाचं उदघाटन करण्यात आलं. रानभाज्यांच्या बियाण्यांची उपलब्धता वाढवून आगामी काळात त्यांची बँक निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक असल्याचं जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितलं. रानभाज्यांना प्रोत्साहन देणं आणि त्या थेट शहरी ग्राहकापर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित या महोत्सवात, जिल्हाभरातले सुमारे ५० शेतकरी सहभागी झाले आहेत.

****

बॅडमिंटन जागतिक महासंघाच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांची आज महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत चीनी जोडीसोबत रोमांचक लढत सुरू आहे. भारतीय जोडीने पहिला गेम २१-१८ फरकाने जिंकला, तर दुसऱ्या गेममध्ये चिनी जोडीचं २१ - १३वर्चस्व राहिलं.

****

स्वित्झर्लंड मध्ये सुरु असलेल्या लूझान डायमंड लीग स्पर्धेत भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रान ८८ पूर्णांक ५ दशांश मीटर अंतरापर्यंत भाला फेकून रौप्यपदक पटकावलं. जून २०२५ मधली पॅरिस डायमंड लीग नंतरची चोप्राची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. श्रीलंकेच्या रमेश पाथिराज यानं अवघ्या नऊ सेंटीमीटर फरकानं चोप्राला मागे टाकत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

****

भारत आणि श्रीलंका दरम्यान सुरू असलेल्या दोन क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मालिकेतला दुसरा आणि अंतिम सामना उद्यापासून कोलंबो इथं खेळवला जाणार आहे. मालिकेतला पहिला सामना जिंकून भारत मालिकेत एक - शून्य नं आघाडीवर आहे.

****

नांदेड जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांमध्ये असलेली समन्वयाची साखळी तोडण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस दलाने गुन्हेगारांचं विलीगीकरण केलं आहे.

****

No comments:

Post a Comment