Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 23 August
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ ऑगस्ट २०२६ सकाळी ७.१० मि.
****
· बालकांसाठी सर्दी-खोकल्याच्या विशिष्ट औषध मिश्रणांवर केंद्र सरकारकडून बंदी
· आपलं सरकार लोकसहभागातून व्यसनाधीनतेला पराभूत करेल-मुख्यमंत्र्यांकडून विश्वास
व्यक्त
· महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं प्रतिपादन; पुण्यात
‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात विद्यार्थिनी आणि तरुणींशी संवाद
· जिल्हा परिषद शाळेत विनापरवानगी प्रवेश करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी
सीजेपीचे प्रमुख अभिजीत दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
आणि
· जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या त्रिसा-गायत्री जोडीला
कांस्यपदक
****
बालकांच्या सर्दी, खोकल्यावरच्या
विशिष्ट औषध मिश्रणांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. आरोग्य
मंत्रालयानं काल याबाबतची अधिसूचना जारी केली. क्लोरफे-निरामाइन मॅलेट आणि फेनिले-फ्राइन
हायड्रोक्लोराइड असलेल्या सर्व निश्चित मात्रेच्या या औषधांवर 'चार वर्षांखालील
मुलांना ही औषधे देऊ नयेत', असा स्पष्ट इशारा, नमूद करणं, अनिवार्य
करण्यात आलं आहे. लहान मुलांचं आरोग्य आणि सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला
आहे. या औषधांच्या लेबल, माहितीपत्रकं आणि जाहिरातींवर हा इशारा स्पष्टपणे दर्शवण्याचे
निर्देश सरकारनं औषध उत्पादक कंपन्यांना दिले आहेत.
****
आपलं सरकार लोकसहभागातून व्यसनाधीनतेला
पराभूत करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. नशामुक्त नवी
मुंबई अभियानांतर्गत कॅम्पस कनेक्ट या मोहिमेचा काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
झाला, त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र तयार करण्याकरता नशा
मुक्त अभियानात युवकांची मदत महत्त्वाची आहे. पुढची काही वर्ष लढाई लढावी लागेल पण
अंतिम विजय हा आपलाच होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले...
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नवी मुंबई विमानतळ पोलीस ठाणे, एकात्मिक
कमांड अँड कंट्रोल सेंटर, व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राचं उद्घाटन, तसंच रील
आणि पोस्टर स्पर्धेतल्या विजेत्यांचा गौरव फडणवीस यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.
****
व्यवहारी मराठी भाषेचा वापर
न करणाऱ्या दोन हजार ७६७ रिक्षा-टॅक्सी चालकांना परिवहन विभागानं ‘कारणे दाखवा’ नोटीस
बजावली आहे. राज्यभरात रिक्षा आणि टॅक्सीचालकांना कामकाजापुरती मराठी भाषा अवगत असणं
अनिवार्य केल्यानंतर गुरुवारपासून विभागानं विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. मुंबई
महानगर क्षेत्र वगळता राज्यभरात पाच हजार २९९ रिक्षा-टॅक्सी चालकांची भाषा तपासणी करण्यात
आली, यापैकी ७७७ चालकांना व्यवहार्य मराठी येत नसल्याचं निष्पन्न झालं असून, त्यापैकी
६६६ जणांना नोटीस बजावण्यात आली. ही तपासणी मोहीम ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
****
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री
गिरीराज सिंह यांनी काल नवी मुंबई महानगरपालिकेच्या वस्त्रपुनर्प्रक्रिया केंद्राला
भेट देऊन पाहणी केली. नवी मुंबई महानगरपालिकेने राबवलेल्या या मॉडेलमध्ये लोकसहभागावर
भर देऊन त्यातून नवी दिशा देण्याची गरज सिंह यांनी व्यक्त केली. केंद्रीय वस्त्र मंत्रालयाने
नवी मुंबई महानगरपालिकेसोबत जसा करार केला आहे, तसाच करार राज्यातल्या इतर
महानगरपालिकांसोबत करून रोजगाराच्या नव्या दिशेकडे वाटचाल करण्याची सूचना, संबंधित
समितीला करण्यात येईल, असं सिंह यांनी सांगितलं.
****
गुन्ह्यांबाबत शून्य सहनशीलता
आणि पीडितेबाबत कमाल संवेदनशीलता, हेच प्रभावी पोलीस व्यवस्थेचं सूत्र असलं पाहिजे, असं प्रतिपादन
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केलं. राष्ट्रीय महिला आयोग
आणि महाराष्ट्र पोलिसांच्या वतीनं काल छत्रपती संभाजीनगर इथं ‘शक्ती आणि सुरक्षा’ कार्यक्रमांतर्गत, सायबर गुन्ह्यांविरोधात
पोलिसांची क्षमतावृद्धी या विषयावरच्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. सायबर गुन्हे, कृत्रिम
बुद्धिमत्तेच्या माध्यमातून होणारी फसवणूक, बनावट चित्रफिती आणि डिजिटल
आर्थिक फसवणुकीसारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी पोलिसांनी तंत्रज्ञान, माहिती
आणि वैज्ञानिक पद्धतींचा प्रभावी वापर करावा असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, ‘कृत्रिम
बुद्धिमत्ता आणि महिला’ या विषयावरच्या क्षमता बांधणी कार्यशाळेलाही रहाटकर यांनी मार्गदर्शन
केलं. महिला उद्योजक तसंच बचत गटातल्या महिलांनीही एआयचा उपयोग व्यवसायवृद्धीसाठी करावा, असं आवाहनही
त्यांनी केलं.
****
लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काल पुण्यात
‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात विद्यार्थिनी आणि तरुणींशी थेट संवाद साधला. भारताच्या
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद असल्याचं सांगत, महिलांनी स्वतंत्र असावं, स्वतःच्या हिंमतीवर उभं राहावं आणि स्वतःवर विश्वास ठेवावा, असं आवाहन राहुल गांधी यांनी
केलं. भारताच्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या पगारदार महिलांना पुरुषांच्या
तुलनेत २५ टक्के कमी मोबदला मिळतो, हा महिलांचा अनादर असल्याचं ते म्हणाले. यावेळी विद्यार्थिनींनी शिक्षण व्यवस्थेतल्या
त्रुटी, पेपरफुटी, परीक्षांमधली अनियमितता, महिला सुरक्षा, वाढतं शैक्षणिक शुल्क आणि
रोजगाराच्या संधी यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला.
विद्यार्थिनींच्या प्रश्नांना गांधी यांनी उत्तरं दिली आणि शिक्षण, महिला सुरक्षा, समान संधी तसंच रोजगाराच्या
मुद्द्यांवर चर्चाही केली.
****
यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक
पुरस्कार विजेत्या शिक्षकांमध्ये लातूरचे वैभव कुलकर्णी यांचाही समावेश आहे. विज्ञान-तंत्रज्ञान
आणि कौशल्याधारित शिक्षणावर विशेष भर देणारे कुलकर्णी यांनी, या पुरस्कारासाठी
निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत, सरकारचे आभार मानले..
बाईट - वैभव कुलकर्णी
****
लातूर जिल्ह्यात औसा इथल्या
जिल्हा परिषद शाळेत विनापरवानगी प्रवेश करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कॉक्रोच
जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके आणि त्यांच्या इतर चार ते पाच सहकाऱ्यांविरुद्ध
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपके आणि त्यांच्यासोबतच्या व्यक्तींनी शाळेत प्रवेश
करून विद्यार्थ्यांमध्ये बसत विविध प्रश्न विचारल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात
तसंच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाल्याचं, शिक्षिका सय्यद शमशाद बानो
यांनी तक्रारीत म्हटलं आहे. या शाळेत दुसऱ्या शाळेतले विद्यार्थी बसवल्याचा आरोप करून
शाळेची बदनामी केली, तसंच शिक्षकांना निलंबनाची धमकी दिल्याचंही या तक्रारीत
म्हटलं आहे.
दरम्यान, कॉक्रोच
जनता पार्टीचे लातूरचे समन्वयक अजिंक्य शिंदे यांनी, शाळेतली दुरावस्था आणि कथित
गैरप्रकार समोर आणल्यामुळेच गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला आहे. शाळेच्या पाहणी दरम्यान
आवारात गांजा आणि दारू सेवनाचे प्रकार, स्वच्छतागृहाचा अभाव, बंद स्वयंपाकघर
तसंच माध्यान्ह भोजनासाठीच्या तांदूळ, भात आणि डाळींमध्ये किडे आढळल्याचा
दावा त्यांनी केला. या सर्व प्रकाराची प्रशासनाने चौकशी करून शाळेतल्या विद्यार्थ्यांना
मूलभूत सुविधा मिळवून द्याव्यात, अशी मागणी शिंदे यांनी केली.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर
तालुक्यातल्या माळुंब्रा इथं प्रस्तावित चार किलोमीटर लांबीच्या हवाई धावपट्टीच्या
जागेची भारतीय विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच पाहणी केली.
पाहणीनंतर या पथकाने विमानतळाच्या या जागेबाबत सकारात्मकता दर्शवली. त्यामुळे या प्रकल्पाच्या
दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे पडलं असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी
दिली.
****
जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद
स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीने कांस्यपदक
पटकावलं. काल उपांत्य फेरीत चीनी जोडीसोबत झालेल्या रोमांचक लढतीत, त्रिसा-गायत्री
जोडीने पहिला गेम २१-१८ फरकाने जिंकला, मात्र पुढचे दोन्ही गेम जिंकत
चिनी जोडीने अंतिम फेरीत प्रवेश केला.
****
भारत आणि श्रीलंका दरम्यान
सुरू असलेल्या दोन क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मालिकेतला दुसरा आणि अंतिम सामना आजपासून
कोलंबो इथं खेळला जाणार आहे. सकाळी दहा वाजता सामन्याला सुरुवात होईल. पहिला सामना
जिंकून भारत मालिकेत एक - शून्य नं आघाडीवर आहे.
****
जालना इथं पोलीस प्रशिक्षण
केंद्रात जलसंधारणाच्या कामांना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते काल प्रारंभ
झाला. पोलीस प्रशिक्षणार्थींच्या श्रमदानासह कुंडलिका-सीना फाऊंडेशनच्या सहभागातून
या परिसरात काल दहा जलशोषक खड्डे आणि वीस ट्रेन्च-कम-बंड्स तयार करण्यात आले. भूजल
तज्ज्ञ डॉ. पंडित वासरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
****
लातूर जिल्ह्यात पाणीटंचाईचा
सामना करण्यासाठी सज्ज राहून संबंधित विकासकामांना गती देण्याची सूचना विभागीय आयुक्त
जी. श्रीकांत केली आहे. ते काल लातूर इथं संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आयोजित
आढावा बैठकीत बोलत होते. यंदा राज्यात सर्वात कमी प्रमाणात पाऊस झाल्याच्या पार्श्वभूमीवर, सिंचन प्रकल्पांतल्या
पाणीसाठ्याचा सातत्याने आढावा घेऊन पिण्याच्या पाण्याचं काटेकोर नियोजन करण्याचं सांगून, प्रकल्पांमधून
होणारा अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी तातडीने गस्त सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
****
अवैध सावकारी विरोधात लातूर सहकार विभागाने धडक कारवाई करत शहरातल्या एका संशयित
सावकाराच्या घर आणि कार्यालयावर एकाचवेळी छापा टाकला. या कारवाईत कर्ज व्यवहाराशी संबंधित
कागदपत्रे, धनादेश, खरेदीखतांसह इतर महत्त्वाची
कागदपत्रे जप्त करण्यात आली.
दरम्यान, लातूर तालुक्यात कुठेही बेकायदेशीर
सावकारी सुरू असल्याची माहिती असल्यास नागरिकांनी ती सहकार विभागाला द्यावी, असं आवाहन सहाय्यक निबंधक
रवि गडेकर यांनी केलं आहे.
****
No comments:
Post a Comment