▼

Wednesday, 2 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.09.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 02 September 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      २०२९ पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठीचं सर्वसमावेशक धोरण मंजूर

·      राज्यातल्या सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांना व्यवसाय पद्धतीत आवश्यक बदल करण्यासाठी एक वर्षाचा संक्रमण कालावधी देण्याचा निर्णय

·      देशाचा आर्थिक वृद्धीदर कायम ठेवायचा असेल तर आत्मनिर्भरतेवर भर द्यायला हवा, पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      नीट पेपरफुटी प्रकरणी झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे

आणि

·      राज्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत सरासरीपेक्षा १३ टक्के कमी पाऊस पडल्याची हवामान विभागाची माहिती

****

२०२९ पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी तयार करण्यात आलेलं सर्वसमावेशक धोरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल मंजूर करण्यात आलं. शासनाच्या सर्व विभागांच्या सहभागातून हे धोरण राबवण्यात येणार असून, ग्राम पातळीपासून ते जिल्हा, विभाग आणि मंत्रालयीन स्तरापर्यंत जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलं आहे. यात शालेय शिक्षणात पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पाचवीपासून अंमली पदार्थाबाबत जनजागृतीबाबत किमान एक धडा समाविष्ट करण्यात येणार आहे.

शासकीय-निमशासकीय बैठका, कार्यक्रमांदरम्यान आणि उपहारगृहांमध्ये आरोग्यदायी अन्नपदार्थ ठेवण्याच्या धोरणालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. याअंतर्गत संतुलित अन्नपदार्थ ठेवणं बंधनकारक होणार आहे.

****

भूमी प्रशासनासाठी राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागानं विकसित केलेल्या महाभूमी स्टॅक प्रणालीचा प्रारंभ काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर करण्यात आला. जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारात आणि व्यवहारानंतर अनेक बाबतीत नागरिकांना महाभूलेख, महाभूनकाशा, IDRS यासारख्या विविध प्रणालींची मदत घ्यावी लागते. या सर्व विखुरलेल्या प्रणालींचं एकत्रीकरण करून दहा प्रमुख भूमी सेवा श्रेणींसाठी एकच एकात्मिक डिजिटल प्रवेशद्वार महाभूमी स्टॅकच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं आहे.

****

राज्यातल्या सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांना विद्यमान कायद्यानुसार व्यवसाय पद्धतीत आवश्यक बदल करण्यासाठी एक वर्षाचा संक्रमण कालावधी देण्यात येणार आहे. या बदलांसाठी उपाययोजना आणि मार्गदर्शन सुचवण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन तसंच व्यापारी प्रतिनिधींची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार या बदलांना सामोरं जाताना व्यावसायिकांना राज्य शासनाकडून मदत, सुविधा तसंच अनुदान अथवा सबसिडी उपलब्ध करून देण्यात येईल, असा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. काल मुंबईत सुटे खाद्यतेल व्यावसायिकांच्या बैठकीत ते बोलत होते.

****

देशाचा आर्थिक वृद्धीदर कायम ठेवायचा असेल तर आत्मनिर्भरतेवर भर द्यायला हवा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेवर अधिकाधिक भर दिला तर विकसित भारताचं स्वप्न २०४७ पर्यंत साध्य होऊ शकेल असं ते म्हणाले. परदेश दौरे आणि सोने खरेदी टाळण्याचं आवाहन पंतप्रधानांनी पुन्हा एकदा केलं. जगभर अस्थिर वातावरण असताना भारतानं सात पूर्णांक आठ दशांश टक्क्यांचा विकासदर साध्य केल्याबद्दल त्यांनी देशवासीयांचं अभिनंदन केलं.

****

देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि साठेबाजीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं साखर विक्रेत्यांची साठा मर्यादा चार हजार क्विंटलवरून दोन हजार क्विंटल केली आहे. ही नवीन मर्यादा १५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत लागू राहणार आहे. साखर प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांपेक्षा जास्त काळ साठा ठेवता येणार नाही तसंच देशभरात कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही वेळी दोन हजार क्विंटलपेक्षा जास्त साखर साठवता येणार नाही.

****

नीट पेपरफुटी प्रकरणी २० ते २५ जुलैदरम्यान झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान दाखल झालेले सर्व गुन्हे रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. अशा प्रकारचे सर्व खटले कायमसाठी बंद झाल्याचं समजावं, असं सांगत, सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भात केंद्र आणि काही राज्य सरकारांनी दाखल केलेल्या सर्व याचिका फेटाळल्या. हा आदेश संपूर्ण देशासाठी लागू असल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं.

दरम्यान, युवकांची प्रगती आणि विकास याला केंद्र सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी केलं. विद्यार्थ्यांवर दाखल गुन्हे मागे घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

जालना जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळांमधल्या वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि कंपाऊंड वॉल आदी सुविधांची सद्य:स्थितीची पाहणी करून येत्या सात सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. काल झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी जिल्हा परिषद शाळांमधल्या नवीन वर्गखोल्यांचं बांधकाम, जुन्या वर्गखोल्यांची दुरुस्ती, मुला-मुलींच्या स्वच्छतागृहांची स्थिती आणि पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचा आढावा घेतला. पुढील काही दिवसांत जिल्ह्यातल्या अंगणवाडी आणि ग्रामपंचायत इमारतींचाही आढावा घेऊन अहवाल तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

****

धाराशिव इथं केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या दोन दिवसीय चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी प्रियंवदा महड दळकर यांच्या हस्ते काल झालं. नागरिकांनी या चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून, आकांक्षित जिल्ह्यासाठी केंद्र सरकारनं राबवलेल्या विकास योजनांची माहिती घ्यावी, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं.

दरम्यान, केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय विभागाच्या पत्र सूचना कार्यालयाच्या वतीने धाराशिव इथं काल पत्रकारांसाठी वार्तालाप कार्यक्रम घेण्यात आला.

****

धाराशिव जिल्ह्यात तीन दिवस जलद ताप सर्वेक्षण, कीटक शास्त्रीय सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक कार्यवाहीची विशेष मोहीम राबवण्यास कालपासून सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात विषाणूजन्य तापाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून आल्यामुळे आरोग्य विभागानं ही मोहीम हाती घेतली आहे.

****

देशभरात कालपासून राष्ट्रीय पोषण महिन्याला सुरुवात झाली. याअंतर्गत विविध उपक्रम राबवून पोषणासंबंधी जनजागृती करण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पोषण महिन्यानिमित्त राबवण्यात येणारे विविध उपक्रम आणि योजनांविषयी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ मंगल पांचाळ यांनी दिलेली माहिती आज आपण सकाळी १० वाजून ४५ आमच्या प्रासंगिक या साप्ताहिक सदरात ऐकू शकाल.

****

यंदाचा गणेशोत्सव ‘डीजे’ मुक्त, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीनं सर्व घटकांनी समन्वय राखावा, असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहेत. काल यासंदर्भात शासकीय विभागांच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सार्वजनिक गणेश मंडळांनी मंडप उभारणीपासून विसर्जनापर्यंत सुरक्षिततेच्या सर्व निकषांचं काटेकोर पालन करावं, गणेश मंडळांकडून वाटप होणारा प्रसाद तसंच बाजारात प्रसादासाठी विक्री होत असलेल्या मिठाईची अन्न आणि औषध विभागानं विशेष तपासणी करावी, अशा सूचनाही जिल्हाधिका-यांनी यावेळी दिल्या.

****

मतदार यादी पुनरिक्षणाअंतर्गत जाहिर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत आपलं नाव आहे किंवा नाही, याची तपासणी करावी, यादीत नाव नसल्यास संबंधित बीएलओशी तातडीने संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केलं आहे. ‘पत्रकारांशी संवाद’ कार्यक्रमात ते काल बोलत होते.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल बीड जिल्ह्यात पाडळशिंगी टोलनाक्याजवळ संतप्त मराठा बांधवांनी टायर जाळून सरकारचा निषेध केला. या आंदोलनामुळे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी उद्या तीन सप्टेंबरला बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बीड जिल्ह्यात पावसाअभावी पिकं उध्वस्त होण्याची स्थिती असल्यामुळे शासनानं तातडीनं कृत्रिम पावसाचा प्रयोग करावा, अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चा या संघटनेनं केली आहे. या मागणीचं निवेदन काल जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.

लातूर जिल्हा आणि विशेषतः रेणापूर तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने काल रेणापूर इथं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं.

****

राज्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत सरासरीपेक्षा १३ टक्के कमी पाऊस पडल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यात पावसाळ्यात सरासरी प्रमाण ८२२ पूर्णांक २ दशांश मिलिमीटर पाऊस पडतो, मात्र यंदा ७१८ पूर्णांक ५ दशांश मिलीमीटर पाऊस झाला. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी, तर उत्तर महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये सरासरीइतक्या, किंवा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

****

हवामान

राज्यात पुढील दोन दिवस बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाड्यात हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

No comments:

Post a Comment