▼

Tuesday, 1 September 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.09.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 September 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ सप्टेंबर २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      मानवतेसमोर दहशतवादाचं गंभीर आव्हान-पंतप्रधानांचं २६ व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत प्रतिपादन

·      आर्थिक वृद्धीदर कायम ठेवायचा असेल तर आत्मनिर्भरतेवर भर द्यायला हवा, पंतप्रधानांचं नागरिकांना आवाहन

·      साखरेच्या घाऊक विक्रेत्यांवर मर्यादा, २ हजार क्विंटल साठा करण्याची परवानगी

·      नीट पेपरफुटी प्रकरणी झालेल्या विद्यार्थी आंदोलनासंदर्भात दाखल झालेले सर्व गुन्हे रद्द करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

आणि

·      अमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्याचं सर्वसमावेशक धोरण जाहीर

****

दहशतवाद हा संपूर्ण मानवतेसमोरचं गंभीर आव्हान असून, त्याविरोधातल्या लढ्यात केवळ कृती आणि प्रतिक्रिया पुरेशा नाहीत, तर दहशतवादाला मिळणारा निधी, भरती, कट्टरतावाद आणि सुरक्षित आश्रयस्थळं यांचं संपूर्ण जाळं उद्ध्वस्त करणं आवश्यक आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. २६ व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत ते आज किर्गिझीस्तानची राजधानी बिश्केक इथं बोलत होते. पश्चिम आशियातल्या तणावपूर्ण स्थितीचा उल्लेख करत, सर्व तणाव आणि संघर्षांचं निराकरण रणांगणावर नाही, तर संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातूनच होऊ शकतं, अशी भारताची सातत्यपूर्ण भूमिका असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. शांघाय सहकार्य संघटनेच्या चौकटीत स्थापन केली जात असलेली केंद्रं म्हणजे सुरक्षा धोके, संघटित गुन्हेगारी, माहिती सुरक्षा आणि अमली पदार्थांसारख्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठीचं सकारात्मक पाऊल आहे, असं मत पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केलं.

****

किर्गिझीस्तानमध्ये आज झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेनंतर,या संघटनेच्या सदस्य देशांच्या नेत्यांनी बिश्केक घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या केल्या. यासोबतच,पायाभूत सुविधा सुधारणं आणि सुरक्षेसंबंधीच्या आधुनिक धोक्यांचा सामना करणं, यासंदर्भातल्या व्यापक प्रस्तावांवरही या नेत्यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

****

देशाचा आर्थिक वृद्धीदर कायम ठेवायचा असेल तर आत्मनिर्भरतेवर भर द्यायला हवा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेवर अधिकाधिक भर दिला तर विकसित भारताचं स्वप्न २०४७ पर्यंत साध्य होऊ शकेल असं ते म्हणाले. परदेश दौरे आणि सोने खरेदी टाळण्याचं आवाहन पंतप्रधानांनी पुन्हा एकदा केलं. जगभर अस्थिर वातावरण असताना भारतानं ७ पूर्णांक ८ दशांश टक्क्यांचा विकासदर साध्य केल्याबद्दल त्यांनी देशवासीयांचं अभिनंदन केलं. ते म्हणाले.....

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

साखरेच्या साठ्याच्या बाबतीत केंद्र सरकारनं निर्बंध लागू केले असून, आता, साखरेच्या घाऊक विक्रेत्यांना जास्तीत जास्त २ हजार क्विंटल साखरेचा साठा करता येणार आहे. पुरेशा प्रमाणात साखर उपलब्ध व्हावी, साठेबाजी होऊ नये आणि किंमती मर्यादित राहाव्यात, यासाठी केंद्रसरकारनं आज ही घोषणा केली. १५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ही नवी मर्यादा लागू असेल. सध्या साखरेच्या साठ्याची ही मर्यादा ४ हजार क्विंटल आहे. गेल्या काही दिवसात केलेल्या विविध उपाययोजनांमुळं साखर कारखान्यांमधल्या साखरेची किंमत २० टक्क्यांनी कमी झाल्याचं सरकारनं म्हटलं आहे.

****

नीट पेपरफुटी प्रकरणी २० ते २५ जुलैदरम्यान झालेल्या विद्यार्थी आंदोलनासंदर्भात दाखल झालेले सर्व गुन्हे रद्द करण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयानं दिले. अशा प्रकारचे सर्व खटले कायमसाठी बंद झाल्याचं समजावं, असं सांगत, सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भात केंद्र आणि काही राज्य सरकारांनी दाखल केलेल्या सर्व याचिका फेटाळल्या. आजचा हा आदेश संपूर्ण देशासाठी लागू असल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं.

दरम्यान, युवकांची प्रगती आणि विकास याला केंद्र सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी केलं आहे. विद्यार्थ्यांवर दाखल गुन्हे मागं घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

देशात २०२६-२७ या करनिर्धारण वर्षासाठी प्राप्तीकर विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली असल्याची माहिती प्राप्तीकर विभागानं दिली आहे. ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत ७ कोटी ८० लाखापेक्षा जास्त विवरणपत्रं दाखल झाली आहेत. मागच्या असेसमेंट वर्षाच्या १६ सप्टेंबर २०२५ या अखेरच्या मुदतीपर्यंत ७ कोटी ३० लाखापेक्षा जास्त विवरणपत्रं दाखल झाली होती अशी माहितीही विभागानं दिली आहे. 

****

ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवाकराच्या एकूण संकलनात १४ पूर्णांक ८ दशांश टक्क्याची वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयानं दिली आहे. एकूण महसूल सुमारे २ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. देशांतर्गत व्यवहारांमधून मिळणारा वस्तू आणि सेवा कर महसूल ९ पूर्णांक ३ दशांश टक्क्यांनी वाढून १ लाख ३७ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला असल्याचं, तर आयातीमधून मिळणारा महसूल २९ टक्क्यांनं वाढून ६२ हजार ६०४ कोटी रुपये झाला असल्याचं मंत्रालयानं कळवलं आहे.

****

वर्ष २०२९ पर्यंत राज्यातून अमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठीचं, राज्यशासनाचं सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोन धोरण आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आलं. केंद्र शासनाच्या नशामुक्त धोरणाला गती देण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्याला सन २०२९ पर्यंत पूर्णपणे अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी हे धोरण तयार करण्यात आलं आहे. याअंतर्गत राज्यातली अवैध अंमली पदार्थाच्या निर्मितीला कारणीभूत असणारी पिकांची शेती, लागवड, नैसर्गिक आणि सिंथेटिक अंमली पदार्थांचं उत्पादन - वाहतूक, विक्री आणि सेवनावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

शासकीय-निमशासकीय बैठका आणि कार्यक्रमांच्या दरम्यान तसंच उपहारगृहांमध्ये आरोग्यदायी अन्नपदार्थ ठेवण्याच्या धोरणाला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यामध्ये संतुलित मेन्यू ठेवणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

पुणे जिल्ह्यातल्या कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी पाच हजार सातशे चार कोटी पन्नास लाख रुपयांच्या सुधारित खर्चाला आज मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.

****

राज्यात येत्या १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत महसूल पंधरवडा साजरा करण्यात येणार असून, या कालावधीत वनहक्क पट्टे मिळालेल्या आदिवासी बांधवांना त्यांच्या जमिनीचे ७/१२ आणि ८-अ उतारे उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. जमिनीच्या हक्काची नोंद अधिकृत अभिलेखात झाल्यानंतर संबंधित आदिवासी शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणं शक्य होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या बीड शाखेतर्फे आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. कर्तव्य बजावताना कर्मचाऱ्यांना सुरक्षितता मिळावी, गावांमधल्या ग्रामसभांची संख्या कमी करावी, तसंच सेवाविषयक प्रलंबित प्रश्न आणि न्याय्य हक्कांची पूर्तता करावी यासह अन्य मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.

****

धाराशीव इथं आज, केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या दोन दिवसीय चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महडळकर यांच्या हस्ते झालं. नागरिकांनी या चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून, आकांक्षित जिल्ह्यासाठी केंद्र सरकारनं राबवलेल्या विकास योजनांची माहिती घ्यावी, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं. धाराशिव जिल्हा प्रशासनाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या ‘हरित धाराशिव’ या उपक्रमावर आधारित विशेष छायाचित्र प्रदर्शनही यामध्ये असून, मोफत रोपटी वाटपासाठी स्वतंत्र स्टॉल उभारण्यात आला आहे.

****

धाराशीव जिल्ह्यामध्ये आजपासून तीन दिवस जलद ताप सर्वेक्षण, कीटक शास्त्रीय सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक कार्यवाहीची विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. मागच्या काही दिवसांपासून जिल्ह्यात विषाणूजन्य तापाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून आल्यामुळे आरोग्य विभागानं ही मोहीम हाती घेतली आहे.

****

हवामान

राज्यात पुढील दोन दिवस बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाड्यात हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना उद्या, बुधवारी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

No comments:

Post a Comment