▼

Thursday, 3 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 03.09.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 03 September 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तीन महत्वपूर्ण उपक्रमांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

·      डिसेंबरअखेर बीड-मुंबई रेल्वे सुरू करण्यासाठी युद्ध पातळीवर कामं पूर्ण करण्याची सूचना

·      मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणातून एकही पात्र मतदार वगळला जाणार नसल्याचं राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण

·      मराठा आरक्षणासंदर्भात सरकारचं शिष्टमंडळ आज आंतरवाली सराटी इथं शासन निर्णय घेऊन जाणार

आणि

·      डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातले दोन प्राचार्य आणि दोन प्राध्यपकांना राज्य शासनाचा आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर

****

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालयांच्या स्टार रेटिंग प्रणाली या तीन महत्वपूर्ण उपक्रमांचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल शुभारंभ करण्यात आला. राज्यातल्या आरोग्यविषयक माहितीचं फक्त संकलन न करता तिचा लोकहितासाठी उपयोग व्हावा, तसंच या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी विभागाने कार्यरत राहण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध कार्यक्रमांसाठी सध्या ४० हून अधिक स्वतंत्र पोर्टल कार्यरत आहेत. या पोर्टलवरील महत्वाची माहिती एकत्र करुन एकाच व्यासपीठावर उपलब्ध करण्यासाठी एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड विकसित करण्यात आला आहे. तसंच एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्राच्या माध्यमातून १०४ कॉल सेंटरचं सुसूत्रीकरण करण्यात आलं आहे.

****

'बीड-पुणे' रेल्वे येत्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर धावणार असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक आणि सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण करण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. 'अहिल्यानगर-बीड-परळी' रेल्वेमार्गाच्या प्रगतीचा आढावा तसंच 'बीड-पुणे' आणि 'बीड-मुंबई' रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. डिसेंबरअखेर बीड-मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. 'बीड-पुणे' आणि नियोजित 'बीड-मुंबई' ही फक्त रेल्वे सेवा नसून बीडच्या विकासाला जोडणारी नवी जीवनवाहिनी ठरणार आहे असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

****

काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड आणि नियुक्तीसाठी नाशिकमध्ये घेण्यात आलेल्या १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचा काल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली समारोप झाला. गांधी यांनी काँग्रेस जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षांच्या कुटुंबियांशी संवाद तसंच जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षांशी संवाद साधला. संघटन विस्तार आणि काँग्रेसचा विचार सर्वदूर पोहचवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

राज्यातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणातून एकही पात्र मतदार वगळला जाणार नसल्याचं, मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केलं आहे. हरकती - सूचनांच्या सुनावणीसाठी संबंधितांना नोटीस बजावण्यासोबतच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सुनावणीला उपस्थित राहण्याचं आवाहन करावं, तसंच संबंधित व्यक्तीकडून प्रतिसाद मिळाला नाही, तर आदेशाची प्रत त्यांच्या व्हॉट्स्ॲप क्रमांकावर पाठवावी. संबंधित व्यक्तीला सुनावणीला उपस्थित राहण्यात अडचण असल्यास त्यांच्या नातेवाईकांना सुनावणीला उपस्थित राहून नागरिकत्वाचा पुरावा सादर करण्याची मुभा द्यावी, असे निर्देश चोक्कलिंगम यांनी दिले.

****

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी झाली. शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ नीरज किशन कौल यांनी पक्षाच्या संघटनात्मक इतिहासाची आणि पक्षघटनेतल्या बदलांची सविस्तर पार्श्वभूमी न्यायालयासमोर मांडली. १९९७ पासून निवडणूक आयोगाने शिवसेनेमध्ये अंतर्गत लोकशाही आणि संघटनात्मक निवडणुकांबाबत घेतलेली भूमिका तसंच १९९९ आणि २०१८ च्या पक्षघटनेतले मूलभूत फरक कौल यांनी निदर्शनास आणून दिले. २०१८ मधल्या बदलांमुळे पक्ष प्रमुखांकडे मोठ्या प्रमाणावर अधिकार केंद्रीत झाल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. यासंदर्भात पुढीची सुनावणी येत्या १५ सप्टेंबरला होणार आहे.

****

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह राजे भोसले यांच्या पीठासमोर काल या प्रकरणाची सुनावणी झाली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी केलेल्या तपासावर प्रश्नचिन्हं उपस्थित होत असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. मात्र, तपासादरम्यान, सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही, असंही स्पष्ट केलं.

****

मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी निर्णायक उपोषणाला बसलेल्या मनोज जारांगे पाटील यांची काल भाजप आमदार प्रसाद लाड यांनी भेट घेतली. जरांगे यांनी केलेल्या मागण्यांचा मसुदा बनवून त्यांनी वाचून दाखवला आणि त्यावर तातडीने अंमलबजावणी करण्याचं सांगितल्यावर, जरांगे यांनी लाड यांच्या हस्ते पाणी पिलं, मात्र उपोषण अद्याप सुरुच राहणार असल्याचं सांगितलं. पूर्ण मसुदा आणि जात प्रमाणपत्र वाटपाची अंमलबजावणी करण्याची सुरुवात झाल्यावर ते उपोषण सोडणार आहेत. आज सरकारचं शिष्टमंडळ आंतरवाली सराटी मध्ये जरांगे यांनी केलेल्या मागण्यांचा शासन निर्णय घेऊन जाणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

**

दरम्यान, जरांगे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने बीड-परळी राष्ट्रीय महामार्गावर जरूर फाटा इथं रास्ता रोको आंदोलन केलं.

लातूर इथंही उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि जात वैधता प्रमाणपत्राच्या विविध मागण्यांसाठी चार जणांनी सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीवर चढून आंदोलन केलं. आज लातूर जिल्हा पूर्णपणे बंद ठेवण्याचं आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आलं आहे.

****

राज्यातल्या शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार ‘चला शाळेत जाऊया’ हे अभियान सुरू करणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हा दत्तक देऊन त्यांना तिथल्या शाळांची पाहणी करण्याची जबाबदारी दिली असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभांतर्गत येत्या २९ सप्टेंबर रोजी राज्यभरात एक हजार ठिकाणी रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात येणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. 'महाराष्ट्राची कौशल्यशक्ती आता जगभर' या कार्यक्रमांतर्गत इस्रायलमध्ये रोजगारासाठी जाणारे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांशी ते काल बोलत होते. राज्यातल्या ६० बांधकाम कामगारांची पहिली तुकडी आज इस्त्रायलला रवाना होत आहे. या युवकांनी कठोर परिश्रम करून आपल्या कुटुंबासह महाराष्ट्राचा आणि देशाचा नावलौकिक वाढवावा असं आवाहन लोढा यांनी केलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पर्यटन क्षेत्राला नव्याने चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास, स्वच्छता, पर्यटनस्थळांची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी तसंच शाश्वत पर्यटन व्यवस्थापन यावर भर देणं आवश्यक असल्याचं, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी म्हटलं आहे. पर्यटन विभागाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. यासाठी प्रशासन, पर्यटन क्षेत्राशी संबंधित विविध भागधारक आणि संबंधित सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे तसंच समन्वयाने काम करण्याचं आवाहन गौडा यांनी केलं.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातले दोन प्राचार्य आणि दोन प्राध्यपकांना राज्य शासनाचा डॉ.जे.पी.नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांसाठी प्राणीशास्त्र विभागातले प्राध्यापक डॉ.गुलाब खेडकर यांची, तर प्राचार्य संवर्गातून कन्नडच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय भोसले यांची निवड झाली आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांसाठी संगणकशास्त्र विभागातले वरिष्ठ प्राध्यापक डॉ. भारती गवळी यांची तर प्राचार्य संवर्गातून परतूरच्या लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत खंदारे यांना पुरस्कार दिले जाणार आहेत. येत्या शनिवारी शिक्षक दिनी पुण्यात समारंभपूर्वक हे पुरस्कार प्रदान केले जातील.

****

लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहर आणि तालुक्यातल्या अवैध सावकारीविरोधात सहकार विभागाने काल पाच ठिकाणी धाडी टाकून झडती घेतली. या कारवाईत आर्थिक व्यवहारांशी संबंधित दस्तऐवज, कागदपत्रे, रोकड, खाती, कोरे धनादेश, कोरे स्टॅम्प, स्थावर मालमत्तेचे खरेदीखत तसंच इसारचिठ्ठ्या आढळून आल्या. याप्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.

****

धाराशिव शहरात प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाच्या पथकाने कारवाई करत अंदाजे दहा किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. या कारवाईत दहा दुकानं तसंच छोट्या हातगाडीवाल्यांना एकूण १५ हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आला.

****

हवमान

हवामान विभागाने आज मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी केला असून, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

****

No comments:

Post a Comment