Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 04
September 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ सप्टेंबर २०२६ दुपारी १.०० वा.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोने EOS-05 या भू-समकालिक कक्षेतल्या पहिल्या छायाचित्रण उपग्रहाचं
यशस्वी प्रक्षेपण केलं. श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून GSLV प्रक्षेपकाद्वारे हे प्रक्षेपण करण्यात आलं. प्रक्षेपणानंतर
सुमारे १८ मिनिटांनी हा उपग्रह निर्धारित कक्षेत यशस्वीरीत्या स्थापित करण्यात आला.
या उपग्रहाद्वारे तात्काळ उपलब्ध होणाऱ्या प्रतिमांमुळे कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन
क्षेत्रांत देशाला मोठी मदत होईल, असं इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी सांगितलं.
या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण हा देशासाठी अभिमानाचा
क्षण असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचं अभिनंदन केलं आहे. तंत्रज्ञानातील
उत्कृष्टता, नवोन्मेष आणि वाढती क्षमता यासोबतच
इस्रो आणि भारतीय उद्योग क्षेत्रातलं वाढतं सहकार्य भारताच्या संपूर्ण अवकाश परिसंस्थेला
नवी ताकद आणि व्यापकता देत असल्याचं ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनीही या मोहिमेच्या
यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोचं अभिनंदन केलं आहे. भूस्थिर कक्षेतून कार्यरत होणारा
EOS-05 हा भारताचा पहिला इमेजिंग उपग्रह
असून, या मोहिमेमुळे भारताच्या प्रगत पृथ्वी
निरीक्षण आणि अवकाश तंत्रज्ञान क्षमतेला मोठी चालना मिळणार असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या
संदेशात म्हटलं आहे.
****
भारताच्या आर्थिक विकासात नॉन बँकिंग वित्तीय कंपन्या
- NBFC आणि हाऊसिंग फायनान्स कंपनी - HFC क्षेत्राची भूमिका आगामी काळात अधिक महत्त्वाची ठरणार
आहे. मात्र, वाढीसोबत सुशासन, जोखीम व्यवस्थापन आणि ग्राहक संरक्षणाला प्राधान्य देणं
आवश्यक असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस. सी. मुर्मू यांनी सांगितलं.
मुंबईत आयोजित सातव्या NBFC आणि HFC परिषदेत ते बोलत होते. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्रातली वाढती पत गरज लक्षात घेता, डेटा-आधारित पतमूल्यांकन आणि डिजिटल पायाभूत सुविधांच्या
माध्यमातून कर्जपुरवठा वाढवण्याची मोठी संधी असल्याचं त्यांनी नमूद केलं. शाश्वत वाढीसाठी
तरलता व्यवस्थापन, मालमत्ता गुणवत्ता, पतजोखीम, ग्राहक संरक्षण आणि सायबर सुरक्षिततेवर विशेष लक्ष देण्याचं
आवाहन त्यांनी केलं. वाढीच्या शर्यतीत कर्जमानकांशी कोणतीही तडजोड करू नये, असा स्पष्ट संदेशही डेप्युटी गव्हर्नर एस. सी. मुर्मू
यांनी दिला.
****
कृष्णजन्माष्टमीचा सण आज देशभरात उत्साहात साजरा केला
जात आहे. गोकुळ, मथुरा आणि जगन्नाथ पुरीसह देशाच्या
विविध भागांत पारंपरिक पद्धतीनं जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जात आहे. मंदिरांमध्ये
रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव होणार असून, जगभरातल्या इस्कॉन मंदिरांमध्येही विविध धार्मिक कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे.
राज्यातही सर्व कृष्ण मंदिरांमध्ये मध्यरात्री साजरा होणाऱ्या
कृष्ण जन्मोत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सर्व मंदिरांना आकर्षक सजावट करण्यात
आली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना जन्माष्टमीच्या
शुभेच्छा दिल्या. भगवान श्रीकृष्णांचे जीवन आणि त्यांचे विचार भारतीय संस्कृती आणि
तत्त्वज्ञानाला चैतन्य देतात. सत्य, धर्म, न्याय, करुणा आणि निस्वार्थ कर्माचा मार्ग त्यांनी मानवजातीला दाखवला.
या पवित्र पर्वानिमित्त भगवान श्रीकृष्णांच्या आदर्शांचा अंगीकार करण्याचा आणि समावेशक
आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी सातत्याने कार्य करण्याचा संकल्प करूया, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन्माष्टमीच्या शुभेच्छा
देताना, भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य संदेशांमध्ये
निस्वार्थ कर्माची प्रेरणा आहे, जी मानवतेला सातत्याने मार्गदर्शन करत असल्याचं सांगितलं. या
पवित्र पर्वामुळे प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा, सामर्थ्य आणि नवी प्रेरणा निर्माण होवो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
****
नेपाळमधल्या पूरग्रस्त भागातल्या मृतांची संख्या एक हजार
२८२ वर पोहोचली असून, पाच हजार ५३ जण अजूनही
बेपत्ता असल्याचं नेपाळ पोलिसांनी सांगितलं. मृतांची ओळख पटवण्यासाठी नेपाळने डीएनए
चाचण्यांचा वापरही सुरू केला आहे. नेपाळच्या ‘त्रिशुली ३ए जलविद्युत प्रकल्पा’तील बोगद्यात अडकलेल्या दोन व्यक्तींना १० दिवसांनंतर
जिवंत बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले असून आतापर्यंत बारा हजारांहून अधिक लोकांची
सुटका केली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सण, उत्सव तसंच विविध समारंभप्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉलच्या तपासणीसाठी लातूर जिल्ह्यात पथकं गठीत करण्यात
आली आहेत. ही पथकं लातूर तालुक्यातल्या ध्वनी प्रदुषण विषयक नियमांची प्रभावी अंमलबजावणी
करण्यासाठी मंडप, पेंडॉल तपासणी करणार
असल्याची माहिती लातूरच्या उपविभागीय दंडाधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी दिली.
****
No comments:
Post a Comment