▼

Friday, 4 September 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.09.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 04 September 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ सप्टेंबर २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरोने EOS-05 या भू-समकालिक कक्षेतल्या पहिल्या छायाचित्रण उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून GSLV प्रक्षेपकाद्वारे हे प्रक्षेपण करण्यात आलं. प्रक्षेपणानंतर सुमारे १८ मिनिटांनी हा उपग्रह निर्धारित कक्षेत यशस्वीरीत्या स्थापित करण्यात आला. या उपग्रहाद्वारे तात्काळ उपलब्ध होणाऱ्या प्रतिमांमुळे कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रांत देशाला मोठी मदत होईल, असं इसरोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी सांगितलं.

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी या मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इसरोचं अभिनंदन केलं आहे. भूस्थिर कक्षेतून कार्यरत होणारा EOS-05 हा भारताचा पहिला इमेजिंग उपग्रह असून, या मोहिमेमुळे भारताच्या प्रगत पृथ्वी निरीक्षण आणि अवकाश तंत्रज्ञान क्षमतेला मोठी चालना मिळणार असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

कृष्णजन्माष्टमीचा सण आज देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. गोकुळ, मथुरा आणि जगन्नाथ पुरीसह देशाच्या विविध भागांत पारंपरिक पद्धतीनं जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जात आहे. मंदिरांमध्ये रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव होणार असून, जगभरातल्या इस्कॉन मंदिरांमध्येही विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातही सर्व कृष्ण मंदिरांमध्ये मध्यरात्री साजऱ्या होणाऱ्या कृष्ण जन्मोत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहे. भगवान श्रीकृष्णांचे जीवन आणि त्यांचे विचार भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानाला चैतन्य देतात. सत्य, धर्म, न्याय, करुणा आणि निस्वार्थ कर्माचा मार्ग त्यांनी मानवजातीला दाखवला. या पवित्र पर्वानिमित्त भगवान श्रीकृष्णांच्या आदर्शांचा अंगीकार करण्याचा आणि समावेशक आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी सातत्याने कार्य करण्याचा संकल्प करूया, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन्माष्टमीच्या शुभेच्छा देताना, भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य संदेशांमध्ये निस्वार्थ कर्माची प्रेरणा आहे, जी मानवतेला सातत्याने मार्गदर्शन करत असल्याचं सांगितलं. या पवित्र पर्वामुळे प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा, सामर्थ्य आणि नवी प्रेरणा निर्माण होवो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या आहेत.

****

स्वाध्याय परिवारातले युवक श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव पथनाट्यातून साजरा करतात. यंदा देशभरातल्या १५ राज्यांत तसंच १५ पेक्षा जास्त देशांत मिळून युवकांची जवळपास १७ हजार पथकं 'हमने है माखन पाया' या पथनाट्यातून जनजागृती करत आहेत. विविध भाषांमधून ही पथनाट्ये सहा सप्टेंबर पर्यंत सादर करण्यात येणार आहेत.

****

गणेशोत्सवातला उत्साह कायम ठेवत ध्वनी मर्यादेचं काटेकोर पालन करणं आवश्यक आहे, अशी अपेक्षा पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केली. विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी काल संवाद साधला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना सामाजिक आणि कायदेशीर मर्यादा पाळणं आवश्यक असून, कोणत्याही परिस्थितीत ध्वनीमर्यादेचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता मंडळांनी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं. लेसर लाईटवर पूर्णपणे बंदी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ध्वनी प्रदूषणाविरोधात भूमिका घेणारे विद्यानंद बापट यांच्यावरच्या हल्ल्याचा कुमार यांनी निषेध केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बापट यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. आपला गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत असं आवाहन त्यांनी केलं.

दरम्यान, नागपूर पोलिसांनी सणासुदीच्या काळात मोठ्या आवाजाच्या ध्वनियंत्रणा, बीम्स आणि लेजर लाइट्सवर बंदी घातली आहे. आजपासून एक नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ही बंदी लागू राहील.

सोलापुरातही गणेशोत्सव मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईटला बंदी घालण्यात आली आहे. १३ ते २६ सप्टेंबर या कालवधीत ही बंदी लागू असेल.

****

मुंबईच्या सर्वांगीण पुनर्विकासासाठी क्लस्टर पद्धतीने नियोजन करण्यात आलं असून, पुढील दहा वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबईत आयोजित ‘नरेडको’ महाराष्ट्राच्या ‘चेंज ऑफ गार्ड’ कार्यक्रमात ते काल बोलत होते. धारावी पुनर्विकास, म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास आणि बेस्टच्या आगारांचा आधुनिक पद्धतीने विकास यामुळे मुंबईचा चेहरामोहरा बदलणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. धारावी पुनर्विकासाला सुरुवात झाली असून, जानेवारी २०२९ पर्यंत धारावीमध्ये १० हजार पुनर्वसन सदनिका तयार करण्याचं उद्दिष्ट असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा बीड जिल्हास्तरीय दोन दिवसीय युवक महोत्सव आजपासून सिरसाळा इथं सुरु होत आहे. महोत्सवात ७२ महाविद्यालांचे ५६६ कलावंत सहभागी होणार आहेत.

****

 

 

No comments:

Post a Comment