Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 06
September 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ सप्टेंबर २०२६ दुपारी १.०० वा.
****
ब्रिक्स देशांचं १८वं दोन दिवसीय शिखर संमेलन, भारताच्या अध्यक्षतेत दिल्लीत होणार आहे. येत्या १२ आणि
१३ सप्टेंबर या काळात भारत मंडपम् इथं आयोजित या संमेलनात, सहभागी ब्रिक्स देशांमध्ये नवोन्मेष- लवचिकता - सहकार्य आणि
स्थैर्य यांसाठी निमिर्ती हा आशय केंद्रस्थानी असणार आहे. या अनुषंगानं याच काळात आयोजित
होणार असलेल्या आय -ब्रीक्स या विशेष उपक्रंआतर्गत; ब्रिक्समधील संबंधीत २१ देशांच्या आर्थिक संप्रभुता व्यवहारांशी
निगडीत विश्वासार्ह पायाभूत आराखडा, ऊर्जा आणि डिजिटल कार्यक्षमता यांच्या परस्पर समन्वयाच्या उद्देशानं
पाचशेहून अधिक उद्योगपती, अर्थमंत्री-गुंतवणूकदार सहभागी होणार आहेत.
****
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायिक मंडळानं केलेल्या शिफारशींनुसार
देशातील आठ उच्च न्यायालयांमध्ये नव्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्रीय कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी समाज माध्यमाद्वारे ही माहिती दिली.
या नियुक्तींनुसार, मुंबई उच्च न्यायालयाचे
न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी
नियुक्ती झाली तर, दिल्ली उच्च न्यायालयाचे
न्यायमूर्ती वल्लुरी कामेश्वर राव यांची पाटणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी
नियुक्ती करण्यात आली तसंच न्यायमूर्ती कृष्ण राम महापात्रा यांची छत्तीसगड, न्यायमूर्ती संजय कुमार अग्रवाल यांची राजस्थान, न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांची मुंबई, तर न्यायमूर्ती अश्वनी कुमार मिश्रा यांची पंजाब आणि हरियाणा
उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय न्यायमूर्ती
अल्पेश यशवंत कोगजे हे मध्य प्रदेश, तर न्यायमूर्ती पुष्पेंद्र सिंह भाटी हे जम्मू-काश्मीर आणि लडाख
उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश असतील.
****
मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात विषारी मद्य प्यायल्यानं
नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, बाराहून अधिक जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा
तपास सुरू करण्यात आला असून, संबंधित प्रशासनानं या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
****
आंतरराष्ट्रीय गिधाड जागरूकता दिनानिमित्त हरियाणातील
पंचकुला इथं ‘संकटातून पुनरुज्जीवनाकडे - भारतातील गिधाडांचं संवर्धन’ या विषयावर राष्ट्रीय
कार्यशाळा पार पडली. यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली
झालेल्या या कार्यशाळेत आंतरराष्ट्रीय गिधाड जागरुकता दिन साजरा करण्यात आला. गिधाडांच्या
संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अधिक बळ देणं आणि त्यांच्या संरक्षणासाठी प्रभावी
उपाययोजनांवर चर्चा करणं, हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.
****
मुंबईतील गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा व्हावा, यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं मेट्रो लाईन-तीन
अर्थात ॲक्वा लाईनची सेवा १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ दरम्यान मध्यरात्री १२ वाजेपर्यंत
सुरू ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सध्या कफ परेड आणि आरे जेव्हीएलआर या
दोन्ही टर्मिनल स्थानकांवरून शेवटची मेट्रो रात्री साडेदहा वाजता सुटते. गणेशोत्सवाच्या
काळात आता या शेवटच्या फेऱ्यांची वेळ वाढवून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत करण्यात आली
आहे. त्यामुळे गणरायाच्या दर्शनासाठी, विविध गणेश मंडळांना भेट देण्यासाठी बाहेर पडलेल्या भाविकांना
घाई न करता उत्सवाचा आनंद घेता येणार आहे तसंच रात्री सुरक्षितपणे आणि सोयीस्करपणे
घरी परतताही येणार आहे.
****
मराठवाड्याच्या विकासाच्या मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब
ठाकरे पक्षातर्फे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आजपासून जनआंदोलन सुरु करण्यात
आलं आहे. आगामी १७ सप्टेंबर रोजी असलेल्या हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर
हे आंदोलन होत आहे. त्यानुसार, छत्रपती संभाजीनगर इथं आज सकाळी कॅम्ब्रिज चौक ते नगर नाका प्रस्तावित
उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पक्षातर्फे गाजराचा हार
घालून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं तसंच, नारळ फोडून आणि तत्कालीन संबंधित कार्यक्रमाच्या अनावरण पत्रिकेला
गाजराचा हार घालून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी विधान परिषद माजी विरोधी पक्षनेते
आमदार अंबादास दानवे यांनी युती सरकारवर टीका केली.
****
दरम्यान, या अनुषंगानं येत्या १७ सप्टेंबर रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर इथं सरकारविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याची
माहिती आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव इथं आयोजित पत्रकार परिषदेत दिली. धाराशिव
इथं परवा आठ सप्टेंबरला पक्षातर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचंही
ते म्हणाले. मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणं, कृष्णा - मराठवाडा जलसिंचन प्रकल्प, धाराशिवचा विकास आणि स्वतंत्र विद्यापीठ आदी मुद्दे यावेळी पाटील
यांनी उपस्थित केले.
****
'चायना मास्टर्स' बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतीम फेरीचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार, आज दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होत आहे. या
अंतीम सामन्यात भारताच्या सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांची लढत चीनच्या
हे जितिंग आणि रेन शियांगयू या जोडीशी होणार आहे.
****
हवामान - येत्या दोन दिवसांत कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा
पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त
केली आहे.
****
No comments:
Post a Comment