Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 September 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ सप्टेंबर २०२६
सायंकाळी ६.१०
****
· भारताला २०२९ पर्यंत अंमली पदार्थमुक्त करण्याचा गृहमंत्री अमित
शहा यांचा निर्धार
· एमपीएससीच्या संपूर्ण परिक्षा प्रक्रियेत सुधारणा तातडीने लागू
केल्या जातील - मुख्यमंत्र्यांची ग्वाही
· राज्यातल्या सर्व शाळांमध्ये ‘स्कूल बॅग पॉलिसी-२०२०’ची प्रभावी
अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आणि
· भारताच्या सात्विक- चिराग जोडीने पटकावलं चायना मास्टर्स बॅडमिंटन
स्पर्धेचं विजेतेपद
****
भारताला २०२९ पर्यंत अंमली पदार्थमुक्त करण्याचा निर्धार केंद्रीय
गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. ते आज गोव्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. भारताला
अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी त्यांनी तीन वर्षांचा आराखडा जाहीर केला. गुप्त माहिती
आणि कार्यवाही,
अंमली पदार्थ आणि कृत्रिम औषधांच्या निर्मितीमध्ये वापरल्या
जाणाऱ्या रसायनांवर नियंत्रण, अंमली पदार्थांची मागणी आणि
त्यामुळे होणारं नुकसान कमी करणं, आणि क्षमता बांधणी तसंच समन्वय, या चार प्रमुख स्तंभांवर हा आराखडा आधारित असल्याचं त्यांनी सांगितलं. ही मोहीम
५० कोटी लोकांपर्यंत पोहोचेल आणि एक लाख ‘अंमली पदार्थमुक्त मित्र’ निर्माण करेल, तसंच देशातल्या व्यसनमुक्ती केंद्रांची संख्याही
एक हजार ७५१ पर्यंत वाढवली जाईल, असंही शहा यांनी सांगितलं.
२०१९ पासून सरकारने अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालणं, गुप्त माहितीची देवाणघेवाण करणं, आर्थिक गुन्ह्यांचा तपास
करणं आणि लोकांचं पुनर्वसन करणं यासाठीच्या उपाययोजना अधिक मजबूत केल्या असल्याचं त्यांनी
सांगितलं. २०१९ पासून सरकारने अंमली पदार्थांचा प्रश्न राष्ट्रीय सुरक्षेचा प्राधान्यक्रम
मानला असल्याचं सांगताना ते म्हणाले –
बाईट - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात
आली असून,
कारवाईसाठी ४६ देशांसोबत करार करण्यात आल्याची माहिती शहा यांनी
दिली. २०१४ ते २०२६ या काळात ४८ लाख ६८ हजार किलो अंमली पदार्थ नष्ट करण्यात आल्याचंही
त्यांनी सांगितलं.
****
भविष्यात पेपरफुटीच्या घटना घडू नयेत, यासाठी एमपीएससी परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका निर्मितीपासून संपूर्ण परीक्षा प्रक्रियेपर्यंत
आवश्यक त्या सुधारणा तातडीने लागू केल्या जातील, अशी
ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या
शिष्टमंडळाने आज मुंबईत फडणवीस यांची भेट घेऊन एमपीएससी परीक्षा पद्धतीसंदर्भातल्या
विविध मागण्या मांडल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी परीक्षाव्यवस्था अधिक पारदर्शक आणि
सक्षम करण्यासाठी शासनाच्या प्रयत्नांची माहिती दिली. औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका
फुटीच्या प्रकरणाचीही गंभीर दखल घेण्यात आली असून, पोलिसांकडून
तपास सुरू आहे. या गैरप्रकारात आयोगातल्या किंवा आयोगाबाहेरच्या कोणाचाही सहभाग आढळल्यास
कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी
दिला. विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये आणि परीक्षाव्यवस्थेवर त्यांचा विश्वास कायम
राहावा,
यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
****
राज्यातल्या सर्व शाळांमध्ये ‘स्कूल बॅग पॉलिसी-२०२०’ची प्रभावी
अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन त्यांच्या
शारीरिक वजनाच्या १० टक्क्यापेक्षा जास्त नसावं, अशा
सूचना शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिल्या आहेत. इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी
वर्षभरात १० दिवसांचा दप्तरविरहित कालावधी आयोजित करून कृतीप्रधान उपक्रम राबवण्याचे
निर्देशही देण्यात आले आहेत.
****
राज्यातलं मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्प ही गिधाडांचं यशस्वीपणे
पुनर्वसन करणारी देशातली अव्वल वनक्षेत्र ठरली आहेत. डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६
दरम्यान दोन्ही अभयारण्यांमध्ये सोडण्यात आलेल्या २९ गिधाडांमध्ये ७८ टक्क्यांपर्यंत
जगण्याचा दर नोंदवला गेल्याची माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं दिली आहे. यामुळे
गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना बळ मिळणार असून, निसर्ग साखळीत महत्वाचा घटक असलेल्या या पक्षाचं भविष्य सुरक्षित होईल अशी आशा
व्यक्त होत आहे.
****
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने केलेल्या शिफारशीनुसार
देशातल्या आठ उच्च न्यायालयांमध्ये मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यानुसार,
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र
त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून, तर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची
कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
****
नेपाळमधल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा एक हजार ३४४
वर पोहोचला आहे,
तर सुमारे पाच हजार लोक अद्याप बेपत्ता आहेत. यामध्ये ५९० परदेशी
नागरिकांचा समावेश आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत १३ हजारापेक्षा जास्त लोकांना वाचवलं
आहे. मृत व्यक्तींची ओळख पटवण्यात अडचणी येत असून, यासाठी
डीएनए चाचणीचा वापर केला जात आहे. पूरग्रस्त भागात बचावकार्य, मदत साहित्याचं वितरण, मृतदेहांची हाताळणी आणि रस्ते
मोकळे करण्याच्या कामासाठी विविध संस्थांचे सुमारे आठ हजार कर्मचारी तैनात करण्यात
आले आहेत.
****
राज्यात जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात एसटीच्या उत्पन्नात
तब्बल ६६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. उत्पन्नवाढीसाठी राबवलेल्या उपाययोजनांची प्रभावी
अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे एसटीच्या तोट्याचं प्रमाणही कमी होऊ लागलं आहे. परिवहन
मंत्री प्रताप सरनाईक यांनी आगामी दोन ते तीन महिन्यांत एसटीचा चालू तोटा भरून काढण्याच्या
दिशेनं महामंडळाची वाटचाल सुरू असल्याचा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट रोजी एसटीला आतापर्यंतचं सर्वाधिक दैनंदिन
उत्पन्न मिळालं. एका दिवसात तब्बल ४५ कोटी रुपयांची तिकीट विक्री झाली. एसटीच्या इतिहासात
प्रथमच एका दिवसात एवढं विक्रमी उत्पन्न मिळालं आहे. एसटीच्या एकूण प्रवाशांपैकी ८५
टक्क्यांहून अधिक प्रवासी १०० किलोमीटरच्या आतील अंतराचा प्रवास करतात. त्यामुळे प्रत्येक
आगारानं स्थानिक प्रवाशांची गरज ओळखून वाहतूक नियोजन करण्याची गरज असल्याचं सरनाईक
यांनी सांगितलं.
****
राज्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या
‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ साठी अर्ज सादर
करण्याची मुदत ११ सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष
शेलार यांनी ही माहिती दिली. या वर्षीपासून महाराष्ट्राबरोबरच देशभरातल्या आणि देशाबाहेरील
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्वतंत्र बक्षिसांची तरतूद करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या
माध्यमातून सामाजिक प्रबोधन, पर्यावरण संवर्धन, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं ही स्पर्धा
आयोजित करण्यात आली आहे.
****
आगामी गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित
आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय
शिरसाठ यांनी केलं आहे. सार्वजनिक गणेशोत्सव-२०२६ च्या पूर्वतयारी संदर्भात आज झालेल्या
बैठकीत ते बोलत होते. उत्सवाच्या आनंदाला कोणत्याही प्रकारे गालबोट लागू नये, यासाठी पोलीस प्रशासनासह महानगरपालिका, महावितरण
तसंच अन्य संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयातून काटेकोर नियोजन करावं, गणेश मंडळांना आवश्यक परवानग्या आणि नागरी सुविधांसंदर्भात अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश शिरसाठ यांनी दिले.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या, ‘मराठवाड्याचा विकास, तुम से ना हो पायेगा!’ या जनआंदोलनाअंतर्गत
आज माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळानं
जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची भेट घेतली. यावेळी जालना जिल्ह्याच्या
विकासासाठी शासनाकडून करण्यात आलेल्या विविध घोषणा, प्रलंबित
प्रकल्प आणि रखडलेल्या विकासकामांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. या सर्व
विकासकामांना तातडीनं गती देऊन जालना जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याची मागणी यावेळी
करण्यात आली.
****
ज्येष्ठ पत्रकार नागनाथ फटाले पत्रकारिता जीवन साधना गौरव पुरस्कार
पुणे इथले पत्रकार विजय कुवळेकर यांना जाहीर झाला आहे. फटाले कुटुंबियांतर्फे दिला
जाणारा हा पुरस्कार येत्या २२ सप्टेंबर रोजी राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे यांच्या
हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. सुनिल नागनाथ फटाले तसंच डॉ. सुधा कांकरिया यांनी
आज छत्रपती संभाजीनगर इथं ही माहिती दिली.
****
भारताच्या सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या
जोडीने चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. आज झालेल्या
अंतिम सामन्यात सात्विक -चिरागने चीनच्या जोडीचा ११-२१, २१-१३, २१-१७ असा पराभव केला. या स्पर्धेतलं भारताचं हे पहिलंच विजेतेपद आहे.
****
बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आज परळी तालुक्यातल्या
भोपला इथं गणेश काळकोपरे यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन सोयाबीन नुकसानीची पाहणी
केली. पावसाअभावी झालेल्या नुकसानीची तातडीनं दखल घेऊन शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळवून
देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं खासदार सोनवणे यांनी यावेळी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment