Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 08
September 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ सप्टेंबर २०२६ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज
गुजरात आणि महाराष्ट्र दौऱ्यावर असून, मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट
२०२६ चं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. सातवा ग्लोबल फिनटेक महोत्सव आजपासून, ११ सप्टेंबरपर्यंत
होणार आहे. ग्लोबल फिनटेक फेस्ट हा जगातल्या सर्वांत मोठ्या वार्षिक फिनटेक परिषदांपैकी
एक आहे. धोरणकर्ते, नियामक, मध्यवर्ती बँका, वित्तीय संस्था, फिनटेक तंत्रज्ञान
कंपन्या, गुंतवणुकदार तसंच शिक्षण क्षेत्रातल्या संबंधितांना एकत्र आणणारा मंच म्हणून २०२०
पासून ग्लोबल फिनटेक फेस्ट उदयाला आला आहे. एजंटिक कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम तंत्रज्ञान
आणि इतर महत्त्वाच्या आणि नव्यानं उदयाला येणार्या तंत्रज्ञानाचा, नागरिकांवर, आस्थापनांवर
आणि जागतिक अर्थव्यवस्थांवर, कसा परिणाम होईल, यावर या फेस्टमध्ये चर्चा
होणार आहे.
तत्पूर्वी पंतप्रधानांनी गुजरातमध्ये
वडोदरा इथं ३५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी, उद्घाटन आणि
लोकार्पण केलं. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या तीन महत्त्वाच्या टप्प्यांचं
त्यांनी राष्ट्रार्पण केलं. या कॉरिडॉरमध्ये महाराष्ट्रातल्या न्यू उंबरगाव ते न्यू
सफाळे आणि न्यू सफाळे ते जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट या मार्गांचा समावेश आहे. तसंच
चार मालवाहू रेल्वे सेवांनाही पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला, यात जेएनपीटी
इथून निघणार्या मालगाडीचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातल्या उरण इथं याअंतर्गत आयोजित
कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
प्रसिद्ध गायक आणि आसाम विधानपरिषदेचे माजी आमदार भारतरत्न डॉक्टर भूपेन हजारिका यांच्या
जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. हजारिका यांच्या आवाजानं आसामच्या आत्म्याला
आणि ईशान्य भारताच्या भावनेला पूर्ण देशात पोचवलं, असं पंतप्रधानांनी आपल्या
संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही
भूपेन हजारिका यांना आदरांजली वाहिली.
****
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस
आज पाळण्यात येत आहे. यानिमित्त शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी, साक्षरता ज्ञान, संधी आणि उज्ज्वल
भविष्याचे दरवाजे उघडत असल्याचं नमूद केलं. त्यांनी लोकांना शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचं
आणि कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची खात्री करण्याचं आवाहन केलं. सुशिक्षित
आणि सक्षम नागरिक हा विकसित भारताचा भक्कम पाया असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या
संदेशात म्हटलं आहे.
****
राज्यात अनेक भागात गेल्या
महिनाभरापासून पावसाने ओढ दिली असून, पीकं उद्ध्वस्त होण्याच्या
मार्गावर आहेत. त्यामुळे सरकारने पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची
मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी
बोलत होते. राज्यातले सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या अत्यंत गंभीर संकटात सापडले असून, जवळपास ७०
टक्के सोयाबीनचं नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना या संकटातून
वाचवण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात, असं वडेट्टीवार म्हणाले.
****
चालू शैक्षणिक वर्षामध्ये
अभियांत्रिकी, वैद्यकीय तसंच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आरक्षित प्रवर्गातून
प्रवेश निश्चित झालेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची
मुदतवाढ देण्यात आली आहे. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती
तसंच विशेष मागास प्रवर्गातल्या ज्या उमेदवारांचे प्रवेश निश्चित झाले आहेत त्यांना
चार डिसेंबरपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र दाखल करता येईल.
****
गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्ली
तालुक्यातल्या हालेवारा आणि तोडसा इथल्या दोन आश्रमशाळांचं मॉडेल आश्रमशाळांमध्ये, तर, बुर्गी आणि
पैमा इथल्या जिल्हा परिषद शाळांचं मॉडेल शाळांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी
अविश्यांत पंडा यांनी या शाळांमधल्या शैक्षणिक सुविधांचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय
घेण्यात आला.
****
गडचिरोली जिल्ह्यातल्या कोरची
तालुक्यातल्या नांगपूर या गावात सुमारे बावीस लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात
आला. एका व्यक्तीनं आपल्या घराच्या परसबागेत अवैधरीत्या गांजाची लागवड केल्याची माहिती
मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई करत सुमारे साडेत्रेचाळीस किलो गांजा जप्त केला.
****
चीन मध्ये सुरु असलेल्या एएचएफ
कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाने दक्षिण कोरियाचा ७-३ असा पराभव
केला. या विजयानंतर गतविजेत्या भारतीय संघाचे तीन सामन्यांमध्ये मिळून सात गुण झाले
असून, उद्या चिनी तैपेई संघाशी होणारा सामना जिंकल्यास भारतीय संघाचं उपान्त्य फेरीतलं
स्थान निश्चित होईल.
****
No comments:
Post a Comment