Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 08 September 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ सप्टेंबर २०२६
सायंकाळी ६.१०
****
· पश्चिम आणि पूर्व समर्पित रेल्वे मार्गिका पूर्ण झाल्यामुळे
मालवाहतुकीत ऐतिहासिक परिवर्तन-पंतप्रधानांचं प्रतिपादन
· तेहतीस हजारावर स्टार्टअप्ससह महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर-केंद्रीय
सहकार मंत्र्यांचे गौरवोद्गार
· खेळाडूंच्या नोकर भरतीसाठी राज्य मंत्रिमंडळाची सुधारित आरक्षण
धोरणाला मंजुरी
· कुणबी प्रमाणपत्र वाटपाची कार्यवाही सुलभ आणि पारदर्शकपणे करण्याचे
निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांचे निर्देश
आणि
· जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत भारताला आज दोन सुवर्ण आणि एक
रौप्यपदक
****
पश्चिम आणि पूर्व समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिका पूर्ण
झाल्यामुळे देशाच्या मालवाहतूक क्षेत्रात ऐतिहासिक परिवर्तन घडत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या ३२६
किलोमीटर लांबीच्या आणि २० हजार ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या तीन
महत्त्वपूर्ण टप्प्यांचं राष्ट्रार्पण करताना ते आज बोलत होते. या मार्गिका देशाच्या व्यापारी व्यवस्थेत मूलभूत परिवर्तन
घडवून आणत असून त्या राष्ट्रीय व्यापाराचा आधार बनत असल्याचं त्यांनी नमूद केलं. ते म्हणाले –
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
या कॉरिडॉरमध्ये महाराष्ट्रातल्या न्यू उंबरगाव ते न्यू सफाळे आणि न्यू सफाळे ते जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट या मार्गांचा समावेश आहे. या लोकार्पणाच्या
निमित्तानं उरणच्या जेएनपीए इथे झालेल्या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा
पवार यांच्यासह अन्य मंत्री आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते. पंधराशे किलोमीटर लांबीच्या या कॉरिडॉरमुळे, उत्तर भारत पश्चिम भारताशी जोडला जाणार असून, जेएनपीटी बंदरावरून होणाऱ्या मालवाहतुकीचा विस्तार देशाच्या अन्य भागांमध्येही होणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज
महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून, मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट
२०२६ चं उद्घाटन त्यांच्या हस्ते होत आहे. सातवा ग्लोबल फिनटेक महोत्सव आजपासून, ११ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
****
महाराष्ट्र तेहतीस हजार आठशे बहात्तर स्टार्टअप्ससह देशात
प्रथम क्रमांकावर असून, देशाची
आर्थिक राजधानी मुंबई जागतिक भांडवलाचं महत्त्वाचं केंद्र म्हणून वेगानं उदयास येत
असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय गृह आणि सहकार
मंत्री अमित शाह यांनी काढले आहेत. आज
गोव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या
पश्चिम विभागीय परिषदेच्या अठ्ठाविसाव्या
बैठकीत ते बोलत होते. महाराष्ट्रानं प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या संगणकीकरणाचं
अठ्ठ्याण्णव टक्के काम पूर्ण करून उल्लेखनीय प्रगती साधली
असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
****
दिवंगत पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या
सांगितिक प्रवासाचा आढावा घेणाऱ्या गीताचं आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
हस्ते प्रकाशन झालं. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, संगीतकार
ए आर रहमान,
यांच्यासह भोसले कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. कृत्रीम बुद्धिमत्ता
- एआयच्या सहाय्याने तयार करण्यात आलेलं हे गाणं प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांनी
संगीतबद्ध केलं आहे. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले –
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
राज्य मंत्रिमंडळाने खेळाडूंच्या नोकर भरतीसाठी सुधारित आरक्षण
धोरण मंजूर केलं आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यशस्वी
खेळाडूंना शासकीय, निमशासकीय आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठीच्या
५% आरक्षणाबाबत हे सुधारित धोरण असून, यासंदर्भातले यापूर्वीचे
सर्व शासन निर्णय, शासन शुद्धिपत्रकं, परिपत्रकं,
आणि पत्रं आता रद्द झाली आहेत.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी, “प्रगती अर्थात प्रायमरी हेल्थकेअर री इमॅजिनड विथ ॲडव्हान्स्ड गवर्नन्स अँड ॲक्सेसिबल
टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन” हा प्रकल्प राबवण्यास आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. हा प्रकल्प
सन २०२६-२०३१ या कालावधीत राबवण्यात येणार आहे.
****
कुणबी प्रमाणपत्रांसंदर्भात मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेल्या
सर्वच मुद्यांवर सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन एक पाऊल पुढे टाकलं आहे, सरकारने घेतलेल्या निर्णयांबाबत त्यांनीही आता समाधान व्यक्त करून सकारत्मक प्रतिसाद
द्यावा,
असं आवाहन मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील
यांनी केलं आहे. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते. सरकार निर्णय घेत असताना जरांगे
यांनीही दोन पावलं पुढे टाकावेत, अशी अपेक्षा विखे पाटील यांनी
व्यक्त केली. निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांचे मराठवाड्यातील दौरे आजपासून सुरू झाले
असून,
त्यांच्या दौऱ्यातूनही वस्तुस्थिती समोर येईल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.
****
उपलब्ध कागदोपत्री नोंदी, वंशावळ
आणि संबंधित पुराव्यांची नियमानुसार पडताळणी करून पात्र व्यक्तींना कुणबी जातीचं प्रमाणपत्र
देण्याची कार्यवाही सुलभ आणि पारदर्शकपणे करावी, असे
निर्देश निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. छत्रपती
संभाजीनगर इथे विभागीय आयुक्त कार्यालयात दूरदृष्यप्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत
ते आज बोलत होते. ग्राम आणि तालुका पातळीवरच्या यंत्रणांनी अर्जदारांना आवश्यक नोंदी
उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावं, असंही त्यांनी सांगितलं.
****
कुणबी प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र जलदगतीनं उपलब्ध
करून देण्यासाठी बीड तालुक्यात विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या १० ते
१७ सप्टेंबर दरम्यान मंडळ स्तरावर ही मोहीम राबवण्याचे आदेश राज्य शासनानं दिले असून, त्यानुसार बीड जिल्ह्यात ११, १५ अणि १६ तारखेला ही शिबिरं
होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात मनोज
जरांगे यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी अंबाजोगाई इथे आंदोलकांनी आज रास्ता रोको
आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी लातूर-परळी-अहमदपूर महामार्गावर ठिय्या देत वाहतूक
रोखल्यानं महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांमधले कथित गैरप्रकार
आणि परीक्षा प्रक्रियेतल्या इतर तक्रारींबाबत आज छत्रपती संभाजीनगर इथे क्रांती चौक
परिसरात संबंधित उमेदवारांनी आंदोलन केलं. एमपीएससी अध्यक्ष तसंच सचिव यांच्या पदावरील
जबाबदारीचा पुनर्विचार करून त्यांच्या जागी निष्पक्ष आणि स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांची
नियुक्ती करावी अशी मागणीही या वेळी परीक्षार्थींनी केली.
****
धाराशिव जिल्ह्यात यावर्षी पावसानं ओढ दिल्यामुळे जिल्ह्यातल्या
शेतपिकांसह फळबागा संकटात सापडल्या आहेत, या परिस्थितीची माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी
प्रयत्न करू,
असं भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण
वेताळ यांनी म्हटलं आहे. वेताळ यांनी आज धाराशिव तालुक्यातल्या आंबेवाडी इथल्या सोयाबीन
पिकाची पाहणी केली, त्यानंतर ते शेतकऱ्यांशी बोलत होते. महायुती
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत महामार्गालगतची
व्यावसायिक अतिक्रमणं हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. धुळे-सोलापूर तसंच छत्रपती
संभाजीनगर-पैठण मार्गालगत ही कारवाई करण्यात येत आहे. ही मोहीम पुढचे १५ दिवस सुरू
राहणार असून,
नागरिक तसंच व्यावसायिकांनी आपली अतिक्रमणं स्वतःहून काढून घेत
सहकार्य करावं,
असं आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केलं आहे.
****
गणपती आणि महालक्ष्मी उत्सवानिमित्त दक्षिण मध्य रेल्वे नांदेड-सावंतवाडी
रोड-नांदेड ही विशेष रेल्वेगाडी चालवणार आहे. यामुळे मराठवाडा आणि कोकण हे दोन प्रदेश
प्रथमच थेट रेल्वे सेवेने जोडले जाणार आहेत.
****
अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेच्या
तिसऱ्या टप्प्यात भारतानं आज दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकलं. हरविंदर सिंह आणि
विजय सुंडी या जोडीनं रिकर्व्ह प्रकारात पुरुष दुहेरीचं तर तोमर कुमार आणि श्याम सुंदर
स्वामी या जोडीनं पुरुष दुहेरीचं सुवर्णपदक मिळवलं. महिलांच्या गटात रिकर्व्ह दुहेरीत
पूजा जत्यान आणि भावना चौधरी या जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.
****
No comments:
Post a Comment