▼

Wednesday, 9 September 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 09.09.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 09 September 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      यूपीआय हा भारताच्या फिनटेक प्रवासाचा खरा नायक, पंतप्रधानांचं प्रतिपादन; मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६ चं उद्घाटन

·      खेळाडूंना नोकरीसाठी पाच टक्के आरक्षणाबाबत सुसूत्रता आणण्यासाठीच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

·      कुणबी प्रमाणपत्रांसंदर्भातल्या अडचणींचं निराकरण करण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये उच्चस्तरीय समितीची बैठक

आणि

·      लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये शेतपिकांसह फळबागा संकटात, विशेष मदत पॅकेज जाहीर करण्याची लोकप्रतिनिधींची मागणी

****

यूपीआय हा भारताच्या फिनटेक प्रवासाचा खरा नायक आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६ चं उद्घाटन करताना ते बोलत होते. जिथे पारंपरिक मॉडेल्स पोहोचू शकले नाहीत, तिथे फिनटेक पोहोचू शकतं, हे त्याचं वैशिष्ट्य असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं. फिनटेक कंपन्यांनी सर्वोच्च सायबर सुरक्षा, स्वत:चं नैतिक डेटा संरक्षण मानक, सक्षम फिनटेक नियामक उद्योग नवोन्मेष परिसंस्था तयार करणं आणि फिनटेक ग्राहक संरक्षण निर्देशांक तयार करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. फिनटेकचा विस्तार पाहता, विकसित भारताच्या भवितव्याबद्दलचा विश्वास अधिक बळकट होत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले.. 

बाईट -  पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

त्यापूर्वी गुजरातमध्ये विविध विकास कामांचं लोकार्पण तसंच पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या ३२६ किलोमीटर लांबीच्या आणि २० हजार ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या तीन महत्त्वपूर्ण टप्प्यांचं राष्ट्रार्पण पंतप्रधानांच्या हस्ते काल करण्यात आलं. पंधराशे किलोमीटर लांबीच्या या कॉरिडॉरमुळे, उत्तर भारत पश्चिम भारताशी जोडला जाणार असून, जेएनपीटी बंदरावरून होणाऱ्या मालवाहतुकीचा विस्तार देशाच्या अन्य भागांमध्येही होणार आहे.

या लोकार्पणाच्या निमित्तानं उरणच्या जेएनपीए इथं झालेल्या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मंत्री आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.

****

राज्यातल्या प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५ टक्के आरक्षणाबाबत सुसूत्रता आणण्यासाठी सुधारित धोरण लागू करायला काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या सुधारित धोरणानुसार आरक्षणासाठी पात्र खेळाडूंना तीन महिन्यांच्या मुदतीत क्रीडा प्रमाणपत्राची वैधता पडताळणी करून घेणं आवश्यक आहे.

सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी, "प्रगती  अर्थात प्रायमरी हेल्थकेअर री इमॅजिनड विथ ॲडव्हान्स्ड गवर्नन्स अँड ॲक्सेसिबल टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन" हा प्रकल्प राबवण्यासही काल मंत्रिमंडळाने मान्यता दिली. हा प्रकल्प सन २०२६-२०३१ या कालावधीत राबवण्यात येणार आहे.

****

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या विविध बाबींचा आढावा घेऊन कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीचं प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीतील त्रुटी आणि अडचणींचं निराकरण करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची बैठक आज छत्रपती संभाजीनगर इथं होणार आहे. या बैठकीत क्षेत्रीय स्तरावरील विविध बाबींचा सखोल आढावा घेऊन पुढील कार्यवाहीची दिशा निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

**

दरम्यान, कुणबी प्रमाणपत्रांसंदर्भात मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेल्या सर्वच मुद्द्यांवर सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन एक पाऊल पुढे टाकलं आहे, सरकारने घेतलेल्या निर्णयांबाबत त्यांनीही आता समाधान व्यक्त करून सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असं आवाहन मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. ते काल मुंबईत माध्यमांशी बोलत होते. निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांचे मराठवाड्यातले दौरे कालपासून सुरू झाले असून, त्यांच्या दौऱ्यातूनही वस्तुस्थिती समोर येईल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.

**

आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी इथं मागील दहा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची जालना इथल्या जिल्हा रुग्णालयाच्या पथकाने वैद्यकीय तपासणी केली आणि सलाईन लावून उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

****

मराठा आरक्षणासाठी लातूर जिल्ह्यात शिरूर अनंतपाळ तालुक्यातल्या सुमठाना इथल्या सुनील बिरादार या तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा दावा करण्यात येत आहे. संतप्त कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत मोड इथं उदगीर-लातूर महामार्गावर मृतदेह ठेवून चक्काजाम आंदोलन सुरु केल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.

**

मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी अंबाजोगाई इथं काल रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी लातूर-परळी-अहमदपूर महामार्गावर ठिय्या देत वाहतूक रोखल्यानं महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. 

**

जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परभणी जिल्ह्यातून काल भव्य वाहन रॅली काढण्यात आली. हजारो कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.

****

उपलब्ध कागदोपत्री नोंदी, वंशावळ आणि संबंधित पुराव्यांची नियमानुसार पडताळणी करून पात्र व्यक्तींना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुलभ आणि पारदर्शकपणे करावी, असे निर्देश निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात दूरदृष्यप्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. ग्राम आणि तालुका पातळीवरच्या यंत्रणांनी अर्जदारांना आवश्यक नोंदी उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावं, असंही त्यांनी सांगितलं.

**

कुणबी प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र जलदगतीनं उपलब्ध करून देण्यासाठी बीड जिल्ह्यात ११, १५ अणि १६ तारखेला विशेष शिबीरं होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

लातूर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्येही १० ते १७ सप्टेंबर या कालावधीत विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातल्या कामकाजाबाबत काल नांदेड इथं मतदार नोंदणी अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिर पार पडलं. या टप्प्यात मतदारांकडून प्राप्त होणारे दावे आणि हरकतींची काटेकोरपणे पडताळणी करून त्यांचा नियमानुसार तातडीने निपटारा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी यावेळी दिले.

****

काँग्रेस नेते, माजी आमदार धीरज देशमुख यांनी लातूर तालुक्यातल्या करकट्टा आणि माटेफळ इथं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पावसाअभावी उद्ध्वस्त झालेल्या शेती पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि पीक नुकसानीची मदत अद्यापही मिळालेली नसल्याची व्यथा मांडली. मराठवाड्यासह लातूर जिल्ह्यासाठी शासनाने तातडीने विशेष मदत पॅकेज जाहीर करावं अशी मागणी देशमुख यांनी यावेळी केली.

****

धाराशिव जिल्ह्यात यावर्षी पावसानं ओढ दिल्यामुळे जिल्ह्यातल्या शेतपिकांसह फळबागा संकटात सापडल्या आहेत, या परिस्थितीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असं भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी म्हटलं आहे. काल धाराशिव तालुक्यातल्या आंबेवाडी इथल्या सोयाबीन पिकाची पाहणी केल्यानंतर ते शेतकऱ्यांशी बोलत होते.

****

राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांमधले कथित गैरप्रकार आणि परीक्षा प्रक्रियेतल्या इतर तक्रारींबाबत काल छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौक परिसरात संबंधित उमेदवारांनी आंदोलन केलं. एमपीएससी अध्यक्ष तसंच सचिव यांच्या पदावरील जबाबदारीचा पुनर्विचार करून त्यांच्या जागी निष्पक्ष आणि स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने काल धाराशिव इथं जनआंदोलन करण्यात आलं. मराठवाड्यासाठी राज्य सरकारने केलेल्या विविध योजना पूर्ण झाल्या नसल्याबद्दल पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी यावेळी टीका केली.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत बीड जिल्ह्यातल्या सर्व प्रलंबित तक्रारींचं येत्या दोन दिवसांत निवारण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सर्व राष्ट्रीयकृत बँकांना दिले आहेत. काल यासंदर्भात विविध बँकांच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. प्रशासनानं, शेतकऱ्यांना फार्मर आयडी प्राप्त करून घेण्याचं तसंच आधार प्रमाणीकरण तातडीनं पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे.

****

येत्या दोन दिवसात कोकणात अनेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

****

No comments:

Post a Comment