▼

Tuesday, 8 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.09.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 08 September 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६ चं उद्घाटन

·      पश्चिम विभागीय परिषदेची केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, प्रादेशिक हितांच्या मुद्यांवर चर्चा

·      कुणबी दाखल्यासंदर्भातल्या अडचणी दूर करण्यासाठी १० ते १७ सप्टेंबर दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात शिबीराचं आयोजन

·      भरती परीक्षा पद्धतीसंदर्भात कृती दलाची सहा विभागांना प्रत्यक्ष भेट, छत्रपती संभाजीनगरमध्ये २१ सप्टेंबर रोजी संवाद कार्यक्रम

आणि

·      मराठवाड्यातल्या सर्व धरणांमधलं पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र आणि गुजरात दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६ चं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेत एजंटिक एआय, टोकनायझेशन आणि क्वांटम तंत्रज्ञानाद्वारे सर्वसमावेशक वित्ताचा मार्ग सुकर करण्यावर चर्चा होईल.

त्यापूर्वी गुजरातमध्ये वडोदरा इथं ३५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या तीन महत्त्वाच्या टप्प्यांचं राष्ट्रार्पण करुन, चार मालवाहू रेल्वे सेवांना ते हिरवा झेंडा दाखवतील.

****

पश्चिम विभाग हा देशाच्या आर्थिक, औद्योगिक आणि वित्तीय विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारा भाग असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. गोव्यात पणजी इथं पश्चिम विभागीय परिषदेच्या २८व्या बैठकीत ते काल बोलत होते. वित्त, निर्यात, बंदरे, स्टार्टअप, सेमीकंडक्टर, पर्यटन आणि नील अर्थव्यवस्था यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये पश्चिम विभागाचं मोठं योगदान असल्याचं त्यांनी नमूद केलं. हरित ऊर्जा क्षेत्रात पश्चिम विभागातली राज्ये देशाचं नेतृत्व करत असल्याचं सांगत, केंद्र सरकारच्या हरित ऊर्जा धोरणांचा लाभ घेण्याचं आवाहन अमित शाह यांनी केलं. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, तसंच दमण दीव आणि दादरा नगरहवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारांमधले वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. प्रादेशिक हिताच्या अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते गोवा पोलिसांना राष्ट्रपतींचा ध्वज प्रदान करण्यात आला.

****

जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले मंगेश ससाणं, विठ्ठल ताळेकर, बाबासाहेब बतुले आणि सतीश कुलाल या ओबीसी आंदोलकांना पोलिसांनी काल सुरक्षेच्या कारणावरून ताब्यात घेतलं. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळापासून काही अंतरावर या चौघांनी आंदोलन सुरू केलं होतं. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती.

दरम्यान, जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा काल दहावा दिवस होता. वैद्यकीय तपासणी न करण्यावर तसंच पाणी आणि सलाईन घेण्यास नकाराच्या भूमिकेवर ते कायम असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जरांगे यांनी येत्या १२ सप्टेंबरला अंतरवाली सराटी इथं मराठा बांधवांची बैठकही बोलावली आहे.

****

कुणबी दाखले मिळण्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी परवा १० ते १७ सप्टेंबर दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात शिबीरं आयोजित करण्याची सूचना, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागीय आयुक्तांसह सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना केली आहेत. मराठवाड्यातल्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसंच प्रांताधिकार्यांसोबत काल दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हानिहाय देण्यात आलेली जात पडताळणी प्रमाणपत्रांची संख्या, कुणबी नोंदी तसंच प्राप्त झालेल्या अर्जांचा विखे पाटील यांनी सविस्तर आढावा घेतला. निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीने शोधलेल्या ५८ लाख नोंदींच्या याद्या प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध केल्या जाणार असून, सर्व जिल्ह्यांमधल्या अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय ठेवून आरक्षणाच्या प्रत्येक प्रश्नाबाबत गांभीर्याने कार्यवाही करावी, अशा सूचनाही विखे पाटील यांनी केल्या.

****

धनगर समाजाच्या एस टी प्रवर्गात समावेशासह आरक्षणाच्या मागणीसाठी समाज बांधवांनी राज्यात अनेक ठिकाणी काल आंदोलन केलं. या प्रश्नी आज सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत राज्य सरकारने कोणतीही संदिग्ध भूमिका न ठेवता, धनगर समाजाच्या हक्काच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी संपूर्ण कायदेशीर ताकदीने आपली ठाम बाजू मांडावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

****

भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचवण्यासाठी नियुक्त केलेलं कृती दल राज्यातल्या सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देणार आहे. या भेटीदरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसंच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी तसंच अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं येत्या २१ सप्टेंबर रोजी स्मार्ट सिटी कार्यालयात हे संवाद सत्र होणार आहे.

****

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांची जबाबदारी स्वीकारुन आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एमपीएससी उमेदवारांनी केली आहे. या आणि इतर १० मागण्यांच्या समर्थनार्थ एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी काल राज्यात अनेक ठिकाणी निदर्शनं केली.

****

नवीन पिढी घडवण्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, त्यांनी बालकांना शिस्त, संस्कार आणि ममत्व देऊन सुसंस्कृत पिढी घडवण्यासाठी योगदान द्यावं, असं आवाहन सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं. लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातल्या शिरूर ताजबंद इथं एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अहमदपूर तालुक्यातल्या चार अंगणवाडी सेविका आणि १५ मदतनीसांना सहकारमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले.

****

मराठवाड्यातल्या सर्व धरणांमध्ये असलेलं पाणी, पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले आहेत. पाणी उपसा करणारे विद्युत पंप जप्तीचे आदेशही त्यांनी जारी केले.

दरम्यान धाराशिव, लातूर आणि बीड या जिल्ह्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात सध्यस्थितीत अत्यल्प म्हणजे केवळ १२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर या धरणातून शेतीसाठी लागणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून, या तीन जिल्ह्यासाठीच्या २२ पाणीपुरवठा योजनाही बंद होण्याची शक्यता आहे.

****

राज्यात संभाव्य दुष्काळसदृश गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक विशेष आर्थिक पॅकेज तर मराठवाडा आणि विदर्भातल्या तीव्र प्रभावित भागांसाठी एल निनो विशेष पॅकेज’ तातडीने मंजूर करावं, अशी मागणी माजी आमदार धीरज देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होत असल्याचं देशमुख यांनी या पत्रात नमूद केलं आहे.

****

बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, पाणी, वीज प्रश्न सोडवावेत तसंच जलजीवन मिशनमधील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल जनआंदोलन करण्यात आलं. आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी आणि शेतकरी सहभागी झाले होते.

****

लातूर जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी औसा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी काल आक्रोश आंदोलन केलं. या मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. औसा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आलं.

****

हिंगोली जिल्ह्यात रस्ते अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. काल दुपारच्या सुमारास औंढा नागनाथ ते झिरोफाटा रस्त्यावर कळंबा पाटी ते गुंडा पाटी दरम्यान ऑटोरिक्षा आणि मालवाहू वाहनाची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. मृतांमध्ये एक वर्षाची चिमुकली आणि तिची आई तसंच अन्य एका १२ वर्षीय मुलाचा समावेश आहे.

****

गणेशोत्सवाम्यान कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असं आवाहन बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं आहे. काल शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. गणेशमूर्ती विसर्जनासाठी पाण्याची कमतरता लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांनी कृत्रिम व्यवस्था करण्याबाबत चाचपणी करावी, तसंच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना त्यांनी केल्या.

****

गणेशोत्सवाच्या कालावधीत नांदेड शहरासह जिल्ह्यात डॉल्बी सिस्टिमच्या वापरास प्रतिबंध करणारा आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जारी केला आहे. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

****

हवामान

येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

****

No comments:

Post a Comment