Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 September 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ सप्टेंबर २०२६
सायंकाळी ६.१०
****
· ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६च्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र
मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर
· पश्चिम विभागीय परिषदेची केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली
बैठक-प्रादेशिक हिताच्या मुद्द्यांवर चर्चा
· आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीनं आज राज्यात अनेक
ठिकाणी आंदोलन
· मराठवाड्यातील सर्व धरणामधलं पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे
विभागीय आयुक्ताचे आदेश
आणि
· परभणी इथे बी रघुनाथ महोत्सवाला प्रारंभ
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र आणि गुजरात दौऱ्यावर
येणार आहेत. मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६चं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात
येणार आहे. त्यापूर्वी गुजरातमध्ये वडोदरा इथे ३५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या
विविध विकासकामांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या
हस्ते होणार आहे. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या तीन महत्त्वाच्या टप्प्यांचं
पंतप्रधान उद्या राष्ट्रार्पण करतील. चार मालवाहू रेल्वे सेवांना ते हिरवा झेंडा दाखवतील.
गुजरातमधील ९ हजार ७०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या तीन रेल्वे प्रकल्पांची तसंच, सुमारे १ हजार ७८० कोटी रुपये खर्चाच्या तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पंतप्रधानांच्या
हस्ते पायाभरणी होणार आहे.
****
पश्चिम विभागीय परिषदेची २८वी बैठक आज केंद्रीय गृहमंत्री अमित
शहा यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यात पणजी इथं झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री
प्रमोद सावंत,
तसंच दमण दीव आणि दादरा नगरहवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्यासह
केंद्र आणि राज्यसरकारांमधले वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. प्रादेशिक हिताच्या
अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय
गृहमंत्र्यांच्या हस्ते गोवा पोलिसांना राष्ट्रपतींचा ध्वज प्रदान करण्यात आला. यावेळी
केलेल्या भाषणात गोवा पोलिसांचा गौरव करतांना शहा म्हणाले –
बाईट - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोच्या खासगीकरणाची शक्यता या
संस्थेचे प्रमुख डॉ. व्ही. नारायणन यांनी फेटाळून लावली आहे. ते आज बंगळुरू इथं माध्यमांशी
बोलत होते. इस्रो ही केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संस्था आहे. देशाच्या अंतराळ परिसंस्थेत
भारतीय उद्योगांची भूमिका सातत्याने वाढत असल्याचं मात्र त्यांनी अधोरेखित केलं. PSLV आणि GSLV
मोहिमांच्या बजेटपैकी सुमारे ८० टक्के निधी भारतीय उद्योगांमध्ये
गुंतवला जातो,
तर जवळपास ४५० उद्योग देशाच्या अंतराळ कार्यक्रमात योगदान देत
आहेत,
अशी माहिती त्यांनी दिली. अंतराळावर आधारित सेवांची वाढती मागणी
पूर्ण करण्यासाठी भारताच्या अंतराळ क्षमतांचा आणखी विस्तार करण्याची गरज डॉ. नारायणन
यांनी व्यक्त केली. ते म्हणाले –
बाईट – इस्रो प्रमुख डॉ. व्ही. नारायणन
****
राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधे पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांची
जबाबदारी स्वीकारुन आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी
एमपीएससी उमेदवारांनी केली आहे. या आणि इतर १० मागण्यांच्या समर्थनार्थ एमपीएससीची
परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज राज्यात अनेक ठिकाणी मोर्चा काढला.
****
धनगर समाजाच्या एस टी प्रवर्गातील समावेशासह आरक्षणाच्या मागणीसाठी
धनगर समाजाने राज्यात अनेक ठिकाणी आज आंदोलन केलं. या प्रश्नी उद्या ८ सप्टेंबर रोजी
सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत राज्य सरकारने कोणतीही संदिग्ध भूमिका न ठेवता, धनगर समाजाच्या हक्काच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी संपूर्ण कायदेशीर
ताकदीने आपली ठाम बाजू मांडावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्या
यावेळी मोर्चा आणि धरणे आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या
निर्णयानंतर केंद्र आणि राज्य सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ठोस
आणि तातडीची पावलं उचलावीत, अशी मागणी सोलापूर इथल्या सकल
धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली.
धुळे तसंच सांगलीतही या अनुषंगाने मोर्चा काढण्यात आला
****
जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी
उपोषणाला बसलेले मंगेश ससाने, विठ्ठल ताळेकर, बाबासाहेब बतुले आणि सतीश कुलाल या ४ ओबीसी आंदोलकांना पोलिसांनी आज सुरक्षेच्या
कारणावरून ताब्यात घेतलं. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळापासून
काही अंतरावर या चौघांनी आंदोलन सुरू केलं. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी या
आंदोलनाला परवानगी नाकारली होती.
दरम्यान, जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा
आजचा दहावा दिवस असून, वैद्यकीय तपासणी तसंच पाणी आणि सलाईन घेण्यास
नकाराच्या भूमिकेवर जरांगे कायम असल्याचं, आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परवा बुधवारपासून देशभरात राष्ट्रीय पोषण माह २०२६ चा प्रारंभ
होणार आहे. ‘आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी’ या मुख्य संकल्पनेवर आधारित असणाऱ्या या मोहिमेत पोषण, सार्वजनिक
आरोग्य आणि बालसंगोपनाबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. परभणी इथे या औचित्याने
होणाऱ्या उपक्रमाची रुपरेषा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर
आणि महिला तसंच बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी आर. पी. कळम यांनी जाहीर
केली आहे.
****
मराठवाड्यातील सर्व धरणामध्ये असलेले पाणी, पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत
यांनी दिले आहेत. पाणी उपसा करणारे विद्युत पंप जप्तीचे आदेशही विभागीय आयुक्तांनी
जारी केले. दरम्यान धाराशिव, लातूर आणि बीड या ३ जिल्ह्यांना
पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात सध्यस्थितीत अत्यल्प म्हणजे केवळ १२ टक्के पाणीसाठा
शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर या धरणातून शेतीसाठी लागणारा पाणीपुरवठा बंद करण्यात
आला असून या ३ जिल्ह्यासाठीच्या २२ पाणीपुरवठा योजनाही बंद होण्याची शक्यता आहे.
****
राज्यात संभाव्य दुष्काळसदृश गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर
शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक विशेष आर्थिक पॅकेज तर मराठवाडा आणि विदर्भातल्या तीव्र
प्रभावित भागांसाठी एल निनो विशेष पॅकेज’ तातडीने मंजूर करावं, अशी मागणी माजी आमदार धीरज देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे
पत्राद्वारे केली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे
पिण्याच्या पाण्यासोबतच पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होत असल्याचं देशमुख यांनी
या पत्रात नमूद केलं आहे.
****
बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, पाणी,
वीज प्रश्न सोडवावेत तसंच जलजीवन मिशनमधील भ्रष्टाचाराची चौकशी
करावी,
या मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज जनआंदोलन करण्यात आलं. आंदोलनात मोठ्या संख्येने
शिवसैनिक,
पदाधिकारी आणि शेतकरी सहभागी झाले.
****
लातूर जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी औसा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी आज आक्रोश आंदोलन केलं. या मोर्चात
महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. औसा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांना निवेदन देण्यात आलं.
****
धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा परिषदेच्या
मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाड-दळकर यांनी तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा
गावाला आज भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचं
वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी तालुकास्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
या समित्यांकडूनही शेतकऱ्यांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येत आहे.
****
परभणी इथे बी. रघुनाथ महोत्सवाला प्रारंभ झाला. बी. रघुनाथ यांच्या
कन्या सुधा नरवाडकर यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. प्राध्यापक इंद्रजित
भालेराव यांनी संपादीत केलेल्या ‘पुन्हा नभाच्या लाल कडा’ या
बी. रघुनाथांच्या कवितांच्या संग्रहाचं आणि माहितीपटाच्या पोस्टर चं अनावरणही सुधा
नरवाडकर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं.
****
गणेशोत्सवाच्या कालावधीत नांदेड शहरासह जिल्ह्यात डॉल्बी सिस्टिमच्या
वापरास प्रतिबंध करणारा आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जारी केला आहे. आदेशाचे
उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
****
बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण
ठरणारी बीड-पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर २०२६ रोजी सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर
स्वातंत्र्य सैनिक रेल्वे आंदोलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना
आज शुभेच्छा देण्यात आल्या. या सेवेमुळे बीड आणि पुणे दरम्यानच्या प्रवासाला दळणवळणाचं
नवीन साधन उपलब्ध होणार आहे.
****
आज अखेरच्या श्रावणी सोमवारनिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील
वेरूळ इथं भाविकांनी घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. छत्रपती संभाजीनगरातील
विविध महादेव मंदिरातही दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्याचं दिसून आलं.
****
No comments:
Post a Comment