▼

Thursday, 10 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 10.09.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 10 September 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      दिल्ली-मुंबई सह देशभरातल्या अत्यंत वर्दळीच्या सात रेल्वे मार्गांच्या चौपदरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी 

·      एजेंटिक एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      पंतप्रधानांच्या राजकीय जीवनाला २५ वर्षे पूर्ण, भाजपकडून सेवा संकल्प अभियान

आणि

·      कुणबी जात प्रमाणपत्रातल्या अडचणी सोडवण्यासाठी आजपासून मराठवाड्यात विशेष शिबीरांचं आयोजन

****

देशभरातल्या अत्यंत वर्दळीच्या सात रेल्वे मार्गांच्या चौपदरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामध्ये दिल्ली-मुंबई, मुंबई-चेन्नई, चेन्नई-कोलकाता आणि कोलकाता-दिल्ली सुवर्ण चतुष्कोणी रेल्वेमार्गाचा समावेश आहे. नवी दिल्ली इथं झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले...

बाईट - माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

रेल्वेच्या एकूण वाहतुकीपैकी सुमारे ४० टक्के वाहतूक या सात मार्गांवरून होते आणि याअंतर्गत सुमारे दोन हजार किलोमीटर रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणाचं काम या आधीच पूर्ण झालं आहे. मंत्रिमंडळाने एकूण १० हजार ७०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या तीन 'मल्टी-ट्रॅकिंग' रेल्वे प्रकल्पांनाही काल मंजुरी दिली.

दरम्यान, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन वर्षभरात सुरू होईल, सुरत ते वापी हा शंभर किलोमीटरचा मार्ग सर्वप्रथम खुला होईल, असं वैष्णव यांनी सांगितलं.

****

एजेंटिक एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुंबईत जिओ सेंटर इथं सुरू असलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६ मध्ये काल बोलताना मुख्यमंत्र्यांनी, या माध्यमातून वित्तीय क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता अधोरेखित केली. तंत्रज्ञानाची क्षमता प्रत्यक्ष परिणामांमध्ये रूपांतरित करणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी, डेल्टा ॲक्टबाबत माहिती दिली. ते म्हणाले...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना युनायटेड किंगडमच्या संसदेत हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी जय महाराष्ट्रचा निनाद करत त्यांनी लाडकी बहीण योजना, शासन आपल्या दारी आणि महाराष्ट्राच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या व्हिजनची मांडणी केली. ब्रिटन संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये शिंदे यांना स्टेट्समनशिप अवॉर्ड, तसंच लंडनच्या महाराष्ट्र मंडळातर्फे देखील 'महाराष्ट्र ग्लोबल प्राईड अवॉर्ड'ने गौरवण्यात येणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला येत्या सात ऑक्टोबर रोजी २५ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त भारतीय जनता पक्ष येत्या १७ तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. या अभियानात नागरिकांनी किमान २५ मिनिटं श्रमदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले...

बाईट - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन

या सेवा संकल्प अभियानाची सुरुवात रक्तदान शिबिराच्या आयोजनाने होईल. पंतप्रधानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सात ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी 'सेवा ज्योती कलश यात्रा' काढली जाणार असल्याचंही नवीन यांनी सांगितलं.

****

न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी काल मुंबई उच्च न्यायालयाचे ५० वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या नियुक्तीपूर्वी न्यायमूर्ती त्रिपाठी हे अलाहाबाद उच्च न्यायालयात कार्यरत होते. दरम्यान न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून काल शपथ घेतली.

****

राज्यात २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत झालेल्या ऊस गळीत हंगाम बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

****

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारची भूमिका अत्यंत लवचिक असून, आतापर्यंत मराठा समाजाच्या तब्बल ८० टक्के मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत, असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मनोज जरांगे यांनी मागण्यांबाबतचा ताठरपणा सोडून चर्चेचा मार्ग स्वीकारावा, असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यातली संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि सणासुदीच्या काळात मुंबईत आंदोलन करु नये, असही महाजन म्हणाले.

दरम्यान, २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी इथं उपोषण करत असलेले मनोज जरांगे यांच्या आरोग्य तपासणी तसंच उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालील वैद्यकीय पथकं २४ तास कार्यरत आहेत.

****

कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र वाटपासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांमध्ये जात प्रमाणपत्राच्या वाटपात शून्य प्रलंबित्व ठेवण्यासाठी प्रशासनाने काल प्रांताधिकारी आणि जात पडताळणी अधिकाऱ्यांसोबत सविस्तर बैठक घेऊन आवश्यक निर्देश दिले. आजपासून संपूर्ण मराठवाड्यात यासाठी विशेष शिबीरांचं आयोजन करण्यात येत असून, एकही प्राप्त अर्ज निर्णयाविना शिल्लक राहणार नाही, असं उद्दिष्ट देण्यात आलं आहे. या बैठकीत उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार प्रसाद लाड यांच्यासह विभागीय आयुक्त जी श्रीकांत उपस्थित होते. तर मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दूरदृष्य संवाद पद्धतीने सहभागी झाले होते. या कामाची अद्ययावत आकडेवारी दररोज प्रसारमाध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचवावी, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलदगतीने करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ वाढवून कार्यपद्धतीत सुधारणा कराव्यात, असे निर्देश या बैठकीत देण्यात आले.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या ग्रीड पाणीपुरवठा योजनेसह सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातल्या विविध पाणीपुरवठा योजनांचा, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल आढावा घेतला. योजनेच्या कामातल्या अडचणी विभागीय स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने सोडवून कामं गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

****

राष्ट्रीय पोषण माह २०२५ अंतर्गत हिंगोली जिल्ह्याने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यातल्या एक हजार १९७ अंगणवाडी केंद्रांवर राबवलेल्या विविध उपक्रमांची पोषण माहच्या अधिकृत पोर्टलवर नोंद करण्यात आली. या कामगिरीबद्दल उद्या ११ सप्टेंबरला मुंबईत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते हिंगोली जिल्ह्याला सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.

****

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे. लातूरमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केल्यानंतर ते काल बोलत होते. पावसाअभावी कोरडवाहू पिकांसह सोयाबीनचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून, बागायती पिकांचीही अवस्था बिकट असल्याचं त्यांनी सांगितलं. यापूर्वी खरडून गेलेल्या जमिनींसाठी जाहीर केलेल्या मदतीचा एकाही शेतकऱ्याला लाभ मिळाला नसल्याचा दावाही त्यांनी केला.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी जरांगे यांच्यासोबत सातत्याने संवाद ठेवावा, असं आवाहनही ‌दानवे यांनी केलं.

****

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा, पीक अनुदान आणि आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी धाराशिव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसिलदारांकडे करण्यात आली.

****

व्हीबी-जी राम जी योजनेतल्या तांत्रिक त्रुटी, प्रणालीतल्या अडचणी आणि त्यातून ग्राम रोजगार सेवकांवर होणारे आरोप या विरोधात बीड जिल्ह्यातल्या ग्राम रोजगार सेवकांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्ह्यात १५ ते २० रोजगार सेवकांवर हल्ले झाल्याचं संघटनेनं नमूद केलं आहे.

****

No comments:

Post a Comment