Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 13
September 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ सप्टेंबर २०२६ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या दुसऱ्या आणि अंतिम
दिवशी ब्रिक्स भागीदार देशांच्या नेत्यांचे स्वागत केले. या नेत्यांमध्ये मलेशियाचे
पंतप्रधान अन्वर इब्राहिम, व्हिएतनामचे पंतप्रधान ले मिन्ह हंग, सौदी अरेबियाचे
परराष्ट्र मंत्री फैसल बिन फरहान आणि संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस
यांचा समावेश होता. हे नेते आता 'सर्वसमावेशक जागतिक विकासासाठी भविष्याला आकार देणे' या विषयावरील
मुख्य सत्रात सहभागी झाले आहेत.
दहा ब्रिक्स भागीदार देशांमध्ये
बेलारूस, बोलिव्हिया, कझाकस्तान, क्युबा, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, युगांडा, उझबेकिस्तान आणि व्हिएतनाम यांचा समावेश आहे. सत्र संपल्यानंतर, पंतप्रधान
नरेंद्र मोदी कझाकस्तान, फिलीपिन्स, इजिप्त, दक्षिण आफ्रिका
आणि बुरुंडीच्या राष्ट्रपतींसोबत द्विपक्षीय बैठका घेतील.
****
मुख्यमंत्री सहायता निधी गरजु
रुग्णांना गंभीर आजार, अपघात आणि महागड्या शस्त्रक्रियांचा खर्च पेलण्यासाठी
आधार ठरत आहे. लहान मुलांवरील गंभीर उपचार, अपघातातील शस्त्रक्रिया, कर्करोग शस्त्रक्रिया
आणि मेंदूविकारांसह हाडांचे गंभीर आजार अथवा अन्य कारणांमुळे आवश्यक असलेल्या शस्त्रक्रियांचा
खर्चासाठी मोठ्या प्रमाणात निधी वितरित करण्यात आला आहे. महागड्या उपचारांमुळे अनेक
कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळते. अशावेळी आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना उपचारासाठी
या निधीची मोठी मदत होत आहे.
आमच्या वार्ताहरानं कळवलेल्या
माहितीनुसार, गेल्या एक जानेवारी २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत अकोला जिल्ह्यातील जवळपास
पंधराशे रुग्णांना १० कोटीं रुपयांहून जास्त आर्थिक मदत या निधीतून वितरित करण्यात
आली आहे.
****
बीड जिल्ह्यात कमी पावसामुळे
पाणीटंचाईची शक्यता वाढली आहे. जिल्ह्यातील १६४ पाटबंधारे प्रकल्पांमध्ये सरासरी साडेसोळा
टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
यांनी टँकर मंजुरीचे अधिकार उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांना दिले
आहेत. बीड, अंबाजोगाई, परळी वैजनाथ, माजलगाव, पाटोदा आणि गेवराई या सहा
उपविभागांना हे अधिकार देण्यात आले आहेत. टँकर सुरू करण्यापूर्वी संयुक्त पाहणी करून
प्रत्यक्ष टंचाईचा आढावा घेत, स्थानिक पाणी स्रोत - जल जीवन मिशनला प्राधान्य देणे तसंच
मंजुरीनंतर कार्योत्तर मान्यता बंधनकारक करण्यात आली आहे.
****
दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन
इथं आयोजित ६९व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेत राज्य विधीमंडळातील सदस्य सहभागी झाले
आहेत. यात विधानपरिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद
उप सभापती सचिन अहिर, विधानसभा सदस्या नमिता मुंदडा हे महाराष्ट्र विधानमंडळाच्या
"राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेचे" प्रतिनिधित्व करत आहेत. आजपासून
येत्या १९ सप्टेंबर दरम्यान आयोजित या परिषदेत लोकसभा, राज्यसभा आणि भारतातील सर्व
राज्य विधानमंडळांचे पीठासीन अधिकारी यांचं उच्चस्तरिय शिष्टमंडळ सहभागी झालं आहे.
"बदलत्या जागतिक
व्यवस्थेत आंतरराष्ट्रीय कायदा आणि संसदीय लोकशाहीचे सक्षमीकरण: राष्ट्रकुलाचे नेतृत्व"
ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. विविध देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये न्याय्य
- सर्वसमावेशी व्यापारपध्दत निर्मितीसाठी संवाद, दिव्यांगांसह सर्वांसाठी सुलभ
सहभागासाठी संसदीय व्यवस्था, हवामान बदलाशी जुळवून घेत संबंधित आव्हानांवर उपाययोजनांसाठी
संसदीय भूमिका, संसदेत कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर, कायदा मंजूरोत्तर छाननी, संसद-जनता
प्रभावी संवाद, मानवी हक्क संरक्षण, शांततेला प्रोत्साहन यात संसदेची भूमिका, या विषयांवर
परिषदेत विचारमंथन होईल.
****
गणेशोत्सवामुळे छत्रपती संभाजीनगरच्या
विविध बाजारात आज रविवारच्या दिवशी चैतन्य संचारले आहे. घरगुती गणेश मूर्ती खरेदीसाठी
नागरिकांनी बाजारात गर्दी केली आहे. गुलमंडी, टीव्ही सेंटर, गजानन महाराज
मंदिर रोडसह शहरातील विविध भागात आकर्षक आणि सुंदर गणेश मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या
आहेत. छोट्या आकाराच्या घरगुती मूर्तींना यंदा अधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
दरम्यान, अनेक घरांमध्ये पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यावर भर दिला जात असून, नागरिकांनी
घरीच शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनविल्या आहेत.
****
हॉकी इंडिया संस्थेचे महासंचालक, कमांडर आर.
के. श्रीवास्तव यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. हॉकी इंडियाचे
अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी यासंदर्भात श्रीवास्तव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली
आहे. त्यांना महासंचालक पदाशी संबंधित सर्व जबाबदाऱ्या आणि अधिकार तात्काळ प्रभावाने
वापरणे थांबवण्याचे निर्देश देण्यात आले. नोटीसीत श्रीवास्तव यांच्यावर कर्तव्यात कसूर
आणि जाणीवपूर्वक सूचनांचे उल्लंघन यासह अनेक आरोप करण्यात आले आहेत. यामध्ये विश्वचषकापूर्वी
पूर्वपरवानगीशिवाय राष्ट्रीय संघाच्या गणवेशाचा
बदलण्याचा निर्णयाचाही, विश्वचषकादरम्यानचा प्रवास, हॉकी इंडिया लीगशी संबंधित
फ्रँचायझी समन्वय आणि प्राधान्यक्रमाच्या कामांबाबत मनमानी निर्णय यांसह अन्य मुद्द्यांचा
समावेश आहे.
****
No comments:
Post a Comment