▼

Sunday, 13 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.09.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 13 September 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ सप्टेंबर २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

भारताच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, आज कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दिल्ली वाहतूक पोलिसांनी मार्गांमध्ये बदल केले आहेत. १८व्या ब्रिक्स शिखर परिषद २०२६ च्या अंतिम दिवशी भारत मंडपममधील अभ्यागतांवर सुरक्षा यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. पहिल्या दिवशी 'नवी दिल्ली जाहीरनाम्या'ला एकमताने मंजुरी दिल्यानंतर, ही शिखर परिषद आज संपन्न होईल.

दोन दिवसांच्या या ब्रिक्स शिखर परिषदेत ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण, रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरात या जगातल्या प्रमुख देशांचे प्रमुख आणि प्रतिनिधी सहभागी झाले. त्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान हे नेते सहभागी झाले. याशिवाय व्हिएतमानचे प्रधानमंत्री ले मिन्ह हुंग, बेलारुसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मॅक्सिम राइजेनकोव आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉक्टर टेडरॉस घेब्रेसस हे देखील या परिषदेसाठी आले आहेत.

****

भारत आणि चीन यांच्यात कोविड महामारीमुळे स्थगित झालेली विमानसेवा येत्या २१ सप्टेंबर पासून पुन्हा सुरु होणार आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चीनच्या सदर्न एअरलाईन्स या  विमान कंपनीनं आज ही घोषणा केली. भारतीय विमान कंपनी इंडिगोनं या वर्षी मार्चमध्ये, शांघाय आणि कोलकाता दरम्यान दैनंदिन विमानसेवा सुरू केली असून चीनच्या बाजूनं देखील आता ग्वांगझू आणि नवी दिल्ली दरम्यान नियमित प्रवासी विमानसेवा सुरु होत आहे.

****

विघ्नहर्ता गणेशाच्या आगमनाची वेळ आता जवळ आली आहे. छत्रपती संभाजीनगरसोबतच मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूरसह राज्यभरात गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. सार्वजनिक मंडळांमध्ये गणेशाचं स्वागत करण्यासाठी मंडपांची उभारणी, सजावट यांची लगबग सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगरतील मध्यवर्ती भागातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या भव्य मुर्तींचं आगमान काल सायंकाळीपासूनच वाजत-गाजत थाटामाटात नियोजित ठिकाणी करण्यात आलं आहे.

****

गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्यातर्फे उद्या १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान राज्यभर 'श्री गणेशा आरोग्याचा' अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत राज्यातील जिल्ह्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

****

राज्यातील सार्वजनिक सेवाभावी संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी- पारदर्शक अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. अशा संस्थांद्वारे चालविल्या जाणाऱ्या रुग्णालयांमध्ये गरीबांना मोफत आणि सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा मिळतात की नाही, यावर ज्याप्रमाणे नियंत्रण यंत्रणेद्वारे देखरेख होते, त्याच आधारावर आता अशा शाळांसाठी अशी यंत्रणा लागू केली जाणार आहे. या विशेष प्रयत्नांमुळे राज्यातील हजारो शाळांमधील प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक सोयी-सुविधा आणि शिक्षण हक्क कायद्यांतर्गत मिळणाऱ्या निधीचा योग्य वापर यावर थेट प्रशासकीय लक्ष राहणार आहे.

****

राज्यात आज सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. मराठवाड्यात नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात आज हलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित मराठवाड्यासह अहिल्यानगर, नाशिक आणि जळगाव जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत.

****

राष्ट्रीय संरक्षण तसंच नौसेना अकादमी परीक्षा आणि संयुक्त संरक्षण सेवा सीडीएस परीक्षा २०२६ आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा अंतर्गत १३ उपकेंद्रांवर दोन सत्रात होत आहे.

****

अन्न औषध प्रशासनाकडून गेल्या दोन दिवसात ४ कोटी ४५ लाख रुपये किंमतीचा अन्न पदार्थाचा एकूण साठा जप्त करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने पुणे, अहिल्यानगर, तसंच नाशिक इथे केलेल्या कारवाईचा समावेश आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं आज, बी. रघुनाथ यांच्या कवितांवर आधारीत अभिवाचन कार्यक्रम 'पुन्हा नभाच्या लाल कडा' याचं आयोजन करण्यात आलं आहे. सायंकाळी साडेसहा वाजता शहरातील जीवन विकास ग्रंथालयात हा कार्यक्रम होईल.

****

जातनिहाय जनगणना करताना इतर मागासवर्गीयांसाठी वेगळा रकाना ठेवून प्रत्येक समाजघटकाची लोकसंख्या अधिकृतपणे नोंदवावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या, सामाजिक - शैक्षणिक स्थिती आणि आर्थिक परिस्थितीची माहिती उपलब्ध झाली तर विविध कल्याणकारी योजनांचं नियोजन करता येईल, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने काल मुंबईत राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट घेऊन मागण्याचं निवेदन सादर केलं. राज्याच्या विविध भागात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती उद्भवली असून तातडीनं राज्यात दुष्काळ जाहीर करावा, शेतकरी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, जनावरांसाठी चारा- पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणीही काँग्रेसनं केली आहे.

****

No comments:

Post a Comment