▼

Tuesday, 15 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 15.09.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 15 September 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ सप्टेंबर २०२६ दुपारी १.०० वा.

****

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथून मोजक्या दहा सहकाऱ्यांसमवेत आज साडे अकराच्या सुमारास मुंबईकडे प्रयाण केले आहे. दोन वाहने आणि दोन रुग्णवाहिका त्यांच्यासोबत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज १८ वा दिवस आहे.

मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी जरांगे यांच्या प्रकृतीची जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी तपासणी केली. याआधी ११ सप्टेंबर रोजी जरांगे यांना शेवटची सलाईन लावण्यात आली होती. चार दिवसांपासून त्यांनी उपचार बंद केल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी जरांगे यांना प्रवास न करण्याचा सल्ला दिला. मात्र, ते मुंबईला जाण्यावर ठाम राहिले. जरांगे यांच्या मुंबईकडे प्रस्थानामुळे अंतरवाली सराटी परिसरात मराठा समाजबांधवांची मोठी गर्दी झाली होती.

दरम्यान, जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना मुंबई दौऱ्यासाठी S P U अर्थात स्पेशल प्रोटेक्शन युनिटची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. ज्यात एक पोलिस अधिकारी आणि एक पोलिस कॉन्स्टेबल सतत त्यांच्यासोबत असणार आहे.

दरम्यान, रविवारी जरांगे यांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा परवानगी नाकारली होती. त्यानंतर जरांगे यांच्या वतीने मुंबई पोलिसांकडे तिसऱ्यांदा अर्ज दाखल करण्यात आला आहे. ५० जणांना आंदोलन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे.

****

जैन धर्माच्या श्वेतांबर परंपरेनुसार आज पर्युषण पर्वाचा अंतिम दिवस, संवत्सरी, आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संवत्सरीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या. क्षमा आणि करुणा प्रत्येक नाते अधिक दृढ करतात, याची आठवण संवत्सरी करून देते असं पंतप्रधानांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे. या पवित्र प्रसंगी नम्रता लोकांना मार्गदर्शन करेल आणि दयाळूपणा तसेच सद्भावना प्रत्येक कृतीला आकार देईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

****

राष्ट्रीय अभियंता दिनाच्या औचित्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या सर्व अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रनिर्माणात अभियंत्यांचं अत्यंत मोलाचं योगदान असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतरत्न सर एम. विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं असून, सर्वांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

****

दिल्ली विमानतळावर इमिग्रेशन प्रक्रियेत गंभीर त्रुटी समोर आली असून, अमृतसरहून दिल्लीला आलेले तीन इटालियन प्रवासी निर्धारित इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण न करताच त्यांच्या पुढच्या आंतरराष्ट्रीय विमानापर्यंत पोहोचल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाननं एअर इंडियाकडून स्पष्टीकरण मागितलं आहे. एअर इंडियाला उत्तर देणासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. गृह मंत्रालयानंही या घटनेची गंभीर दखल घेतली असून, यासंदर्भात आज संबंधित अधिकारी आणि विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.

****

यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्या ग्राहकांच्या, दोन हजार रुपयांपर्यंतच्या यूपीआय व्यवहारांवर आणि रुपे डेबिट कार्डद्वारे केलेल्या पेमेंटवरही बँकांना कोणतंही शुल्क आकारता येणार नाही, अशी अधिसूचना केंद्रीय अर्थमंत्रालयानं जारी केली आहे. यूपीआय आणि रुपे डेबिट कार्ड, यांची अधिकृत इलेक्ट्रॉनिक पेमेंट माध्यम म्हणून नोंद केली असून, या माध्यमातून पेमेंट करणाऱ्या किंवा स्वीकारणाऱ्या व्यक्तीकडून बँक किंवा पेमेंट प्रणाली चालवणाऱ्या संस्थेला थेट किंवा अप्रत्यक्षपणे कोणतंही शुल्क आकारता येणार नाही, असं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे.

****

राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते आज नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. दुष्काळाची शक्यता असणाऱ्या अठरा जिल्ह्यांचा अहवाल मागवण्यात आला असून तो मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.

****

बीड जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या चोपन्न पूर्णांक आठ टक्के पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत सरासरीच्या सुमारे एकशे दोन टक्के पाऊस झाला होता. गणपती स्थापनेच्या कालावधीत जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला असून, माजलगाव आणि किट्टीआडगाव या दोन महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. मात्र, बीड, गेवराई, आष्टी आणि वडवणी तालुक्यांत अजूनपर्यंत ५० टक्क्यांहून कमी पाऊस झाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

भंडारा जिल्ह्यातल्या तुमसरमध्ये गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान कर्णकर्कश आवाजात डिजे वाजवणाऱ्या संचालकावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. पोलिसांच्या ध्वनी प्रदूषण नियंत्रण पथकानं केलेल्या अचानक तपासणीत या डिजेचा आवाज सुमारे नव्वद डेसिबल इतका दिसून आल्यानं पोलिसांनी ही डिजे साऊंड सिस्टिमही जप्त केली आहे.

****

No comments:

Post a Comment