▼

Saturday, 19 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 19.09.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 19 September 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      देशभरात ४५ ठिकाणी आज २०वा रोजगार मेळावा; पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप

·      दुष्काळावरील उपाययोजनांना सुरुवात; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे नांदेड इथं आढाव्यासाठी दाखल 

·      राज्यातल्या विविध रेल्वेप्रकल्पांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून ९९० कोटी रुपये निधी मंजूर

·      आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राचा आज सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन

आणि

·      मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांसाठी २२ सप्टेंबरपर्यंत पावसाचा यलो अलर्ट

****

देशातल्या विविध ४५ ठिकाणी २० वा रोजगार मेळावा आज आयोजित करण्यात येत आहे. या मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थामध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या ५१ हजारांहून अधिक तरुणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात येतील. या मेळाव्यामुळे विविध विभाग आणि सरकारी संस्थांमध्ये नियुक्ती पत्रे मिळणाऱ्या तरुणांची एकूण संख्या १२ लाख ७५ हजारांवर पोहोचणार आहे.

**

दरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते आज नवी दिल्लीत 'पर्यावरण आणि हवामान गतिमानतेचे भविष्य' या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन होणार आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणतर्फे आयोजित या दोन दिवसीय परिषदेत १७ देशांतील न्यायिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

****

आधुनिक विकास साधताना देशाचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. ३८ व्या पुणे महोत्सवाचं उद्घाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते काल पुण्यात झालं, त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, लोणावळा इथं कैवल्यधामच्या कार्यक्रमातही उपराष्ट्रपती सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी योगातून मिळणारी शिस्त, एकाग्रता, संयम आणि आत्मभान दैनंदिन जीवनातही अंगीकारावं, असं आवाहनही उपराष्ट्रपतींनी यावेळी केलं.

****

राज्यात दुष्काळाच्या स्थितीवर उपाययोजना सुरु केल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार महसूल विभागासह सर्व यंत्रणांनी पंचनामे आणि सर्वेक्षणाचे काम सुरू केल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते काल नागपूरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.

यासंदर्भात पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे काल रात्री नांदेड इथं दाखल झाले. आज सकाळी महसूल विभागातील पिकांच्या परिस्थितीबाबत ते आढावा बैठक घेणार असून, त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील पुयणी तसंच हिंगोली जिल्ह्यातील गावांमध्ये ते प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करतील.

**

यंदा अपुऱ्या पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात द्यावा अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यसरकारकडे केली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आणि शेतमजुरांना घरटी २५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी इत्यादी मागण्या पवार यांनी केल्या आहेत.

****

काँग्रेस पक्षानं दुष्काळी परिस्थितीवरून राज्य सरकारवर टीका केली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी नागपूरात पत्रकार परिषद घेऊन दुष्काळाच्या प्रश्नावर निर्णय घेण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची मागणी पटोले यांनी केली आहे.

****

राज्यातल्या विविध रेल्वेप्रकल्पांसाठी रेल्वे मंत्रालयाने ९९० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातल्या चौक-कर्जत दुपदरीकरण आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या मुकुटबन-गडचांदूर नवीन रेल्वेमार्गाचा समावेश आहे. हा नवीन मार्गामुळे कोळसा आणि सिमेंट उद्योगसमूहांना माजरी-नांदेड रेल्वेमार्गाशी थेट संपर्क मिळेल. त्यामुळे जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगरसह विविध शहरांकडे मालवाहतुकीसाठी लागणारा वेळ कमी होणार आहे.

****

ज्येष्ठा गौरी पूजनाचा सोहळा काल सर्वत्र पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. या तीन दिवसीय सोहळ्याची आज सांगता होत आहे. दरम्यान पाच दिवसांच्या गणपतींचं काल विसर्जन करण्यात आलं.

****

ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीसाठी भारताकडून ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. ‘श्वास’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ आणि ‘कोर्ट’ नंतर ऑस्करसाठी भारताकडून पाठवलेला ‘गोंधळ’ हा चौथा मराठी चित्रपट आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांचा प्रवास ‘जनसेवा से देशसेवा’ या मंत्राने प्रेरित असून, देशसेवेप्रती त्यांची अविरत बांधिलकी आजही कायम आहे. सेवा आणि सुशासनाच्या या दृष्टिकोनातून २०४७ पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सातत्याने कार्यरत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. या विशेष मालिकेत, या दृष्टिकोनाचे मेक इन इंडिया या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीत झालेलं रूपांतर दर्शवणारं उदाहरण आपण जाणून घेणार आहोत...

बाईट - मेक इन इंडिया

“देशाला जागतिक उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने २५ सप्टेंबर २०१४ रोजी ‘मेक इन इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात केली. देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे, परदेशी गुंतवणूक आकर्षित करणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि औद्योगिक विकासाला गती देणे, ही या उपक्रमाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्यासोबतच व्यवसाय सुलभता, आधुनिक पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाचा वापर आणि कौशल्य विकास यावर भर देण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, संरक्षण उत्पादन, औषधनिर्मिती, दूरसंचार, रेल्वे, अंतराळ आणि इतर विविध क्षेत्रांमध्ये देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

या उपक्रमामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसह मोठ्या उद्योगांना उत्पादन क्षेत्रात विस्ताराच्या संधी उपलब्ध होत आहेत. स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन मिळाल्याने भारतीय उद्योगांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली उपस्थिती मजबूत करण्याची संधी मिळत आहे.

‘मेक इन इंडिया’सोबतच आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप इंडिया आणि कौशल्य विकासासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून देशातील उद्योजकता व नवोन्मेषाला चालना देण्यात येत आहे. भारताची उत्पादन क्षमता वाढवून रोजगारनिर्मिती, निर्यातवाढ आणि आर्थिक विकासाला गती देण्याच्या दृष्टीने ‘मेक इन इंडिया’ हा महत्त्वाचा उपक्रम ठरत आहे.’’

·      हर्षवर्धन दीक्षित, छत्रपती संभाजीनगर

****

‘सेवा संकल्प अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागातील शेवटच्या घटकापर्यंत सुलभ, दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा विविध उपक्रम राबवणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी ही माहिती दिली. ‘नागरिक प्रथम’ हा दृष्टिकोन ठेवून आरोग्य तपासण्या, आरोग्य शिबिरे, उपचार आणि जनजागृती उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

****

आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राचा आज सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन साजरा होत आहे. या निमित्ताने आकाशवाणीच्या कार्यक्रमांमध्ये आगामी काळात विविध बदल आणि नव्या उपक्रमांची भर पडणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं नुकत्याच झालेल्या आकाशवाणी श्रोता संघाच्या राज्यस्तरीय संमेलनात, कार्यक्रम प्रमुख सुजित बनसोडे यांनी, श्रोत्यांनी मागणी केलेले सर्व कार्यक्रम पुढच्या वर्षभरात सुरू करण्यात येतील, अशी माहिती दिली. नव्याने निर्मिती करण्यात येणारे कार्यक्रम युवा केंद्रित असतील, असंही त्यांनी सांगितलं.

****

बंजारा समाजाला अनुसूचित जमाती-एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावं, या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातील जिंतूर इथं विनोद आडे यांनी उपोषण पुकारलेलं आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी बंजारा समाजाच्या वतीनं काल येलदरी जलाशयात जलसमाधी आंदोलन करण्यात आलं.

****

लातूरच्या पाणी पुरवठ्यासाठी विशेष बाब म्हणून ५० कोटी रुपये निधी मंजुर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. महापौर जयश्री सोनकांबळे यांच्यासह काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन, याबाबतचं निवेदन सादर केलं.

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात 'कोरडा दुष्काळ' म्हणून जाहीर करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन नागरिकांनी केजचे तहसीलदार यांच्याकडे सादर केलं आहे.

****

एशियन गेम्स-२०२६ मध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघाने काल जपानचा आठ गडी राखून पराभव करत या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. थेट उपांत्यपूर्व फेरीतून खेळण्याची संधी मिळालेल्या भारतीय संघाने जपानच्या नवख्या संघाला विसाव्या षटकांत केवळ ५७ धावांवर सर्वबाद केलं.

****

हवामान

मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांसाठी २२ सप्टेंबरपर्यंत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी वादळी, काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

****

No comments:

Post a Comment