▼

Friday, 18 September 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 18.09.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 18 September 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १८ सप्टेंबर २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      विसाव्या रोजगार मेळाव्यात उद्या पंतप्रधानांच्या हस्ते ५१ हजार तरुणांना नियुक्तीपत्रे 

·      योगामुळे एकाग्रता, आत्मभान आणि मानसिक संतुलन साधण्यास मदत, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचं प्रतिपादन

·      दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंचनामे, सर्वेक्षणाचे काम वेगाने सुरू, बुधवारपर्यंत अंतिम अहवाल येणार, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

·      हवामान विभागाकडून मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट, अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता

आणि

·      भारतीय महिला क्रिकेट संघ एशियन गेम्सच्या उपांत्य फेरीत दाखल, दुबळ्या जपानचा ८ गडी राखून केला पराभव

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या २० व्या रोजगार मेळाव्यात दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभाग आणि संस्थामध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या तरुणांना ५१ हजारांहून अधिक नियुक्तीपत्रे प्रदान करणार आहेत. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील. उद्या दुपारी साडेबारा वाजता हा मेळावा होईल. हा रोजगार मेळावा देशातल्या विविध ४५ ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. या रोजगार मेळाव्यामुळं विविध विभाग आणि सरकारी संस्थांमध्ये नियुक्ती पत्रे मिळणाऱ्या तरुणांची एकूण संख्या १२ लाख ७५ हजारांवर पोहोचणार आहे.

**

आधुनिक जीवनातील ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर योगामुळं शारीरिक आणि मानसिक आरोग्याबरोबरच एकाग्रता, आत्मभान आणि मानसिक संतुलन साधण्यास मदत होते, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं. लोणावळा इथं आयोजित कैवल्यधामच्या गोवर्धनदास सेक्सारिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थेनं योग शिक्षण, संशोधन आणि सांस्कृतिक शिक्षणाच्या क्षेत्रात ७५ वर्षे दिलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळं योगाला जागतिक स्तरावर व्यापक मान्यता मिळाली असून, संयुक्त राष्ट्रांनी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केल्याचं उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी नमूद केलं. विद्यार्थ्यांनी योगातून मिळणारी शिस्त, एकाग्रता, संयम आणि आत्मभान दैनंदिन जीवनातही अंगीकारावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यावेळी माजी केंद्रीय मंत्री आणि कैवल्यधाम ग्लोबलचे अध्यक्ष सुरेश प्रभू यांसह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

****

दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सर्व विभागांना तातडीनं सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार महसूल विभागासह सर्व यंत्रणा कामाला लागल्या असून, पंचनामे आणि सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. त्याआधारे शेतकऱ्यांसाठी कोणत्या उपाययोजना करायच्या तसंच केंद्र सरकारकडं कोणते प्रस्ताव पाठवायचे, याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते आज नागपूरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. राज्यातील १८ जिल्ह्यांचा प्राथमिक अहवाल यापूर्वीच प्राप्त झाला असून अंतिम अहवाल येत्या मंगळवार किंवा बुधवारपर्यंत अपेक्षित आहे. दुष्काळी परिस्थितीला मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिलं असून सर्व विभागांना कामाला लावलं आहे. याअंतर्गतच कृषीमंत्री दत्तात्रय भरणे दोन दिवसांचा छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

****

राज्यातली दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचा दावा करत काँग्रेसनं राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नाना पटोले यांनी नागपूरात पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारवर जोरदार टीका केली. शेतकरी संकटात सापडला असून, सरकार दुष्काळाच्या प्रश्नावर निर्णय घेण्यात अपयशी ठरल्याचा आरोप पटोले यांनी केला. दुष्काळी परिस्थितीमुळं पिकांचं मोठं नुकसान झालं असून, शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे.

****

भारताच्या जीडीपीचा वास्तविक वृद्धीदर चालू आर्थिक वर्षात ७ टक्के राहील, असा अंदाज मूडीज या जागतिक मानांकन संस्थेनं वर्तवला आहे. याआधी हा दर ६ टक्के राहील, असा अंदाज या संस्थेनं वर्तवला होता. पश्चिम आशियातल्या युद्धपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय अर्थव्यवस्थेच्या लवचिकतेमुळे हा दर १ टक्क्याने वाढल्याचं संस्थेचं म्हणणं आहे. जी-२०च्या सर्व सदस्य देशांपेक्षा भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याचंही मूडीजनं म्हटलं आहे.

****

हवामान विभागाने मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. १८ ते २२ सप्टेंबर या काळात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी वादळी, काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. ताशी ३० - ५० किलो मीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीडमध्ये आज आणि उद्या हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, तर २० ते २१ सप्टेंबर दरम्यान विजांसह पावसाची शक्यता आहे. हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये पुढील ४-५ दिवस विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून लातूर, नांदेड, धाराशिवमध्ये २१-२२ सप्टेंबरला वाऱ्याचा वेग ४०-५० किमीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी आणि नागरिकांनी मोकळ्या ठिकाणी आणि झाडाखाली थांबू नये, असे आवाहन करण्यात आलं आहे.

**

अकोला जिल्ह्यातल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिनाच्या औचित्यानं, तीन दिवसीय खरीप शिवार फेरीचं उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते येत्या रविवारी करण्यात येणार आहे. पालकमंत्री विधिज्ञ आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम होणार आहे.

****

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर इथं हिंदी दिनानिमित्त ‘हिंदी भाषेचे वैभव आणि वर्तमानातील महत्त्व’ या विषयावर विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून उपप्राचार्य डॉक्टर संजीव साळवे यांनी मार्गदर्शन केलं. हिंदी भाषेची समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरा, तिचे वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप तसंच आधुनिक काळातील हिंदी भाषेचे वाढते महत्त्व याविषयी सविस्तर विवेचन डॉ. साळवे यांनी केलं.

****

परभणी जिल्ह्यातील जिंतूर इथं बंजारा समाजाला अनुसूचित जमाती-एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावं, यासाठी वसंतराव नाईक पुतळा परिसरात पाच सप्टेंबरपासून विनोद आडे उपोषणास बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बंजारा समाजाच्या वतीनं आज येलदरी जलाशयात जलसमाधी आंदोलन करण्यात आलं. शासनाचं लक्ष वेधण्यासाठी शेकडो समाजबांधव या जलसमाधी आंदोलनात सहभागी झाले. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शासकीय नोकरी, दाखल केलेले गुन्हे मागे घेणं आणि मुख्यमंत्र्यांसोबत शिष्टमंडळाची बैठक या मागण्या आंदोलनात करण्यात आल्या. बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीवर शासनानं तातडीनं निर्णय घ्यावा, अशी भूमिका आंदोलकांनी यावेळी व्यक्त केली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

****

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने आणि पावसातील दीर्घ खंडामुळे खरीपातील सर्व पिके करपून गेली आहेत. त्यातच कृषी वीज खंडित होत असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. तालुक्यातील नदी, विहीर आणि तलावांमध्ये पाणीसाठा शिल्लक नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून पशुधनासाठी चारा आणि पाणी उपलब्ध नसल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था पार कोलमडली आहे. या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन केज तालुका त्वरित 'कोरडा दुष्काळ' म्हणून जाहीर करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन नागरिकांनी केजचे तहसीलदार यांना दिले.

****

अकोला जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून कमाल तापमानात सातत्यानं वाढ होत असल्यानं सप्टेंबरमध्येच उन्हाळ्यातील तापमानाचा अनुभव येत आहे. कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यानं दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता वाढली असून, उकाड्यामुळं नागरिक हैराण झाले आहेत. पावसाची प्रतीक्षा असतानाच झालेली वाढ शेतीपिकांसाठीही चिंतेची बाब ठरत आहे. गेल्या चार दिवसांपासून कमाल तापमानात वाढ होत असून, दुपारच्या वेळी उन्हाचा चटका अधिक जाणवत असल्यानं नागरिकांना बाहेर पडतांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

****

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात आदिवासी विकास विभागामार्फत येत्या १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ आज खापा खुर्द इथल्या शासकीय आदिवासी माध्यमिक आश्रमशाळा इथं जिल्हा परिषद सदस्या धृपता मेहर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अभियानाच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या ‘सेवा चित्ररथा’ला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं. आदिवासी भागातल्या प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत शासनाच्या योजना, सेवा आणि सुविधांचा लाभ पोहोचवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयानं कार्य करण्याचं आवाहन जिल्हा परिषद सदस्या मेहर यांनी यावेळी केलं.

****

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने अपेक्षेप्रमाणे दमदार कामगिरी करत एशियन गेम्स-२०२६ ची विजयी सुरुवात केली. शुक्रवारी भारताने जपानचा आठ गडी राखून पराभव करीत या स्पर्धेची उपांत्य गाठली. भारतीय संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीतून खेळण्याची संधी मिळाली होती.

****

No comments:

Post a Comment