Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 21 September
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २१ सप्टेंबर
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
जपानमध्ये
सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत पुरुषांच्या १० मीटर एयर रायफल सांघिक
स्पर्धेत भारतीय संघाने रौप्य पदकांची कमाई केली. रुद्राक्ष पाटील, पार्थ माने आणि हिमांशू ढिल्लन
यांचा या संघात समावेश आहे. तसंच रुद्राक्ष आणि आणि हिंमांशूने वैयक्तिक प्रकारातही
अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे.
नेमबाजीत
रौप्यपदक जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं.
दरम्यान, या स्पर्धेत भारताच्या जय मीना
आणि आध्या तिवारी या जोडीनं सॉफ्ट टेनिस मिश्र दुहेरीच्या गट ‘ब’मध्ये सलग दुसरा विजय
नोंदवला. मंगोलियाच्या या जोडीवर त्यांनी ४-२, ४-१, ४-१, ४-० आणि ५-३ अशा सेटमध्ये विजय
मिळवला.
मार्शल
आर्ट स्पर्धेत सूचिका तरियालने महिलांच्या ६० किलो वजनी गटाच्या उपान्त्य फेरीत पोहोचून
आशियाई क्रीडा स्पर्धेतलं आपलं पदक निश्चित केलं आहे. या स्पर्धेत मिश्र मार्शल आर्ट
प्रकारात पदक निश्चित करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
****
राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौर्यावर जात आहेत. या दौर्यादरम्यान
उद्या त्यांच्या हस्ते केवाडिया इथल्या एकता नगर इथं ७२वे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
करण्यात येतील. त्यानंतर बुधवारी त्या महाराजा सयाजीराव बडोदा विद्यापीठाच्या ७५व्या
दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
****
राज्यात
सर्वत्र सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत.
बीड
शहरातल्या पेठ बीड विविध गणेश मंडळांनी यंदा १७ आकर्षक देखावे साकारले असून, गणेशभक्त आणि नागरिकांची गर्दी
होत आहे. हिरालाल चौकात वैष्णोदेवी मंदिर, सीता स्वयंवर, श्री ओझार गणेश मंडळाचा जीवंत मानवी देखावा, आणि श्री विघ्नहर्ता गणेश मंडळाचा
कोकणी वाडा हे देखावे लक्षवेधी ठरत आहेत. उत्सव काळात शांतता, शिस्त आणि स्वच्छता राखून मंडळांना
सहकार्य करावं, असं
आवाहन पेठ बीड कृती समितीचे प्रमुख अमृत सारडा यांनी केलं आहे.
**
गणेशोत्सवाच्या
पार्श्वभूमीवर भक्ती, संस्कृती, कला आणि सामाजिक एकोप्याचा
उत्सव साजरा करण्यासाठी जालना जिल्हा प्रशासनाच्या वतीने 'महागणेशोत्सव' या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचं
आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचं दर्शन घडवणारे
विविध सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर केले जाणार आहेत.
**
पुण्यात
गणेश मंडळांचे प्रबोधनपर आणि आकर्षक देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत.
पुण्यातल्या दृष्टिहीन आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधनपर गणेश विसर्जन मिरवणूक
काढली. यावेळी सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करणारे संदेश आणि घोषवाक्ये सादर करण्यात
आली.
पालघरमधल्या
झांझरोळी पाटीलपाडा इथल्या आदिवासी युवक गणेशोत्सव मंडळानं रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आणि गरजू विद्यार्थ्यांना
शैक्षणिक साहित्य वाटप केलं. तसंच जैवविविधता आणि वन्यजीव संवर्धनावर जनजागृतीपर कार्यक्रम
घेण्यात आला. अहिल्यानगर पोलिसांच्या वतीने शहरातील गणेश मंडळांना सायबर सुरक्षितता
जनजागृतीसाठी फलकांचं वाटप करण्यात आलं.
गणेशोत्सवा
दरम्यान राज्य शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या लोकसंवाद अभियानालाही नागरिकांचा उत्स्फूर्त
प्रतिसाद मिळत आहे. लातूर जिल्ह्यातल्या मुरुड इथं लोकसंवाद कार्यक्रमात नागरीकांना
आरोग्य विभागाच्या योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आलं.
****
राज्यातल्या
शासकीय भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या
अध्यक्षतेखाली गठित उच्चस्तरीय समिती आज छत्रपती संभाजीनगर इथं विविध विषयांचा आढावा
घेत आहे. शहरातल्या स्मार्ट सिटी कार्यालयात या समितीतले सदस्य विद्यार्थी आणि संबंधित
घटकांना भेटून त्यांची मतं जाणून घेणार आहेत.
****
टीईटी
पेपर फुटी प्रकरणातला फरार आरोपी बीडचा प्रकाश मिसाळ आणि बिहारचा अशोककुमार शाव यांना
पोलिसांनी काल अटक केली. त्यांना भिवंडी न्यायालयाने २३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली
आहे. या प्रकरणात आतापर्यंत १८ जणांना अटक करण्यात आली असून, पोलिसांनी गेल्या शुक्रवारी
न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं आहे.
****
लातूरच्या
दयानंद सभागृहात शिक्षक सन्मान सोहळा आणि हिंदी हास्य कवी संमेलन काल उत्साहात पार
पडलं. यावेळी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांचा मान्यवरांच्या
हस्ते सन्मान करण्यात आला.
****
गडचिरोली
जिल्ह्यात धानोरा तालुक्यातल्या जांभळीझोरा इथं प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचं अवैध उत्पादन
आणि साठवणूक करणाऱ्या आरोपींविरोधात पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी चार आरोपींना
अटक करण्यात आली असून, प्रशांत
याडावार हा आरोपी फरार आहे. पोलिसांनी सुगंधित तंबाखू, उत्पादन आणि पॅकिंग साहित्य तसंच चारचाकी वाहन असा एकूण
साडे २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
****
छत्रपती
संभाजीनगर शहरातल्या मालमत्तांची माहिती घेण्यासाठी महापालिकेनं सर्वेक्षणाची प्रक्रिया
सुरू केली आहे. या कामासाठी खासगी संस्था नियुक्त करण्याकरता मागवलेल्या ई - निविदांना
तीन कंपन्यांनी प्रतिसाद दिला असून, संबंधित
कंपन्यांची आर्थिक गुणवत्ता तपासण्यात येणार असल्याचं महापालिका आयुक्त अमोल येडगे
यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment